Dal Takda in English
काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण, बर्याचशा रेस्टोरेंटमध्ये हे दोन्ही सारख्याच पद्धतीने बनवतात. दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.
दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे
३ ते ४ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे (शिजवलेली डाळ तयार असल्यास)
साहित्य:
३/४ कप तूर डाळ
१/४ कप चणा डाळ
१ मध्यम कांदा (१/२ बारीक चिरून, १/२ उभा पातळ चिरून)
१ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
२ लसणीच्या पाकळ्या, किंचीत ठेचून
१ हिरवी मिरची, उभी चिरून
२ सुक्या लाल मिरच्या
३ टिस्पून तूप (२ टिस्पून डाळीच्या फोडणीस + १ टिस्पून वरून फोडणी)
१/८ टिस्पून मोहोरी, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद,
१/२ टिस्पून जिरे
३ ते ४ कढीपत्ता पाने
१ टिस्पून लिंबाचा रस (ऐच्छिक)
चवीपुरते मिठ
कृती:
१) तूरडाळ आणि चणाडाळ प्रेशर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी. व्यवस्थित शिजली कि घोटून घ्यावी.
२) उभा चिरलेला कांदा तेलात खरपूस तळून घ्यावा. तळलेला कांदा डाळीत छान लागतो. हा कांदा सजावटीसाठी वापरावा.
३) पातेल्यात २ टिस्पून तूप गरम करावे. त्यात मोहोरी घालावी, तडतडू द्यावी. त्यात हिंग, हळद, २ कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. गोल्डन ब्राऊन रंगावर परतावा. टोमॅटो घालून मऊसर होईस्तोवर परतावे.
४) नंतर घोटलेली डाळ घालावी आणि गरजेपुरते पाणी घालावे. दाल तडका थोडा घट्टसरच असतो त्यामुळे पाणी बेताचे घालावे. चवीपुरते मिठ घालून उकळी येऊ द्यावी. जर लिंबूरस घालणार असाल तर तो आत्त घालून ढवळावे.
५) डाळ सर्व्हींग बोलमध्ये काढावी. कढल्यात १ टिस्पून तूप गरम करावे त्यात जिरे, कढीपत्ता, आणि लसूण घालावी. लसूण जरा लालसर झाली कि लाल मिरची टाकून फोडणी तयार करावी आणि ही फोडणी तयार डाळीवर घालावी. कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याने सजवून भाताबरोबर गरमागरम सर्व्ह करावी.
Labels:
Dal Tadka, Dal Fry, tadka dal
Tuesday, November 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment