वेळ: साधारण दीड तास
३ जणांसाठी
कोफ्ता आवरणासाठी:
३ मध्यम बटाटे
२ टेस्पून कॉर्न फ्लोर
चवीपुरते मीठ (१/४ चमचा)
तळणीसाठी तेल
सारणासाठी:
१/२ कप किसलेले पनीर
२ चिमटी मीठ
१/२ टीस्पून साखर
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
२५ बेदाणे
२ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
ग्रेव्हीसाठी:
१ मोठा पांढरा कांदा, मधोमध अर्धा चिरून सोलून घ्यावा
२ टीस्पून बटर
२ हिरव्या मिरच्या
३ मोठ्या लसणीच्या पाकळ्यांची पेस्ट
१/२ टीस्पून आलेपेस्ट
अख्खा गरम मसाला:- २ तमालपत्र, २-३ लवंग, ३ मिरी दाणे, १ लहान दालचीनी, २ वेलची
२ टेस्पून दाटसर काजूपेस्ट
१/२ कप हाफ अँड हाफ (टीप ५)
चवीपुरते मीठ
कोफ्ता:
१) बटाटे उकडून घ्यावेत. सोलून व्यवस्थित मॅश करून घ्यावेत. गुठळी अजिबात राहू देवू नये. यामध्ये २ टेस्पून कॉर्न फ्लोर आणि चवीपुरते मीठ घालून माळून घ्यावे. या मिश्रणाचे साधारण ८ समान भाग करावेत.
२) सारणाचे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्स करावे. याचेही ८ समान भाग करावेत.
३) बटाट्याचे मिश्रण घेउन हातानेच चपटे करून परी तयार करावी (साधारण अडीच ते ३ इंच). मधोमध सारण ठेवून सर्व कडा एकत्र आणाव्यात आणि सीलबंद करावे. अशाप्रकारे सर्व कोफ्ते तळण्यासाठी तयार करावेत. कोफ्त्याचा सरफेस एकदम स्मूथ असावा. भेग पडली असेल तर नीट बंद करावी. कारण तळताना सारण बाहेर येउन कोफ्ता फुटतो.
४) सर्व कोफ्ते मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळून घ्यावे. टिपकागदावर काढून ठेवावे.
ग्रेव्ही:
५) कांदा उकडून घ्यावा. (मी प्रेशर कुकरमध्ये २ शिट्ट्या करून कांदा उकडला होता). उकडलेल्या कांद्याची बारीक पेस्ट करावी.
६) पॅनमध्ये बटर गरम करून त्यात अख्खे गरम मसाले घालावेत. नंतर हिरवी मिरची आणि आलेलसूण पेस्ट घालावी. १५ सेकंद परतावे. आता कांद्याची पेस्ट आणि मीठ घालून हाय हिटवर परतावे. जोवर रंग किंचित गुलाबी होईतोवर सतत ढवळावे.
७) काजू पेस्ट घालावी. तळापासून ढवळत राहावे, कारण काजू पेस्ट तळाला चिकटू शकते. किंचित पाणी घालावे. झाकण ठेवून काजूचा कच्चट वास जाईस्तोवर मध्यम आचेवर शिजवावे (३ ते ४ मिनिटे) (टीप)
८) आच एकदम कमी करावी आणि उष्णता थोडी कमी होईस्तोवर थांबावे. आता हाफ अँड हाफ घालून जोरजोरात ढवळावे. कारण कांदा आणि मीठ यामुळे हाफ अँड हाफ फुटण्याची शक्यता असते. एकदा का व्यवस्थित मिक्स झाले कि आच मिडीयम वर ठेवावी आणि काही मिनिटे शिजवावे.
कोफ्त्यावर हि गरमागरम ग्रेव्ही घालून लगेच सर्व्ह करावे.
टीपा:
१) स्टेप ७ मध्ये, काजूपेस्ट व्यवस्थित शिजल्यावर मी अख्खे गरम मसाले काढून टाकले होते. नंतर हि ग्रेव्ही एकदा मिस्करमध्ये बारीक केली ज्यामुळे ती एकदम स्मूथ झाली. हि ग्रेव्ही मी परत पॅनमध्ये घेतली आणि स्टेप ८ फॉलो केली.
२) बटाटे व्यवस्थित मॅश करावेत. गुठळी राहिली तर कोफ्ते गरम तेलात फुटण्याची शक्यता असते.
३) जर गरम मसाला किवा इतर कुठलाही मसाला घातल्यास ग्रेव्हीचा रंग बदलेल. म्हणून अख्खे गरम मसाले वापरले आहेत, ज्यामुळे ग्रेव्हीला मसाल्यांचा हलकासा स्वाद येतो आणि ग्रेव्हीचा रंगही बदलत नाही.
४) सारणामध्ये काजू बदाम पिस्ता यांचे तुकडे घालू शकतो.
५) हाफ अँड हाफ म्हणजे १ भाग क्रीम आणि १ भाग दुध (होल मिल्क) यांचे मिश्रण.
No comments:
Post a Comment