Showing posts with label Snacks. Show all posts
Showing posts with label Snacks. Show all posts

Thursday, October 6, 2011

इडली पिठाचे अप्पे - Appe

Appe in English

वेळ: २० मिनिटे
१५ अप्पे

south indian appe recipe, appe, sambar coconut chutneyसाहित्य:
२ ते अडीच कप इडलीचे आंबवलेले पीठ
१ टीस्पून आले पेस्ट
३-४ कढीपत्ता पाने बारीक चिरून (ऐच्छिक)
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून (ऐच्छिक)
दीड टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, भरडसर
चवीपुरते मीठ
२ ते ३ टेस्पून तेल, अप्पे बनवताना

कृती:
१) मीठ, आले पेस्ट,कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून इडलीचे पीठ मिक्स करावे.
२) अप्पे पात्र गॅसवर गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक कप्प्यात दोनदोन थेंब तेल घालावे. इडलीचे पीठ चमच्याने घालून कप्पे भरावेत. झाकण ठेवून मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे वाफ काढावी.
३) झाकण काढून अप्प्यांचे पृष्ठभाग तेलाने ब्रश करावे. अप्प्यांची बाजू पलटवावी. थोडेसे प्रेस करावे. परत झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे अप्पे वाफवून घ्यावेत.
गरम अप्पे चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

Tuesday, October 4, 2011

खजुराचे लाडू - Khajurache Ladoo

Dates Laddu in English

वेळ: १५ मिनिटे
१० ते १२ लहान लाडू

khajurache ladu, khajoor ladoo, dates ladduसाहित्य:
२५ खजूर, बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर वाटून १ कप)
१/२ कप बदाम, भरडसर वाटून
१/२ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून
१ टेस्पून तूप
१ टीस्पून खसखस

कृती:
१) खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
२) नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत.
शक्यतो एक ते दोन घासात संपेल इतपतच लाडूचा आकार असावा. खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.

टीपा:
१) साध्या खजूराप्रमाणेच काळ्या खजूराचेही अशाप्रकारे लाडू करू शकतो.
२) मी फक्त बदामच वापरले होते. आवडीनुसार पिस्ता किंवा काजू असे सर्व मिळून अर्धा कप वापरू शकतो. जर जास्त ड्राय फ्रुट्स वापरायची असतील तर खजूराचे प्रमाणही वाढवावे. नाहीतर लाडू नीट बांधले जात नाहीत.
३) तुपाचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.
४) मी बदामाच्या रेडीमेड काप मिळतात ते वापरले होते. ते शक्यतो वापरू नयेत कारण लाडू बांधायला थोडे त्रासदायक पडते.
५) खजूराला ओलसरपणा असावा. कोरडे खडखडीत खजूर लाडवांसाठी चांगले लागत नाहीत.

Saturday, September 24, 2011

मसाला टोस्ट सॅंडविच - Potato Masala Sandwich

Masala Toast Sandwich in English

वेळ: पूर्वतयारी- १५ मिनिटे | पाकृ साठी वेळ- १० मिनिटे
४ सॅंडविचेस

masala toast sandwich, masala sandwich, Indian sandwich recipe, potato masala sandwich, vegetable sandwichसाहित्य:
८ ब्रेडचे स्लाईस
२ ते ३ टेस्पून बटर, रूम टेम्परेचर
१/४ कप हिरवी चटणी
कांद्याचे पातळ गोल चकत्या
मसाला:
२ मोठे बटाटे, उकडलेले
३ टेस्पून हिरवे मटार (फ्रोझन)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १/४ टीस्पून हळद
४ ते ५ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
दीड टीस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मीठ

कृती:
मसाला
१) बटाटे सोलून मॅश करून घ्यावेत. कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी.
२) हिरवी मिरची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालून १५ सेकंद परतावे. कांदा घालून परतावे आणि झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यावे. नंतर मटार घालून झाकण ठेवून मटार शिजू द्यावे.
३) मॅश केलेले बटाटे घालावे. मिक्स करावे आणि झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी.

४) ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर लावावे. बटर लावलेल्या ८ पैकी ४ स्लाईस घेवून त्याला चटणी लावावी.
५) चटणी लावलेल्या ब्रेडवर तयार मसाल्याचा पातळ लेयर लावून घ्यावा. त्यावर कांद्याची एक चकती ठेवावी. वरती बटर लावलेला ब्रेड स्लाईस ठेवून किंचित प्रेस करावे.
६) बाहेरून थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे. जर टोस्टर नसेल तर सॅंडविच तव्यावर भाजावे. भाजताना किंचित दाब देउन दोन्ही बाजू लाईट ब्राऊन होईस्तोवर भाजावे.

गरम सॅंडविच हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) शक्यतो व्हाइट ब्रेड वापरावा.
२) मसाला तिखटसरच असावा. कमी तिखट मसाला असेल तर सॅंडविच मुळमुळीत लागतं.
३) मसाला बनवताना कमीतकमी तेल वापरावे. मसाला तेलकट झाला तर सॅंडविच चांगले लागत नाही.
४) जर लहान मुलांसाठी बनवायचे असल्यास मिरची अगदी कमी घालावी किंवा घालू नये.
५) चटणीमध्ये पुदिना पानेही घालू शकतो.

Thursday, July 28, 2011

दुधी भोपळ्याचे थालीपीठ - Dudhi Thalipeeth

Lauki Thalipeeth in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे

bottle gourd recipe, lauki pancakes, fasting recipes, fast recipes, vrat ka khana, dudhi bhoplyache thalipith, thalipeeth recipeसाहित्य:
१ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
दीड ते दोन कप उपवासाची भाजणी किंवा गरजेनुसार
३ हिरव्या मिरच्या, ठेचून
१/४ चूप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना

कृती:
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्याभागी तेल सोडायला बोटाने छिद्रं करावे.
३) मिडीयम आणि हायच्या मध्ये गॅस अडजस्ट करावा. झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे.

टीप:
१) दुधी बिनबियांचा आणि कोवळा असावा, म्हणजे किसायला सोपा जातो.
२) थालीपिठ शिजायला वेळ लागतो. जास्त थालीपीठं बनवताना वेळ वाचवण्यासाठी दोन शेगड्यावर दोन तवे वापरून थालीपीठं बनवावी.
३) काहीजण दुधी भोपळा उपवासाला खात नाहीत. म्हणून दुधीऐवजी काकडी किसून घालावी.

Thursday, July 14, 2011

पनीर लॉलीपॉप - Paneer Lollypop

Paneer Lollypop in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

paneer snacks, lollypop recipe, paneer lollypop, lollipop, साहित्य:
१ कप पनीर, किसलेले
२ मध्यम बटाटे, उकडलेले
दिड टीस्पून आले, किसलेले
१ टीस्पून लसूणपेस्ट
२ टीस्पून लाइट सोय सॉस
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
२ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/४ कप कांदा, बारीक चिरून
३ टेस्पून मैदा,
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
८ ते १० लाकडी स्टिकस किंवा बेबी कॉर्न्स

कृती:
१) बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
२) मैदा सोडून सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्यावे. मध्यम आकाराचे ८ ते ९ गोळे बनवावे.
३) १ गोळा घेऊन तो नीट दाबून घट्ट करावा व त्यात लाकडी स्टिक एका बाजूने घालावी. मुठीने नीट आवळून नीट बांधून घ्यावा, जेणेकरून तेलात सोडल्यावर गोळा सुटणार नाही. अशाप्रकारे सर्व लॉलीपॉप बनवून घ्यावे.
४) तयार लॉलीपॉप कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. किंचित हलवून जास्तीचा मैदा काढून टाकावा.
५) पुरेसे तेल तापवून आच मध्यम करावी आणि सर्व लॉलीपॉप तळून घ्यावे. तळताना मध्येमध्ये लॉलीपॉप झाऱ्याने फिरवावेत, म्हणजे सगळीकडून नीट तळले जातील.
गरमागरम लॉलीपॉप शेझवान सॉस किंवा टोमाटो केचप बरोबर सर्व्ह करावेत.

टीपा:
१) जे बटाटे शिजल्यावर चिकट होतात असे बटाटे वापरू नयेत.
२) आवडीनुसार हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी जास्त करावे.
३) आईसक्रीम कॅन्डीला जी लाकडी स्टिक असते ती वापरावी. प्लास्टिक किवा इतर मटेरियल वापरू नये जे तेलात जळू शकेल.

Thursday, June 30, 2011

मिरचीची भजी - Mirchichi Bhaji

Mirchi Pakoda in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनिटे

mirchichi bhajji, mirachi chi bhaji, mirchi pakoda, chili pakoda, evening snack, spicy snack, indian snack recipes, quick snack recipesसाहित्य:
८ ते १० लांबड्या मिरच्या
३/४ कप बेसन
१ टेस्पून तांदुळाचे पीठ
१/४ टीस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मिरच्या धुवून घ्याव्यात. एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात. (टीप)
२) बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.
३) तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात. मध्यम आचेवर टाळाव्यात.
गरमागरम सर्व्ह कराव्यात.

टीपा:
१) तुम्ही कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरत आहात त्यावर आतील बिया काढायच्या कि नाही ते ठरवावे. जर मिरच्या खूप तिखट असतील तर बिया काढाव्यात. किंवा काही जणांना भजी कदम झणझणीत असली तर आवडते. तर अशावेळी आवडीनुसार बिया कमी कराव्यात.
२) खूप जाड सालीच्या मिरच्या वापरू नये. त्या तळल्यावर पटकन शिजत नाहीत आणि भजी कचकचीत लागतात. त्यामुळे पातळ सालीच्या आणि मध्यम तिखट अशा मिरच्या घ्याव्यात.
३) मिरचीच्या आतील बिया काढून आत वेगवेगळे सारण भारत येईल. मी बटाट्याची तिखट भाजी (आले-लसूण लावून) आत भरली होती. आणि पिठात बुडवून नेहेमी प्रमाणे तळून काढली.

Friday, May 27, 2011

बेबी कॉर्न पकोडा - Baby Corn Pakoda

Baby Corn Pakoda in English

वेळ: १५ मिनिटे
३ जणांसाठी

baby corn snack, corn recipes, tea time snack, baby corn pakodaLinkसाहित्य:
१५ बेबी कॉर्न
३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून आमचूर
चवीपुरते मिठ
तळणीसाठी तेल

कृती:
१) बेबी कॉर्न धुवून साफ कपड्याने पुसून घ्यावी.
२) कॉर्न फ्लोअर एका लहान वाडग्यात घ्यावे. त्यात सर्व मसाले आणि मिठ घालून मिक्स करावे. या मिश्रणात २ ते ३ टेस्पून पाणी घालून मध्यमसर भिजवावे.
३) कढईत तेल तापवावे. तेल व्यवस्थित तापले कि आच मध्यम करावी.
४) कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात ३ ते ४ बेबी कॉर्न घोळवून घ्यावी. गरम तेलात तळावीत. सोनेरी रंग येईस्तोवर तळावी. अशा प्रकारे सर्व बेबी कॉर्न तळून घ्यावीत.
टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावीत.

Tuesday, May 3, 2011

पालक कॉर्न चिज सॅंडविच - Spinach Corn and cheese Sandwich

Spinach Cheese Sandwich in English

This is a delicious quick breakfast recipe and is equally healthy. You consume quite a good amount of spinach, when you eat 1 sandwich. If eaten moderately, cheese is very good for health as 1 cheese slice has goodness of 1 glass of milk. It's rich in vitamin B and calcium. Try light cheese for less fat and calorie content.


५ सॅंडविचेस
वेळ: १५ मिनीटे

Spinach sandwich, spinach corn sandwich, spinach cheese sandwichसाहित्य:
अडीच कप बारीक चिरलेला पालक
१/४ कप मक्याचे उकडलेले दाणे
२ मोठ्या लसूण पाकळ्या, सोलून बारीक चिरलेल्या
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१ टिस्पून बटर (+ अजून थोडे सॅंडविच भाजण्यासाठी)
१/२ कप किसलेले चिज
चवीपुरते मिठ
१० ब्रेडचे स्लाईस

कृती:
१) कढईत १ टिस्पून बटर गरम करावे. त्यात हिरवी मिरची, लसूण घालून १० सेकंद परतावे. नंतर पालक आणि मक्याचे दाणे घालावे.
२) पालक घातल्यावर लगेच मिठ घालावे आणि झाकण न ठेवता पालकातील पाण्याचा अंश निघून जाईस्तोवर परतावे.
३) मिश्रण ५ समभागात विभागून घ्यावे. एका ब्रेड स्लाईसवर १ भाग मिश्रण पसरवावे. त्यावर बर्‍यापैकी चिज घालावे. वरून दुसरा ब्रेड ठेवून सॅंडविच तयार करावे.
४) सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करावे. किंवा तव्यावर थोडे बटर घालून मध्यम आचेवर सॅंडविच दोन्ही बाजूंनी खरपूस करून घ्यावे. चिज वितळू द्यावे.
सुरीने दोन भाग करावे. टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) पालक एकदम बारीक चिरावा. तसेच पालक शिजला कि आकाराने आळतो. त्यामुळे मिठ अगदी थोडे घाला (२ चिमटी). पालक परतताना कढईवर झाकण ठेवू नये, पालकाचा रंग काळपट होतो.
२) चिज भरपूर घाला. पालक आणि चिज यांचे कॉंबिनेशन फार छान लागते. तसेच, जर चिज कमी घातले तर नुसता पालक आणि ब्रेड खुप चांगले लागत नाही.
३) लहान मुलांसाठी बनवताना मिरची घालू नये.

Tuesday, April 19, 2011

उकडपेंडी - Ukadpendi

ukadpendi in English

वेळ: १५ मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी

ukadpendi, maharashtrian recipes,breakfast recipes, snacks, quick breakfastसाहित्य:
१/२ कप रवाळ कणिक
३ टेस्पून तेल
१/४ कप कांदा, बारीक चिरून
४ ते ५ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी: चिमटीभर मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या
१/२ कप दही, घोटलेले
१/४ कप पाणी (टीप १)
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. कणिक मध्यम आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावी (साधारण ५ ते ७ मिनीटे). भाजलेली कणिक लहान वाडग्यात काढून ठेवावी.
२) त्याच कढईत १ टेस्पून तेल घालावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा घालून गुलाबीसर होईस्तोवर परतून घ्यावा. मिठ घालून मिक्स करावे.
३) भाजलेली कणिक घालून एक-दोन मिनीट मिक्स करावे. दही आणि पाणी मिक्स करावे आणि हे मिश्रण कढईत ओतावे. आणि पटापट मिक्स करावे. मिश्रणाचा गोळा तयार होईल. एकदम व्यवस्थित मिक्स करावे, गुठळी होवू देऊ नये. झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनीटे वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.

टीपा:
१) उकड पातळ किंवा घट्ट हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे. वरील कृतीमध्ये घट्ट उकड होईल एवढे पाण्याचे प्रमाण दिले आहे. पण उकड पातळ हवी असेल तर पाणी जास्त घालावे.
२) उकड ही कच्चं तेल घालून, चांगली मळून मग खातात. त्यासाठी घट्ट उकड करावी. गरमच असताना परातीत घेऊन थोडे तेल घालून लगेच मळावी. गरम मळताना चटका बसतो म्हणून उकड मळण्यासाठी लाकडी चकती मिळते ती वापरावी. ती जर नसेल तर खलबत्त्यातील खलायचे भांडे घ्यावे. त्याच्या तळाला तेल लावून त्याने मळावी. गरम गरम उकड सर्व्ह करावी.
३) लाल मिरची ऐवजी काहीजण हिरवी मिरची किंवा लाल तिखटही वापरतात.
४) कांदा हा ऐच्छिक आहे. पण चव चांगली येते कांद्यामुळे. तसेच कांद्याऐवजी लसूण वापरता येते. अधिक पौष्टीक बनवायची असल्यास मटार, गाजराचे तुकडे, भिजवलेली मूग-मटकीही घालू शकतो.
५) ही उकड तांदूळाची, बेसनाची, ज्वारीच्या पिठाची करता येते. पद्धत हीच फक्त पिठ वेगवेगळे वापरावे. किंवा मिश्र पिठाची सुद्धा उकड बनवता येते.

Thursday, March 17, 2011

नूडल्स फ्रॅंकी - Noodles Frankie

Noodles Frankie in English

लहान मुलांसाठी हि रेसिपी बनवण्यापुर्वी तळटीप वाचा.

वेळ: ४० मिनीटे
नग: ६ ते ८ मध्यम फ्रॅंकीज

noodles frankie, chinese recipe, spicy chinese recipes, noodles, hakka noodles, frankie recipeसाहित्य:
नूडल्स स्टफिंग
१ मिडीयम नूडल्स केक (५० ते ७० ग्राम)
१ कप कोबी, पातळ उभी चिरून
१/२ कप गाजर, पातळ उभे कापून
१ लहान पाती कांद्याची जुडी
१/२ कप भोपळी मिरची, पातळ उभे काप
१ टिस्पून तेल
१ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१ टिस्पून रेड चिली सॉस
१ टिस्पून ग्रिन चिली सॉस
१/२ टिस्पून सोयासॉस
फ्रॅंकी रॅप्स
३/४ कप मैदा
२ टेस्पून तेल
१/२ टिस्पून मिठ

कृती:
१) ४ कप पाणी उकळण्यास ठेवावे. पाणी उकळले कि नूडल्स शिजवून घ्याव्यात. नूडल्स शिजल्या कि गरम पाण्यातून काढून गार पाण्यात टाकाव्यात.
२) पॅनमध्ये १ टिस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून ५ सेकंद परतावे. आता भोपळी मिरची, गाजर, कोबी घालून परतावे. लगेच रेड चिली सॉस, ग्रिन चिली सॉस, सोयासॉस आणि मिठ घालून मिक्स करावे. खुप जास्तवेळ परतू नये, नाहीतर भाज्या मऊ होतात. आता नूडल्स घालून मिक्स करावे. हे मिश्रण एका वाडग्यात काढून ठेवावे. गरम पॅनमध्ये नूडल्स तशाच ठेवल्या तर नूडल्स जास्त शिजून चिकट होतात.
३) मैदा, २ टेस्पून तेल, मिठ आणि पाणी घालून एकदम मऊ मळून घ्यावे.
४) मळलेले पिठ ६ समान भागात आणि नूडल्स ६ भागात विभागून घ्यावे. मळलेल्या पिठाची पातळसर पोळी लाटून घ्यावी. तोडे तेल घालून निट भाजून घ्यावी. १ भाग नूडल्स पोळीच्या मधे उभट पसरवावी. नंतर दोन्ही बाजू एकावर एक ठेवून फ्रॅंकी तयार करावी. कालथ्याने थोडे प्रेस करून थोडे गरम होवू द्यावे.
गरम फ्रॅंकी टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
वरील रेसिपी लहान मुलांसाठी बनवायची असल्यास रेड चिली सॉस, ग्रिन चिली सॉस आणि हिरवी मिरची घालू नये. त्याऐवजी थोडा टोमॅटो केचप घालावा.

Thursday, February 24, 2011

हराभरा कबाब - Hara Bhara Kabab

Hara Bhara Kabab in English

वेळ: ४० मिनीटे
नग: १० ते १२ मध्यम कबाब

harabhara kabab, snacks, indian appetizer, easy appetizer recipeसाहित्य:
१५ ते २० पालकाची पाने
२ मध्यम बटाटे, उकडून सोललेले व मॅश केलेले
३/४ कप मटार, वाफवलेले
२ ते ३ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून गरम मसाला
१/२ टिस्पून आमचूर पावडर
चवीपुरते मिठ
तळणासाठी तेल
८ ते १० काजू पाकळ्या (विलग करून) (ऐच्छिक)

कृती:
१) सर्वप्रथम पालकाची पाने ब्लांच करून घ्यावीत. - साधारण २ ते ३ कप पाणी उकळण्यास ठेवावे. पाणी उकळले कि पालकाची पानं घालावी आणि २ मिनीटे चमच्याने ढवळावे. नंतर पानं गरम पाण्यातून काढून गार पाण्यात बुडवावीत.
२) हलकेच पालकातील पाणी पिळून घ्यावे. नंतर लहान मिक्सीमध्ये घालावीत. त्यात वाफवलेले मटार, हिरव्या मिरच्याही घालाव्यात. पाणी न घालता किंचीत भरडसर वाटून घ्यावे.
३) हे वाटण मध्यम वाडग्यात घालावे. यात आलं, मॅश केलेले बटाटे, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर, कॉर्न फ्लोअर आणि मिठ घालून मिक्स करावे.
४) हाताला तेल लावून घ्यावे आणि मिश्रणाचे मध्यमसर समान गोळे करून गोल आकार द्यावा. पृष्ठभाग (सरफेस) एकदम प्लेन असावा. तयार कबाब किंचीत दाबून चपटे करावे आणि एका बाजूला काजू चिकटवावा. मिडीयम-हाय आचेवर गुलाबीसर रंग येईस्तोवर तळावे.

टीप:
१) बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यावे, गुठळी राहू देवू नये.
२) मिश्रण गरजेइतके कोरडे राहण्यासाठी पालक निट पिळून घ्या. तसेच मटार वाफवल्यावर व्यवस्थित निथळून घ्या. कारण मिश्रण ओलसट झाले तर जास्त कॉर्न फ्लोअर घालावे लागेल आणि त्यामुळे चव बिघडेल.
३) जर एकदम हिरवेगार कबाब हवे असतील तर किंचीत (लहान चिमटी) खायचा हिरवा रंगही घालू शकतो.

Monday, February 14, 2011

बेसिक एगलेस केक - Eggless sponge cake

Eggless Vanilla Cake in English

पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ ते ४० मिनीटे
नग: १० लहान तुकडे

eggless cake, cake without egg, plain sponge cake recipeसाहित्य:
३/४ कप मैदा
२०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ कप + २ ते ४ चमचे)
१/४ कप बटर (मिठविरहित)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)

कृती:
१) प्रथम ओव्हन ३५० F (१८० C) ला प्रिहिट करत ठेवावे. तसेच केक टीनला (बेक करण्यासाठीचा डबा) आतून बटरचा हात लावून तयार ठेवावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. मिश्रण एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेनुसार मिश्रण एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे.
५) तयार मिश्रण केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). केक टीन ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर ठेवावा आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. ३५ मिनीटे होईस्तोवर ओव्हन अजिबात उघडू नये. ओव्हन बेकिग करताना मधेमधे उघडल्यास ओव्हनचे तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण ३५ ते ३७ मिनीटांनंतर केकच्या मध्यभागी टूथपिकने किंवा सुरीने खालपर्यंत टोचून तशीच टूथपिक बाहेर काढावी. जर टूथपिकला ओलसट मिश्रण चिकटले नसेल तर केक बेक झाला असे समजावे. जर टूथपिकला ओलसट मिश्रण लागलेले असेल तर अजून थोडावेळ केक बेक करावा.
एकदा का केक बेक झाला कि ५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.


टीप:
१) केक टीनचे बरेच आकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात, जसे की बदाम, गोल, अंडाकृती, चौकोन इत्यादी. तसे केकटीन वापरून विविध आकारात आपण केक बनवू शकतो.
२) वरील प्रमाणातून २ ते ३ जणांसाठी केक बनवता येईल. जर जास्त प्रमाणात केक बनवायचा असेल तर दुप्पट किंवा तिप्पट प्रमाण घेऊन केक बनवावा.
३) वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. मी ८" लांब x ३" रूद असा केकटीन वापरला होता. मिश्रण टीनमध्ये ओतल्यावर, तळापासून दिड ते २ इंच उंचीपर्यंत टीन भरला होता. वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. जर तुमच्याकडे मोठा केकटीन असेल तर मिश्रण दुप्पट घ्या.
४) प्लेन सोडा वॉटरच वापरावे. सोडा वॉटरमुळे केक हलका होतो. कोक, पेप्सी, जिंजर एल, लेमन सोडा वापरू नये. यामुळे केकच्या चवीत फरक पडेल.
५) सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर मिश्रणाची चव पाहावी. जर मिश्रण अगोड वाटले तर काही चमचे कंडेन्स मिल्क घालून मिक्स करावे आणि मगच बेक करावे.

Thursday, February 10, 2011

स्टफ पनीर पराठा - Stuffed Paneer Paratha

Stuffed Paneer Paratha in English

वेळ: ४० मिनीटे
नग: ६ ते ८ मध्यम पराठे

paneer paratha, paneer stuffed paratha, stuffed paneer paratha, paratha recipes, punjabi paratha recipes, Indian paratha recipes, indian paneer cheese, cottage cheese recipesसाहित्य:
स्टफिंग
२ कप किसलेले पनीर
३-४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून किंवा पेस्ट करून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरेपूड, १ टिस्पून धणेपूड, १/२ टिस्पून आमचूर पावडर, १/२ ते १ टिस्पून किसलेले आले
चवीपुरते मिठ
आवरणासाठी
३/४ कप मैदा
१ कप गव्हाचे पिठ
१/४ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
१/४ कप दही
गरजेनुसार पाणी
२ टेस्पून तेल
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
१/२ टिस्पून मिठ
इतर साहित्य
बटर किंवा तेल पराठे भाजण्यासाठी
पराठे लाटायला थोडे कोरडे पिठ

कृती:

१) किसलेले पनीर एका बोलमध्ये घ्यावे. त्यात मिरची, कोथिंबीर, धणे-जिरेपूड, आमचूर, आलं आणि मिठ घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
२) बाहेरील कव्हरसाठी मैदा, कणिक, जिरे, हळद, लाल तिखट, दही, कोथिंबीर, तेल आणि मिठ घालून मिक्स करावे. गरजेनुसार पाणी घालून मध्यमसर मळून घ्यावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कणकेचे ६ किंवा ८ समान गोळे करावेत. मिश्रणाचेसुद्धा तितकेच समान भाग करावेत.
४) कणकेचा १ गोळा ३ ते साडेतीन इंचाचा लाटून घ्यावा. त्याच्या मध्यभागी १ भाग मिश्रणाचा ठेवावा. सर्व बाजू एकत्र वरती आणाव्यात आणि गोळा बंद करावा. थोड्या पिठावर लाटून तेलावर किंवा बटरवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा.
गरमागरम पराठे चटणीबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) कोथिंबीरीबरोबर आवडत असल्यास पुदीन्याची पाने बारीक चिरून घातली तरी छान स्वाद लागतो.
२) जिरे घालण्याऐवजी ओवा घातला तरी चांगली चव येते.

Thursday, January 20, 2011

हक्का नुडल्स - Hakka Noodles

Hakk Noodles in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी

hakka noodles, chinese noodles recipe, Indo chinese recipeसाहित्य:
२ नूडल्स केक्स (५० ग्राम प्रत्येकी)
१ टेस्पून तेल
१/२ टेस्पून सोया सॉस
५ मोठ्या लसूण पाकळ्या
१/२ इंच आलं
१ टेस्पून मसाला चिली सॉस (मी मॅगी मसाला चिली सॉस वापरला होता) (टीप १ व २)
१ टेस्पून टोमॅटो पेस्ट
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून व्हिनेगर
भाज्या: भोपळी मिरची, गाजर, कोबी, मश्रुम, पाती कांदा - पातळ उभे चिरून
(भाज्या सममसान घ्याव्या तसेच शिजलेल्या नूडल्सच्या १/३ प्रमाणात असाव्यात)
२ ते ३ टेस्पून पाती कांदा, बारीक चिरून

कृती:
१) जवळजवळ ६ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात १-२ चमचे मिठ घालावे. पाणी उकळले कि नूडल्स घालाव्यात आणि शिजू द्याव्यात. नूडल्स ९०% शिजल्या कि लगेच गार पाण्यात घालाव्यात.
२) लसूण+आलं+चिली सॉस+टोमॅटो पेस्ट एकत्र करून बारीक पेस्ट बनवून घ्यावी.
३) कढईत तेल तापवावे. त्यात तयार केलेली पेस्ट घालून परतावे. काही सेकंद परतावे.
४) भाज्या घालून साधारण १० ते १२ सेकंद, मोठ्या आचेवर परतावे. नंतर नूडल्स मधील पाणी काढून त्या घालाव्यात. सोया सॉस घालून निट मिक्स करावे. शेवटी व्हिनेगर घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे. पाती कांदा वरती सजवावा व गरमा गरम सर्व्ह करावे.

टीपा:
१) लहान मुलांसाठी बनवताना चिली सॉस न वापरता साधा टोमॅटो सॉस वापरावा. तसेच आलं लसूणसुद्धा तिखटपणा वाढवते. त्याचे प्रमाण कमी करावे.
२) मसाला चिली सॉस बर्‍यापैकी तिखट असतो. पण अजून तिखटपणा वाढवायचा असल्यास चिमूटभर रेड चिली फ्लेक्स नूडल्सवर पेरावे.

Tuesday, January 18, 2011

इंस्टंट रवा इडली - Instant Rava Idli

Rava Idli in English

साधारण १५ ते १८ मध्यम इडल्या
वेळ: साधारण ३५ ते ४० मिनीटे (मिश्रण बनविण्यास १५ मिनीटे + इडली वाफवणे व वाफ जिरणे २० ते २५ मिनीटे)

rava idli,south indian idli recipe, tiffin recipe, idli sambar, idli chutney, Sooji Idliसाहित्य:
१ कप जाड रवा
१ टिस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, चिमूटभर हिंग, १/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ ते १ टिस्पून चणाडाळ, ४ ते ५ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून किसलेले आले
१/२ कप आंबट दही, घोटलेले
१/२ कप पाणी
चवीपुरते मिठ
१ टिस्पून इनो फ्रुट सॉल्ट (इनो सोडा)

कृती:
१) मध्यम आचेवर, कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग घालावे. आधी चणाडाळ घालून परतावे आणि थोडा रंग बदलला कि उडीद डाळ घालावी. उडीद डाळीचा रंग गुलाबीसर झाला कि कढीपत्ता पाने घालावीत आणि किसलेले आले घालावे. त्यावर १ कप जाड रवा घालून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर भाजावे.
२) भाजलेला रवा एका खोलगट भांड्यात काढून घ्यावा. दुसर्‍या भांड्यात घोटलेले दही आणि पाणी मिक्स करून त्याचे घट्टसर ताक बनवावे. रवा थोडा कोमट झाला कि त्यात हे ताक घालावे (टीप २). चवीपुरते मिठ घालून निट मिक्स करून घ्यावे. मिक्स करून १० मिनीटे तसेच ठेवावे. कंसिस्टन्सी नेहमीच्या इडली पिठाएवढीच असावी, खुप घट्ट किंवा पातळ नसावी.
३) इडली कूकरमध्ये (महत्त्वाची टीप ४) तळाला साधारण दिड इंच पाण्याची पातळी ठेवावी आणि पाणी गरम करण्यास ठेवावे. इडली पात्राला तेलाचा किंचीत हात लावून घ्यावा (टीप ३). मिश्रणात इनो सोडा घालून एकाच दिशेने मिक्स करावे आणि मिश्रण इडली पात्रात भरावे.
४) पाण्याला उकळी फुटली कि इडली स्टॅंड कूकरमध्ये ठेवून १२ ते १५ मिनीटे इडल्या वाफवाव्यात. ८ ते १० मिनीटे वाफ जिरल्यावर कूकर उघडून इडल्या चमच्याच्या टोकाने व्यवस्थित सोडवून घ्याव्यात.

टीप:
१) वरील पाककृती साधी मसाला इडलीची आहे. जर हवे असल्यास किसलेले गाजर, मटार अशा भाज्याही इडलीत घालू शकतो. वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे भाज्या दिसायला हव्या असतील तर, इडली साच्यात आधी चिरलेल्या किंवा किसलेल्या भाज्या ठेवून वर इडलीचे पिठ घालावे. तसेच इडली पिठात डायरेक्ट भाज्या मिक्स करू शकतो, पण त्यामुळे इडल्यांचा रंग बदलतो.
२) रवा जर थोडा जास्त भाजला गेला असेल तर पाणी शोषून घेतल्याने मिश्रण घट्ट होते, तेव्हा कदाचित थोडे पाणी जास्त घालावे लागेल. मिश्रणाची कंसिस्टन्सी नेहमीच्या इडली पिठाएवढीच असावी, खुप घट्ट किंवा पातळ नसावी.
३) जर तुमच्या इडली पात्रात कमी इडल्या बनत असतील तर मिश्रण २ भागात विभागून घ्यावे. एक भागात १/२ टिस्पून सोडा घालून इडल्या वाफवून घ्याव्यात आणि नंतर उरलेल्या मिश्रणात सोडा घालून इडल्या बनवाव्यात. अशाप्रकारे २ बॅचेस कराव्यात. सर्व मिश्रणात एकदम सोडा घालू नये.
४) जर साधा कूकर वापरणार असाल तर कूकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवावी.

Saturday, January 8, 2011

ओटमिल कूकिज - Oatmeal Cookies

Oatmeal Cookies in English

वेळ: ४५ मिनीटे
नग: साधारण १५ कूकिज

साहित्य:
दिड कप मैदा
१/२ टेस्पून बेकिंग पावडर
१ टिस्पून बेकिंग सोडा
१ बटर स्टिक, मऊसर (१/२ कप)
१ + १/४ कप ब्राऊन शुगर
एग रिप्लेसर पावडर, २ अंड्यासाठी
१ टिस्पून वॅनीला
दिड कप ओट्स
१ कप चॉकोलेट चिप्स किंवा चंक्स

कृती:
१) ओव्हन ३५० F (१७५ C) वर प्रिहीट करावे
२) ओव्हन गरम होतय तोवर मध्यम भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्यावा.
३) एका मोठ्या खोलगट भांड्यात बटर आणि ब्राऊन शुगर हलके होईस्तोवर फेसावे. एग रिप्लेसर पावडरमध्ये पाकिटावर लिहिलेल्या प्रमाणात पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण घालून बटर+साखर फेटावे. त्यात मैदा घालून मिक्स करावे.
४) आता ओट्स घालून हातानेच मिक्स करावे. चॉकोलेट चिप्स घालून व्यवस्थित मिक्स करावे.
५) मिश्रण, ग्रिस केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये आईसक्रिम स्कूपने एक-दोन इंचाच्या अंतरावर ठेवावे. नंतर स्कूप केलेले मिश्रणाचे गोळे हाताने दाब देऊन चपटे करावे. ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर ट्रे ठेवून १६ ते १८ मिनीटे बेक करावे.
बेक झाल्यावर ट्रे बाहेर काढून कूकिज गार होवू द्याव्यात.

टीप:
१) कूकिमध्ये चॉकोलेट चिप्स बरोबर बेदाणे किंवा ड्राईड क्रॅनबेरीज घालू शकतो.
२) बेकिंगसाठी लागणारा वेळ ओव्हनच्या हिटींग पॉवरवर तसेच कूकिजच्या आकारावर अवलंबून आहे. त्यामुळे जर कूकिजचा शेप लहान असेल तर बेकिंगसाठी १४ मिनीटे पुरेशी होतील.
३) एग रिप्लेसर पावडरऐवजी २ मध्यम अंडी घालू शकतो.

Tuesday, January 4, 2011

दलिया इडली - Daliya idli

Daliya Idli in English

वेळ: पूर्वतयारी- २० मिनीटे (दलिया भिजवणे वगळून) । पाकृसाठी- ३५ ते ४० मिनीटे
नग: १५ ते १७ मध्यम इडल्या

daliya idli, daliya recipe, daliya sheera, dalia idli recipe, marathi breakfast, indian breakfast recipe, healthy breakfastसाहित्य:
१ कप दलिया रवा
२ कप गरम पाणी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, २ हिरव्या मिरच्या
४ ते ५ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ टिस्पून चणाडाळ
१ टिस्पून किसलेले आले
१/२ कप आंबट दही
चवीपुरते मिठ
१ टिस्पून इनो सोडा
इडली स्टॅंड
इडल्या वाफवायला इडली कूकर किंवा साधा मोठा कूकर

कृती:
१) दलिया गरम पाण्यात ४ तास भिजत घालावा. दलिया भिजल्यानंतर त्यातील अधिकचे पाणी काढून ठेवावे, पुर्ण पाणी काढले नाही तरी चालेल (टीप १). पाणी काढलेला दलिया मिक्सरमध्ये मध्यम वाटून घ्यावा.
२) कढल्यात तेल गरम करावे. त्यात आधी डाळी घालून गुलाबी होईस्तोवर परताव्या. नंतर मोहोरी, हिंग, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हि फोडणी वाटलेल्या दलियामध्ये घालावी.
३) यामध्ये दही, किसलेले आले आणि मिठ घालून मिक्स करावे. मिश्रण तांदूळाच्या इडलीसाठी जे मिश्रण असते तितपतच दाट असावे. लागल्यास दलिया भिजवून जे पाणी ठेवले होते ते घालावे.
४) कूकरमध्ये तळाला अडीच ते ३ इंच पातळीपर्यंत पाणी घालावे. गॅस सुरू करावा. इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा.
५) मिश्रणाचे दोन भाग करावे (टीप ६). एका भागात १/२ टिस्पून सोडा घालावा. मिक्स करून इडली पात्रात भरावे.
६) कूकरमधील पाण्याला उकळी आली कि इडली स्टॅंड कूकरमध्ये ठेवावा. वरून झाकण लावावे. साधा कूकर वापरत असाल तर झाकणावरची शिट्टी काढून ठेवावी.
७) १२ ते १५ मिनीटे वाफवावे. गॅस बंद करून ७-८ मिनीटे वाफ जिरू द्यावी.
८) नंतर इडल्या चमच्याने काढाव्यात (टीप २). परत कूकरमध्ये पाणी गरम करून वरीलप्रमाणेच इडल्यांची दुसरी बॅच करावी.

टीप:
१) दलिया भिजवल्यावर जर जास्त पाणी उरले तर ते फेकून न देता सांबार बनवायला वापरावे. मी वापरले होते, चवीत फरक पडत नाही.
२) या इडल्या अख्ख्या गव्हाच्या असल्याने थोड्या चिकट राहतात व जास्त फुलत नाही. म्हणून पूर्ण वाफ मुरल्यावरच इडल्या चमच्याने काढाव्यात. थंड झाल्या तरी मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकतो.
३) या इडल्या जरा सालट लागतात. म्हणून शक्यतो या इडल्या फक्त चटणीबरोबर खाऊ नयेत. जोडीला सांबारही बनवावे.
४) डायबेटीस पेशंट्स किंवा ज्यांना तांदूळ न खायचे पथ्य आहे त्यांच्यासाठी न्याहारीचा उत्तम उपाय.
५) यामध्ये आवडीनुसार भाज्याही घालू शकतो.
६) माझ्याकडे असलेला इडली स्टॅंड लहान आहे आणि त्यात नऊच इडल्या होतात. तुमच्याकडे जर १२ किंवा १६ कप्प्यांचा स्टॅंड असेल तर एकाच वेळी तुम्ही सर्व इडल्या करू शकता.

Thursday, December 30, 2010

मसाला पापड - Masala Papad

Masala papad in English

वेळ: १० ते १५ मिनीटे
नग: ४
masala papad, punjabi masala papad, quick easy appetizer recipe, masala papad recipeसाहित्य:
४ उडदाचे पापड (५ ते ६" व्यास)
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१/४ कप टोमॅटो, बारीक चिरून
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ टिस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
१/२ टिस्पून चाट मसाला
१ टिस्पून लिंबू रस (ऐच्छिक)
चवीनुसार मिठ
तेल, पापड तळण्यासाठी

कृती:
१) एका कढईवजा पॅनमध्ये पापड बुडण्याइतपत तेल गरम करावे. नेहमीप्रमाणे पापड तळून घ्यावे.
२) चिरलेल्या कांद्याला थोडा लिंबाचा रस चोळून घ्यावा.
३) पापडावर चाट मसाला आणि लाल तिखट भुरभूरावे. कांदा टोमॅटो पसरावा. मिठ पेरावे.
कोथिंबीरीने सजवून लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) नेहमीच्या लहान कढईत पापड तळला तर कधीकधी फोल्ड होतो. अशावेळी पसरट पॅनमध्ये तळल्यास पापड फोल्ड होत नाही तसेच तळायला तेलही कमी लागते.
२) लिंबाच्या रसामुळे खुप छान चव येते. परंतु, जर लिंबाचा रस वापरणार असाल तर मसाला पापड लागलीच सर्व्ह करावा नाहीतर लगेच मऊ पडतो.
३) मी जिरं असलेला उडदाचा पापड वापरला होता. शक्यतो प्लेन उडीद पापड वापरावा. आवडीनुसार वेगळ्या फ्लेवरचा उडदाचा पापड वापरला तर थोडी वेगळी चव येते. मिरी फ्लेवरचा पापड वापरला तर लाल तिखट कमी घालावे किंवा घालूच नये.
४) पापड भाजला तरीही चालतो. पण, भाजका पापड कांदा-टोमॅटोतील पाणी शोषून लगेच मऊ पडतो.
५) सजावटीसाठी बारीक शेव वापरली तर पापड अजून आकर्षक दिसतो.

Tuesday, December 28, 2010

गुळपोळी - gulpoli

Gulpoli in English

वेळ: साधारण २ तास
नग: जवळपास २५ मध्यम गुळपोळ्या

साहित्य:
सारणासाठी
१/२ किलो गूळ
१ कप बेसन
२ सुक्या नारळाच्या वाट्या
३/४ कप तिळ
१/२ कप शेंगदाणे
१/२ कप खसखस
१/२ कप तेल
आवरणासाठी
दिड कप मैदा
३/४ कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
२ टेस्पून बेसन (ऐच्छिक)

कृती:
१) सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईस्तोवर कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे. कमी असल्यास अजून थोडं खोबरं भाजून चुरा करावा.
२) तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
३) शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकावीत आणि एकदम बारीक कूट करून घ्यावा.
४) एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात १/२ कप तेल गरम करावे. त्यात १ कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
५) गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
६) मैदा, कणिक, मिठ आणि बेसन (ऐच्छिक) एकत्र करावे. २ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधं तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवणे.
७) सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
८) आवरणासाठी आपल्याला "१ सारण गोळ्याला २ पिठाचे गोळे" हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
९) २ पिठाच्या लाटयांमध्ये १ सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
१०) मिडीयम हाय हिटवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.

टीप्स:
१) पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.

Tuesday, December 14, 2010

सोया व्हिट नानकटाई - Soya Wheat Nankatai

Nankatai in English

वेळ: ३० ते ४० मिनीटे
नग: २० ते २२ मध्यम नानकटाई

nanakatai, homemade nankatai, nankatai recipe, shortbread recipe, eggless biscuits, eggless cookiesसाहित्य:
८ टेस्पून अनसॉल्टेड बटर (१/२ कप)
६ टेस्पून पिठी साखर
१/२ कप गव्हाचे पिठ
१/२ कप सोयाबिन पिठ
१/४ टिस्पून बेकिंग पावडर
१/४ टिस्पून वेलची पावडर
२ टेस्पून पिस्त्याचे काप

कृती:
१) नानकटाई बनवण्यापूर्वी बटर २ तास फ्रिजबाहेर काढून ठेवावे म्हणजे एकदम मऊसर होईल. एका मध्यम आकाराच्या खोलगट ताटलीत बटर आणि साखर घ्यावी. आणि मिश्रण हलके होईस्तोवर जोरजोरात फेसावे.
२) ३५० डीग्री F (१७५ डीग्री सेल्सियस) वर ओव्हन प्रिहीट करावे.
३) बेकिंग ट्रे ला तूपाचा किंवा बटरचा हात लावून तयार ठेवावा. वरील प्रमाणासाठी साधारण २ ट्रे लागतील. एकच ट्रे असल्यास दोन विभागात नानकटाई बनवावी.
४) सोयाबिन पिठ, गव्हाचे पिठ, वेलची पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. चाळणीत जर पिठाचे गोळे अडकले असतील तर ते फोडून घ्यावेत. चाळलेले पिठ, बटर-साखरेच्या मिश्रणात घालावे आणि हाताने मळावे. व्यवस्थित गोळा तयार करावा. (कदाचित एखादा चमचा पिठ वाढवावे लागेल)
५) तयार गोळ्याचे साधारण २० ते २२ समान भाग करावे (१ इंच). प्रत्येक गोळा एकमेकापासून २ इंचाच्या अंतरावर ठेवावा. एका ट्रेमध्ये साधारण १२ ते १४ गोळे बसतील. प्रत्येक गोळ्यावर पेढ्याला लावतो तसे पिस्त्याचे काप लावून चेपावे.
६) ओव्हनच्या मधल्या रॅकमध्ये ट्रे ठेवावा व साधारण १२ ते १४ मिनीटे बेक करावे. बेक केल्यावर ट्रे बाहेर काढावा आणि गार होवू द्यावा. १५ मिनीटांनी खुसखूशीत अशा नानकटाई खाण्यासाठी तयार होतील.

टीपा:
१) मिठ नसलेले बटर वापरावे. बटर नसल्यास मऊसूत घरगूती लोणी वापरले तरी चालेल.
२) नानकटाईच्या मिश्रणात बदाम, काजू, पिस्त्याचे पातळ काप मिक्स केले तरीही छान चव येते.
३) नानकटाईसाठी मळलेला गोळा एकदम तुपकट नसावा. जर बटर जास्त वाटत असेल तर चमचाभर पिठ घालावे. कारण खुप तूपकट गोळा बेक केला तर नानकटाई एकदम बसक्या होतात. कणकेला मळतो इतपत गोळा घट्ट असला पाहिजे.