Monday, April 11, 2011

कोल्हापूरी मसाला - Kolhapuri Masala

Kolhapuri Masala in English

वेळ: १५ ते २० मिनीटे
साधारण पाऊण ते १ कप मसाला

kolhapuri masala, indian garam masala, kolhapuriसाहित्य:
१ कप सुक्या लाल मिरच्या
१/२ कप सुक्या खोबर्‍याचा किस
२ टेस्पून तीळ
१ टेस्पून धणे
१ टेस्पून जिरे
१ टेस्पून काळी मिरी
१ टिस्पून मोहोरी
१ टिस्पून मेथीदाणे
२ तमालपत्र
१ टिस्पून लवंग
१ टिस्पून तेल
१/४ टिस्पून जायफळपूड
२ टेस्पून काश्मिरी लाल तिखट

कृती:
१) कढईत वरील सर्व मसाले [’काश्मिरी लाल तिखट आणि जायफळ पूड’ वगळून] एकत्र करावे. लाल तिखट आणि जायफळ पूड आपण शेवटी मसाला तयार झाल्यावर त्यात घालायचे आहे.
२) मिक्स केलेल्या सर्व मसाल्यांना १ टिस्पून तेल हलकेच चोळून घ्यावे. मिडीयम हाय आचेवर हे सर्व मसाले भाजून घ्यावे. भाजताना कालथ्याने सतत ढवळावे.
३) मिरचीच्या कडा थोड्या काळ्या होतील, मोहोरी तडतडेल, धणे-जिरे-तिळ थोडे ब्राऊन होईल. असे झाल्यावर मसाले भाजले गेलेत असे समजावे. तसेच मसाले भाजले गेल्याचा छानसा वासही येईल. मसाले खुप काळपट भाजू नयेत किंवा करपवू नयेत.
४) भाजलेले मसाले लगेच दुसर्‍या ताटात पसरवून ठेवावेत. गार झाले कि मिक्समध्ये बारीक वाटावेत. तयार मसाल्यात जायफळ पूड आणि रंगासाठी २ टेस्पून काश्मिरी लाल तिखट घालावे.
तयार मसाला घट्ट झाकणाच्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून कोरड्या जागी ठेवावा.

टीपा:
१) लाल तिखट मिरच्या वापराव्यात. मी १/२ कप तिखट लाल मिरच्या आणि १/२ कप काश्मिरी मिरच्या वापरल्या होत्या. काश्मिरी लाल मिरच्यांना फारसा तिखटपणा नसतो. पण रंग फार सुरेख येतो. म्हणून १ कप मिरच्या कशा प्रमाणात घ्यायच्या किंवा पूर्ण लाल तिखट मिरच्या घ्यायच्या ते आवडीनुसार ठरवावे.
२) मसाले पूर्ण गार होत नाहीत तोवर मिक्सरमध्ये बारीक करू नयेत. जर केल्यास मसाल्याला दमटपणा येतो आणि मसाला मोकळा रहात नाही.

No comments:

Post a Comment