Tuesday, August 24, 2010

नारळी भात - Narali Bhat

Narali Bhat in English

वेळ: साधारण ४५ ते ५० मिनीटे(पूर्वतयारी: २० ते ३० मिनीटे । पाककृतीस लागणारा वेळ: २५ मिनीटे)
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

coconut rice, Indian coconut recipes, vegetarian recipes, coconut jaggery rice, naralache padarth, coconut sweets, Indian sweets, Indian curry recipes, Indian vegetarian foodसाहित्य:
३/४ कप तांदूळ
दिड कप पाणी
२ + १ टेस्पून साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ टिस्पून वेलची पूड
१ कप गूळ, किसलेला (टीप २)
१ कप ताजा खोवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे

कृती:
१) तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.
४) गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
५) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
६) जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
७) झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.
८) भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.

टीप्स:
१) गूळ-नारळ-भात यांचे मिश्रण शिजवताना गूळ वितळल्याने सुरूवातीला ते पातळ होते. काहीवेळ शिजवल्यावर ते आळत जाईल. तसेच नारळीभात तयार झाल्यावर शेवटची काही मिनीटे झाकण न ठेवता शिजवावे म्हणजे अधिकचा ओलसरपणा निघून जाईल.
२) जर नारळीभात खुप गोड नको असेल तर गूळाचे प्रमाण १ कप ऐवजी पाऊण कप वापरा.
३) जर नारळीभात तयार झाल्या झाल्या लगेच चव पाहिली तर प्रचंड गोड लागेल, पण काही कालावधीनंतर गुळाचा पाक भातात मुरल्याने गोडपणा काहीप्रमाणात कमी होतो.
४) तांदूळ परफेक्ट शिजवावा. कमी शिजलेल्या भाताची शिते, गूळाच्या संपर्कात आल्यामुळे कडकडीत होतात. तसेच जास्त शिजलेल्या भाताचा, गूळ आणि नारळ घालून शिजवल्यावर गोळा होतो आणि शिते आख्खी राहात नाहीत.
५) भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो.

Labels:
coconut rice, narali bhat, narali paurnima, raksha bandhan

No comments:

Post a Comment