आवोकाडो हे खुप पौष्टीक आणि चविष्ट असे फळ आहे. भारतात आवोकाडो पाहायला मिळत नाही पण अमेरीकेतील बाजारात तरी अगदी सहज available असतो. कॉर्न चिप्सबरोबर आवोकाडो डीप किंवा ग्वाकामोले संध्याकाळच्या खाण्यासाठी चांगला आणि healthy पर्याय आहे. त्याचीच ही झटपट कृती.
आवोकाडोच्या औषधी गुणधर्मांविषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा - Avocado Health Benefits.
वाढणी: २ जणांसाठी
१ पिकलेला आवोकाडो (टीप १)
१/४ कप लाल कांदा, एकदम बारीक चिरलेला
१/४ कप लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
२ टिस्पून लिंबू रस
१ लहान हिरवी मिरची, बारीक चिरून
किंचीत मिठ
१/८ टिस्पून मिरपूड
कृती:
१) आवोकाडोमधील गर काढून घ्यावा. एका बोलमध्ये आवोकाडोमधील गर काट्याने (Fork) मॅश करून घ्यावा. पूर्ण मॅश करू नये, किंचीत गुठळ्या राहू द्याव्यात.
२) मॅश केलेल्या आवोकाडोमध्ये लिंबाचा रस, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि मिरची घालून मिक्स करावे. थोडे मिठ आणि मिरपूड घालावी.
ग्वाकामोले किंवा आवोकाडो डिप, टॉर्टीया चिप्सबरोबर खुपच छान लागतो तसेच मेक्सिकन राईस आणि इतर मेक्सिकन डिशेस बरोबर मस्त जमून जातो.
टीप:
१) कच्च्या आवोकाडोचे साल गर्द हिरवे असते, तर पिकलेल्या आवोकाडोचे साल काळपट हिरवे झालेले असते. पण आवोकाडो घेताना खुप जास्त पिकलेलाही घेऊ नये, निट तपासून घ्यावा. सर्व बाजूंनी firm असला पाहिजे. कधी कधी जास्त पिकलेला आवोकाडो आतून खराब निघतो, तसेच चवीलाही चांगला लागत नाही.
२) ग्वाकामोले जर थोडा थंड करायचा असेल तर ग्वाकामोले एका काचेच्या बोलमध्ये ठेवून त्यावर प्लास्टिक रॅप करून तासभर फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे काळपट पडणार नाही. तासाभराने थंड ग्वाकामोले, टॉर्टीया चिप्सबरोबर सर्व्ह करावे.
३) कांदा टोमॅटोचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करावे.
४) खायच्या आधी टॉर्टीया चिप्स ओव्हनमध्ये ५ मिनीटे बेक करावे, गरम चिप्समुळे चव खुप छान लागते आणि चिप्स जास्त कुरकूरीतही लागतात.
No comments:
Post a Comment