katachi amti in English
साधारण ३ ते ४ जणांसाठी
वेळ: ३० मिनीटे
साहित्य:
१/४ कप चणाडाळ (महत्त्वाची टीप १)
::::ताजा कुटलेला मसाला::::
१ टेस्पून सुक्या खोबर्याचा किस,
१/२ टिस्पून जिरे,
१ ते २ काळी मिरी,
१ ते २ लवंगा,
१ लहान तमालपत्र, आणि
अगदी छोटा दालचिनीचा तुकडा (टीप २).
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने
१ टिस्पून गोडा मसाला
१ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
१ टेस्पून गूळ
१ टेस्पून ओला खवलेला नारळ
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ
कृती:
१) चणाडाळ कूकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावी.
२) खोबर्याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद आचेवर थोडावेळ भाजून घ्यावे. खलबत्त्यात कुटून त्याची पूड करावी.
३) चणाडाळ व्यवस्थित घोटून घ्यावी. एका पातेल्यात तेल गरम करून, मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळ फोडणीस घालावी. गरजेनुसार पाणी घालावे.
४) आमटीला उकळी फुटली कि कुटलेला मसाला चमचाभर घालावा आणि गोडा मसाला घालावा. ढवळून चिंचेचा कोळ आणि गूळ घालावे. चवीपुरते मिठ घालावे. आमटी घट्ट वाटल्यास थोडे पाणी वाढवावे.
५) एका उकळीनंतर आमटीची चव पाहावी गरज वाटल्यास कुटलेला मसाला घालून थोडावेळ उकळावे.
६) ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदोन मिनीट मंद आचेवर उकळावी.
हि आमटी पुरणपोळी खाताना तोंडी लावणी म्हणून घेतात तसेच गरमागरम तूपभातावर हि आमटी अप्रतिम लागते.
तसेच हि आमटी आदल्या दिवशी करून दुसर्या दिवशी खाल्ली तर छान मुरते आणि अजून चविष्ट लागते.
टीप:
१) हि आमटी बर्याचदा पुरणपोळी केली कि करतात. जर तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर चणाडाळ शिजवताना थोडे जास्त पाणी घालून डाळ शिजवावी. पाणी वाडग्यात निथळून घ्यावे. जर निथळलेले पाणी १ कप असेल तर १/२ कप शिजवलेली डाळ बाजूला काढावी आणि वर दिलेल्या कृतीनुसार (स्टेप २ पासून) आमटी करावी.
२) दालचिनीच्या तुकड्याऐवजी दालचिनीची पूड मिळते तीसुद्धा वापरली तरी चालेल, ती न भाजता थेट आमटीत घालावी.चिमूटभरच वापरावी.
३) ताजा कुटलेला मसाला वापरल्याने चव अप्रतिम येते. थोडी मेहनत पडली तरी ताजा मसाला वापरल्याने चवीत खुपच फरक पडतो. जर हा मसाला वापरायचा नसेल तर १ टिस्पून ऐवजी २ टिस्पून गोडा मसाला वापरावा.
४) बरेचजण वेगळ्या पद्धतीने हि आमटी बनवतात. घोटलेली डाळ पाणी घालून सारखी करावी त्यात गूळ, चिंच कोळ, फ्रेश कुटलेला मसाला, गोडा मसाला, मीठ, खवलेला नारळ असे एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावी. छोट्या कढल्यात फोडणी करून ती वरून घालावी आणि अजून थोडावेळ उकळी काढावी.
५) काहीजणांना या आमटीत कांद्याची चव आवडते, अशावेळी फोडणीत बारीक चिरलेला कांदा (१/२ कप) घालून परतावे.
Labels:
Katachi amati, katachi amti, maharashtrian pooranpoli
Tuesday, September 22, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment