Showing posts with label Paushtik. Show all posts
Showing posts with label Paushtik. Show all posts

Tuesday, October 4, 2011

खजुराचे लाडू - Khajurache Ladoo

Dates Laddu in English

वेळ: १५ मिनिटे
१० ते १२ लहान लाडू

khajurache ladu, khajoor ladoo, dates ladduसाहित्य:
२५ खजूर, बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर वाटून १ कप)
१/२ कप बदाम, भरडसर वाटून
१/२ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून
१ टेस्पून तूप
१ टीस्पून खसखस

कृती:
१) खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
२) नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत.
शक्यतो एक ते दोन घासात संपेल इतपतच लाडूचा आकार असावा. खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.

टीपा:
१) साध्या खजूराप्रमाणेच काळ्या खजूराचेही अशाप्रकारे लाडू करू शकतो.
२) मी फक्त बदामच वापरले होते. आवडीनुसार पिस्ता किंवा काजू असे सर्व मिळून अर्धा कप वापरू शकतो. जर जास्त ड्राय फ्रुट्स वापरायची असतील तर खजूराचे प्रमाणही वाढवावे. नाहीतर लाडू नीट बांधले जात नाहीत.
३) तुपाचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.
४) मी बदामाच्या रेडीमेड काप मिळतात ते वापरले होते. ते शक्यतो वापरू नयेत कारण लाडू बांधायला थोडे त्रासदायक पडते.
५) खजूराला ओलसरपणा असावा. कोरडे खडखडीत खजूर लाडवांसाठी चांगले लागत नाहीत.

Tuesday, September 13, 2011

बीन स्प्राऊटस सलाड - Beans Sprouts salad

bean Sprouts Salad in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

Bean sprout salad, Salad recipes, chinese salad recipes, healthy salad, beans sprouts, bean sproutsसाहित्य:
१०० ते सव्वाशे ग्राम बीन स्प्राऊटस
६ ते ८ काकडीच्या पातळ चकत्या (काकडी सोलून घ्यावी. अर्धगोलाकार चकत्या कराव्या)
१/२ टीस्पून आलं, पातळ चकत्या
१ पाती कांदा, बारीक चिरून
१ लहान गाजर, मोठ्या भोकाच्या किसणीवर किसून घ्यावे
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून तीळ, हलकेच भाजून
१/२ लिंबाचा रस१ टीस्पून सॉय सॉस
१ हिरवी मिरची, बारीक चिरून (ऐच्छिक)

कृती:
१) कढल्यात १ टेस्पून तेल गरम करून त्यात आलं कुरकुरीत करून घ्यावे. चमच्याने काढून ठेवावे. तेल सुद्धा एका वाटीत काढावे.
२) मोठ्या बोलमध्ये स्प्राऊटस, काकडी, पाती कांदा, गाजर, कोथिंबीर, आणि हिरवी मिरची एकत्र करावी. लिंबाचा रस, उरलेले तेल, सॉय सॉस आणि आलं घालून मिक्स करावे. तीळ घालून सजवावे. लगेच खावे.
टीपा:
१) स्प्राउट्स खूप नाजूक असतात. त्यामुळे जास्त वेळ मिक्स करू नये, मउसर होतात.

Tuesday, July 12, 2011

पालकाची भाजी - Palakachi Bhaji

Palakachi Bhaji in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

spinach stir fry, palakachi paratun bhaji, palak sabzi, palak stir fry, spinach indian recipes, Palak bhaaji, spinach indian curry, iron rich spinachसाहित्य:
३ कप बारीक चिरलेली पालकाची पाने
१ लहान कांदा, बारीक चिरून (साधारण १/४ कप)
१/२ टीस्पून उडीद डाळ (ऐच्छिक)
फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, एक चिमटी जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद
१ हिरवी मिरची, उभी चिरून
चवीपुरते मीठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. उडीद डाळ घालून गुलाबीसर होईस्तोवर थांबावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि शेवटी हिरवी मिरची घालावी. १० सेकंद परतून घ्यावे.
२) चिरलेला कांदा घालून २ ते ३ चिमटी मीठ घालावे. कांदा लालसर होईतोवर परतावा.
३) आता चिरलेला पालक घालून झाकण न ठेवता परतावे. पालक आळेस्तोवर परतावे. पालाकातील बहुतांश पाणी निघून गेले कि चव पहूल लागल्यास मीठ घालावे.
पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर हि भाजी गरमच वाढावी.

टीप:
१) उडदाच्या डाळीने चवीमध्ये फरक पडत नाही. फक्त मध्येमध्ये दिसायला छान दिसते. त्यामुळे नको असल्यास घातली नाही तरी चालेल.

Tuesday, May 24, 2011

खरबूजाचा ज्युस - Cantaloupe Juice

Musk Melon (Kharbuja) Juice in English

A refreshing summer Drink - Musk Melon Juice

वेळ: १० मिनीटे
२ जणांसाठी
healthy juice recipe, cantaloupe juice, musk melon juice, fruit juice recipeसाहित्य:
२ ते अडीच कप खरबुजाच्या मध्यम फोडी (टीप)
१/२ कप संत्र्याचा ज्युस
१/२ टिस्पून लिंबाचा रस
१/२ टिस्पून किसलेले आले
किंचीत काळं मिठ
चवीपुरती साखर (ऐच्छिक)

कृती:
१) खरबुजाच्या फोडी, संत्र्याचा रस, लिंबू रस, आलं आणि थोडं काळं मिठ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
२) मोठ्या गाळण्याने किंवा स्वच्छ सुती कपड्याने व्यवस्थित गाळून घ्यावे. गाळण्यामध्ये जो चोथा उरला असेल तो दाब देऊन निट पिळून घ्यावा.
३) तयार ज्युसची चव पाहावी. शक्यतो साखर घालू नये, पण लागल्यास १ ते २ चमचे घालावी.
ज्युस फ्रिजमध्ये गार करावा किंवा लगेच प्यायचा असल्यास बर्फाचे २-३ तुकडे घालून सर्व्ह करावा.

टीपा:
१) मी रेडीमेड संत्र्याचा ज्युस वापरला होता, त्यामुळे साखर घालावी लागली नाही. पण जर तुम्ही घरीच संत्र्याचा रस काढणार असाल तर चांगली रसदार संत्री वापरावी तसेच थोडी साखर घालावी.
२) खरबुज व्यवस्थित पिकलेले व गोड असावे म्हणजे चव छान लागेल. खरबुज कापताना आधी दोन भाग करावे, बिया काढून टाकाव्यात, सालं काढावीत आणि गराच्या फोडी कराव्यात.
३) जर घरी ज्युसर असेल तर तो वापरून छान ज्युस होईल.
४) आवडत असल्यास फ्रेश हर्ब्स जसे पुदीना, बेसिल वगैरेची २-४ पाने चुरडून घालू शकतो.

Wednesday, May 11, 2011

पालक राईस - Palak Rice

Spinach Rice in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी

spinach rice, palak rice, Healthy spinach riceसाहित्य:
३/४ कप बासमती तांदूळ
१ ते दिड कप बारीक चिरलेली पालकाची पाने + १/२ कप पाणी
३/४ कप गरम पाणी
१ टेस्पून बटर
१ टिस्पून बारीक चिरलेले आले
१ टिस्पून बारीक चिरलेले लसूण
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ लहान हिरवी मिरची
आख्खे गरम मसाले - २ तमालप्रत्र, १ हिरवी वेलची, २ लवंगा
चवीपुरते मिठ

कृती:
१) तांदूळ साध्या पाण्यात १० मिनीटे भिजवून ठेवावा. १० मिनीटांनी पाणी काढून टाकावे. आणि हा तांदूळ १० मिनीटे निथळत ठेवावा.
२) १/२ कप साधं पाणी आणि पालक एकत्र करून बारीक प्युरी करून घ्यावी.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये १ टेस्पून बटर किंवा तूप गरम करावे. त्यात जिरे आणि आख्खे मसाले घालावे. ५ ते १० सेकंद परतून आले-लसूण आणि मिरची घालावी.
४) निथळत ठेवलेला तांदूळ आता घालून व्यवस्थित कोरडा होईस्तोवर परतावा. सतत परतत राहा म्हणजे तांदूळ जळणार नाही. तांदूळ पूर्ण कोरडा झाला पाहिजे आणि व्यवस्थित भाजला गेला पाहिजे.
५) ३/४ कप गरम पाणी, मिठ आणि पालकाची प्युरी घालून मोठ्या आचेवर भात शिजू द्यावा. भाताच्या पृष्ठभागावर (सरफेस) पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच मिडीयम आणि लो च्यामध्यावर ठेवावी तसेच पॅनवर झाकण ठेवावे. साधारण १० मिनीटे वाफ काढावी.
भात तयार झाला कि काट्याने (fork) हलकेच मोकळा करून घ्यावा. गरम भात रायते आणि पापडाबरोबर सर्व्ह करावा.

टीपा:
१) भात अधिक पौष्टिक बनवण्यासाठी मटार, गाजर, फरसबी अशा भाज्याही घालू शकतो.
२) तांदूळ चांगला भाजला गेल्याने भात मोकळा होतो. तसेच भात मोकळा होण्यासाठी गरम पाणी वापरावे आणि स्टेप क्र. ५ चे नक्की अवलंबन करावे.
३) लहान मुलांना हा भात नक्की आवडेल. वाटल्यास मिरची घालू नये.

Tuesday, February 8, 2011

मोरावळा - Moravla

Moravla in English (Amla or gooseberry preserves)

moravla, amla preserves, morawla, amla jamसाहित्य:
१ कप आवळ्याचा किस
१ कप साखर
२ ते ३ लवंगा

कृती:
१) कूकरमध्ये तळाला १ इंच पाणी घालावे.
२) आवळ्याचा किस आणि साखर एकत्र मिक्स करून घ्यावे. कूकरच्या आतील स्टीलच्या डब्यात हे मिश्रण आणि लवंगा एकत्र करावे. या मिश्रणात पाणी अजिबात घालू नये. हा डबा कूकरमध्ये ठेवून १ ते २ शिट्ट्या कराव्यात. गॅस बंद करावा.
३) १० मिनीटांनी कूकर उघडून मिश्रण बाहेर काढावे -
i) जर मोरावळा फ्रिजमध्ये ठेवायचा असेल आणि थोडा पातळसरच हवा असेल तर थेट काचेच्या बरणीत भरून झाकण लावावे व फ्रिजमध्ये ठेवावे.
ii) जर मोरावळा बाहेर ठेवायचा असेल तर कूकरमधून बाहेर काढलेले मिश्रण पातेल्यात घालून, २ तारी पाक होईस्तोवर आटवावे. गार झाले कि बरणीत भरून ठेवावे.

टीप:
१) स्वादाकरता लवंग वापरण्याऐवजी, आवडीनुसार वेलची किंवा दालचिनीही वापरू शकतो.

Wednesday, January 26, 2011

वरी तांदूळ पुलाव - Samo Rice Pulav

Samo Rice Pulao in English

वेळ: २५ ते ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

vari tandul, danyachi amti, samo rice pulao, fasting pulao recipe, Indian fasting recipes>साहित्य:
१ कप वरी तांदूळ
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/२ कप भोपळ्याचे मध्यम तुकडे (साल काढून टाकावे)
१/२ कप बटाट्याचे तुकडे (बटाटा सोलून)
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मिठ
साधारण ३ कप उकळते पाणी

कृती:
१) जाड बुडाच्या पातेल्यात वरी तांदूळ थोडे भाजून घ्यावे, म्हणजे भात हलका होतो. तांदूळ एका भांड्यात तात्पुरता काढून ठेवावेत.
२) त्याच पातेल्यात तूप गरम करावे त्यात जिरे आणि मिरच्या घालून परतावे. गॅस मध्यम ठेवावा. बटाट्याच्या फोडी घालून एक वाफ काढावी. बटाटा जवळजवळ शिजला कि त्यात वरी तांदूळ घालावेत.
३) मिक्स करून त्यात गरम पाणी घालावे. मिठ घालावे. एक दोन मिनीटांनी भोपळ्याच्या पातळ फोडी आणि दाण्याचा कूट घालावा. मध्यम आचेवर वाफ काढावी.
गरमागरम वरीचा पुलाव दाण्याच्या आमटीबरोबर किंवा फोडणीच्या ताकाबरोबर सर्व्ह करावा.

Tuesday, January 4, 2011

दलिया इडली - Daliya idli

Daliya Idli in English

वेळ: पूर्वतयारी- २० मिनीटे (दलिया भिजवणे वगळून) । पाकृसाठी- ३५ ते ४० मिनीटे
नग: १५ ते १७ मध्यम इडल्या

daliya idli, daliya recipe, daliya sheera, dalia idli recipe, marathi breakfast, indian breakfast recipe, healthy breakfastसाहित्य:
१ कप दलिया रवा
२ कप गरम पाणी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, २ हिरव्या मिरच्या
४ ते ५ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ टिस्पून चणाडाळ
१ टिस्पून किसलेले आले
१/२ कप आंबट दही
चवीपुरते मिठ
१ टिस्पून इनो सोडा
इडली स्टॅंड
इडल्या वाफवायला इडली कूकर किंवा साधा मोठा कूकर

कृती:
१) दलिया गरम पाण्यात ४ तास भिजत घालावा. दलिया भिजल्यानंतर त्यातील अधिकचे पाणी काढून ठेवावे, पुर्ण पाणी काढले नाही तरी चालेल (टीप १). पाणी काढलेला दलिया मिक्सरमध्ये मध्यम वाटून घ्यावा.
२) कढल्यात तेल गरम करावे. त्यात आधी डाळी घालून गुलाबी होईस्तोवर परताव्या. नंतर मोहोरी, हिंग, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हि फोडणी वाटलेल्या दलियामध्ये घालावी.
३) यामध्ये दही, किसलेले आले आणि मिठ घालून मिक्स करावे. मिश्रण तांदूळाच्या इडलीसाठी जे मिश्रण असते तितपतच दाट असावे. लागल्यास दलिया भिजवून जे पाणी ठेवले होते ते घालावे.
४) कूकरमध्ये तळाला अडीच ते ३ इंच पातळीपर्यंत पाणी घालावे. गॅस सुरू करावा. इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा.
५) मिश्रणाचे दोन भाग करावे (टीप ६). एका भागात १/२ टिस्पून सोडा घालावा. मिक्स करून इडली पात्रात भरावे.
६) कूकरमधील पाण्याला उकळी आली कि इडली स्टॅंड कूकरमध्ये ठेवावा. वरून झाकण लावावे. साधा कूकर वापरत असाल तर झाकणावरची शिट्टी काढून ठेवावी.
७) १२ ते १५ मिनीटे वाफवावे. गॅस बंद करून ७-८ मिनीटे वाफ जिरू द्यावी.
८) नंतर इडल्या चमच्याने काढाव्यात (टीप २). परत कूकरमध्ये पाणी गरम करून वरीलप्रमाणेच इडल्यांची दुसरी बॅच करावी.

टीप:
१) दलिया भिजवल्यावर जर जास्त पाणी उरले तर ते फेकून न देता सांबार बनवायला वापरावे. मी वापरले होते, चवीत फरक पडत नाही.
२) या इडल्या अख्ख्या गव्हाच्या असल्याने थोड्या चिकट राहतात व जास्त फुलत नाही. म्हणून पूर्ण वाफ मुरल्यावरच इडल्या चमच्याने काढाव्यात. थंड झाल्या तरी मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकतो.
३) या इडल्या जरा सालट लागतात. म्हणून शक्यतो या इडल्या फक्त चटणीबरोबर खाऊ नयेत. जोडीला सांबारही बनवावे.
४) डायबेटीस पेशंट्स किंवा ज्यांना तांदूळ न खायचे पथ्य आहे त्यांच्यासाठी न्याहारीचा उत्तम उपाय.
५) यामध्ये आवडीनुसार भाज्याही घालू शकतो.
६) माझ्याकडे असलेला इडली स्टॅंड लहान आहे आणि त्यात नऊच इडल्या होतात. तुमच्याकडे जर १२ किंवा १६ कप्प्यांचा स्टॅंड असेल तर एकाच वेळी तुम्ही सर्व इडल्या करू शकता.

Wednesday, December 1, 2010

लापशी रवा शिरा - Cracked wheat sheera

Daliya Sheera in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

हा शिरा बाळंतिणीसाठी करतात. दलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते. साखरेऐवजी गूळाचा वापर केला जातो.

lapashi rava, lapsi rava, cracked wheat, dalia shira, daliya sheera, healthy breakfast recipes, healthy recipes for breastfeeding moms, balantinicha aharसाहित्य:
१ कप दलिया किंवा लापशी रवा (Cracked Wheat)
३/४ कप किसलेला गूळ
२ टेस्पून तूप
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
३ कप पाणी
१/४ कप गरम दूध
१/४ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर मिठ
३ टेस्पून काजू, बदाम, पिस्ता यांचे पातळ काप
१ टेस्पून बेदाणे
कृती:
१) २ टेस्पून तूप कढईत गरम करावे. त्यात लापशी रव खमंग भाजून घ्यावा. काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालावे.
२) रवा भाजताना दुसर्‍या गॅसवर ३ कप पाणी गरम करावे. त्यात चिमूटभर मिठ घालावे.
३) रवा चांगला भाजला गेला कि त्यात गरम पाणी आणि दूध घालावे. निट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर २ वाफा काढाव्यात. ताजा नारळ घालून मिक्स करावे.
४) रवा शिजल्यावर किसलेला गूळ घालून ढवळावे. गूळ वितळला कि बेदाणे घालावे.
५) झाकण लावून मध्यम आचेवर वाफ काढावी. वेलचीपूड घालून मिक्स करावे.
गरम गरम सर्व्ह करावा.

टीप:
१) रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, नाहीतर शिरा निट बनत नाही.
२) पाणी घातल्यावर रवा चांगला शिजू द्यावा, गूळ घालायची घाई करू नये. नाहीतर रवा जरा कचवट राहण्याची शक्यता असते.
३) अजून गोड हवे असेल तर पाव कप गूळ अजून घालावा.
४) बाळंतिणीला शिरा वाढताना वरून थोडे तूप आणि ताजा नारळ घालून द्यावा. त्यामुळे चव छान लागते.

Friday, November 26, 2010

अळीवाची खीर - Alivachi Kheer

Alivachi Kheer in English

अळीव पौष्टिक असल्याने बाळंतिणीच्या तब्बेतीसाठी उत्तम असतात. प्रसुतीनंतर कंबरदुखीवर अळीव गुणकारक आहे, तसेच पचनक्रिया सुधारते. बलवर्धक असल्याने अशक्तपणासाठी अळीव खाल्लेला चालतो.
अळीव उष्ण असल्याने गरोदरपणात शक्यतो खाऊ नये.

वेळ: १० मिनीटे (अळीव भिजवलेले असतील तर)
वाढणी: १ ते दिड कप

alivachi kheer, pregnant women diet, pregnancy diet, healthy recipe, high calorie food, Indian post pregnancy diet recipes, postpartum recipes, lactating recipes, lactation boosting recipesसाहित्य:
१ कप दूध + अजून पाव कप दूध अळीव भिजवायला
१ ते दिड टेस्पून अळीव
३ ते ४ बदाम
१ खारीक (टीप २)
साखर चवीनुसार (साधारण दिड ते दोन टिस्पून)
चिमूटभर वेलचीपूड

कृती:
१) एका वाटीत अळीव पाव कप दुधात भिजत घालावेत (टीप ५). बदाम आणि खारीक दुसर्‍या वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावेत. (महत्त्वाची टिप १ पाहा). अळीव, खारीक आणि बदाम किमान ४ तास तरी भिजत ठेवावेत.
२) ४ ते ५ तासांनी अळीव चांगले फुलून येतील. तसेच खारीक बदामही चांगले भिजलेले असतील.
३) बदामाची साले काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावे.
४) दूध गरम करावे त्यात भिजवलेले अळीव घालावे. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर ३-४ मिनीटे शिजवावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि गरम गरम प्यावे.

टीप:
१) जर उन्हाळा असेल तर दुध फ्रिजबाहेर खराब होते. अशावेळी अळीव, खारीक आणि बदाम पाण्यात भिजवावेत.
२) जर खारकेचे तुकडे नको असतील तर खारकांची पूड करून ठेवावी. खीर करताना उकळत्या दुधात थोडावेळ शिजू द्यावी.
३) बदाम, खारीक भिजवलेले पाणी तसेच बदामाची साले पौष्टिक असतात. सोललेली बदामाची साले चावायला जरा चामट लागतात तरीही सालांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. तेव्हा पाणी आणि साले फेकून देऊ नयेत, खाऊन टाकावीत.
४) आवडीनुसार पिस्ता, काजू, बेदाणेसुद्धा खिरीत घालू शकतो.
५) अळीव भिजवताना चमच्याने निट ढवळावे. अळीव हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर/ दुधावर तरंगतात आणि कधीकधी निट भिजत नाहीत.

Labels:
Lactation Boosting Recipes, Aliv kheer, Balantinicha ahar, post pregnancy recipes

Tuesday, October 5, 2010

डिंकाचे लाडू - Dinkache Ladu

Dinkache Ladu in English

वेळ: साधारण दिड तास
नग: साधारण २५ ते २८ मध्यम लाडू

dinkache ladu, dinkache ladoo, postpartum diet, balantinicha ahar, बाळंतिणीचा आहार, paushtik laduसाहित्य:
२०० ग्राम डिंक
तूप - साधारण १/२ किलोला थोडे कमी
१ कप मूगाचे पिठ
१ कप सोयाबिन पिठ
३/४ कप भरडसर वाटलेले बदाम
३/४ कप भरडसर वाटलेले काजू
३/४ कप भरडसर वाटलेले पिस्ता
१ कप खारीक पावडर
१/४ कप बेदाणे
१ कप सुके खोबरे
एका जायफळाची पावडर
३/४ किलो मऊ गूळ

कृती:
१) २०० ग्राम डिंक १/४ किलो तूपात तळावा. डिंक तळून उरलेल्या तूपात मूगाचे व सोयाबिनचे पिठ भाजून घ्यावे.
२) भरडसर वाटलेले बदाम, काजू पिस्ता आणि खारीक, प्रत्येकी एकेक चमचा तूपावर मंद आचेवर भाजून घेणे.
३) सुकं खोबरं कोरडंच भाजावं. जायफळ बारीक किसणीवर किसून घ्यावे.
४) तळलेला डिंक, भाजलेले सोयाबिन-मूगाचे पिठ, भाजलेला सुका मेवा, बेदाणे, भाजलेले खोबरे आणि जायफळ पूड एकत्र करून घ्यावे.
५) कूकरच्या तळाला १ भांडं पाणी घालावे. गूळ किसून कूकरच्या आतल्या डब्यात पाणी न घालता ठेवावा आणि डबा उघडाच ठेवावा. कूकर बंद करून २ शिट्ट्या होवू द्यावा. वाफ जिरली कि गरम गूळ एका परातीत घालावा. त्यामध्ये एकत्र केलेले जिन्नस (स्टेप क्रमांक ४) घालावे. सर्व एकत्र मिक्स करून लाडू वळावेत.

टीप:
१) गूळ कूकरमध्ये शिजवला कि त्याचा पाक करावा लागत नाही. जर कूकरमध्ये गूळ शिजवणे जमणार नसेल तर जाड बुडाच्या कढईत किसलेला गूळ आणि २ ते ३ टेस्पून पाणी घालून गूळ पूर्ण वितळू द्यावा. या पाकात जिन्नस घालावे आणि लाडू वळावे.
२) गूळ कूकरमध्ये शिजवला कि ५ मिनीटात कूकर उघडून गरम गूळच वापरावा.

Thursday, September 23, 2010

बिटाचा ज्युस - Beet Root Juice

Beet Root Juice in English

वेळ: १५ मिनीटे
वाढणी: २ ग्लास

beetroot juice, tomato juice, Carrot juice, beetacha juiceसाहित्य:
१ बीट, मध्यम
१ टोमॅटो, मध्यम
१ गाजर, मध्यम
१/३ कप पाणी
१/४ टिस्पून जिरेपूड
मिठ साखर चवीनुसार
१ टिस्पून लिंबाचा रस (ऐच्छिक)

कृती:
१) बिट आणि गाजर प्रेशर कूकरमध्ये १ शिट्टी होईपर्यंत शिजवावे (टीप १). नंतर गाजर आणि बीटाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. टोमॅटोसुद्धा मध्यम चिरून घ्यावा.
२) बिट, गाजर आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. अगदी गरज वाटली तरच थोडेसे पाणी घालावे.
३) स्वच्छ कापडातून बिट-गाजर-टोमॅटोचे वाटण घट्ट पिळून गाळून घ्यावे.
४) या ज्युसमध्ये जिरेपूड आणि मिठ घालून मिक्स करावे. यामध्ये साखर आणि लिंबाचा रस घालावा (टीप २).

टीप:
१) बीट आणि गाजर कच्चे वापरले तरीही चालेल.
२) ज्युसमध्ये कदाचित साखर घालावी लागणार नाही. बिटाचा गोडपणा पुरेसा होईल तसेच जर टोमॅटोची चव गरजेपुरती आंबट असेल तर लिंबाचा रसही वापरावी लागणार नाही.

Saturday, September 11, 2010

ऋषींची भाजी - Rishi Panchami Bhaji

Rishi Panchami Bhaji in English

४ जणांसाठी (प्रत्येकी १ मोठी वाटी)
वेळ: २० मिनीटे

Ganapati Recipes, Rishi Panchami Bhaji, Rishi chi Bhajiसाहित्य:
पाऊण ते एक कप भेंडीचे तुकडे (१ इंच)
४ अळूची मध्यम पाने (टीप)
१/२ कप पडवळाच्या चकत्या
२०० ग्राम लाल भोपळ्याच्या फोडी (मध्यम) (साले काढून)
१/४ कप मटारचे दाणे
१/४ कप पापडी दाणे
१/४ कप मक्याचे दाणे
५-६ बेबी कॉर्न, (१ इंचाचे तुकडे करावे)
२ टेस्पून शेंगदाणे (३ तास भिजवलेले)
२ टिस्पून चिंच (कोळ करून घ्यावा)
१ हिरवी मिरची
१/२ कप ताजा खवलेला नारळ
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) अळूची पाने धुवून त्याची देठं कापून घ्यावीत. देठ सोलून वेगळी ठेवावीत. त्याचे बारीक तुकडे करावेत.
२) पाने बारीक चिरून घ्यावीत. कूकरमध्ये अळू (फक्त पाने) १ शिट्टी करून शिजवून घ्यावा.
२) अळूची शिजवलेली पाने मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. वाटताना मिरचीही घालावी.
३) कूकर गरम करावा व त्यात तूप-जिर्‍याची फोडणी करावी. त्यामध्ये सर्व भाज्या अळूच्या देठांसह फोडणीस घालाव्यात. थोडावेळ परतून वाटलेली अळूची पाने घालावीत.
४) चिंचेचा कोळ घालावा. चवीपुरते मिठ आणि भाज्या शिजण्यापुरते पाणी घालावे.
५) कूकरचे झाकण बंद करावे आणि मध्यम आचेवर साधारण १५ मिनीटे भाजी शिजू द्यावी. १५ मिनीटांनी गस बंद करावा. वाफ मुरली कि कूकरचे झाकण उघडावे आणि ओला नारळ घालून मिक्स करावे. एक उकळी काढावी.
गरमा गरम भाजी, पोळी किंवा दशमीबरोबर सर्व्ह करावी. हि भाजी नुसती खायलाही चविष्ट लागते.

टीप:
१) मला जितक्या भाज्या मिळाल्या तेवढ्या मी वापरल्या. परंतु ऋषींच्या भाजीमध्ये अजूनही काही भाज्या वापरल्या जातात. यामध्ये मुख्यत: लाल माठ, चवळी, आंबट चुका, अंबाडी यासारख्या पालेभाज्या वापराव्यात. पालक, मेथी, शेपू यांसारख्या उग्र चवीच्या भाज्या वापरू नयेत, भाजीची चव बिघडते. तसेच सुरण, रताळे, अळकुडी (अर्बी) यांसारखे कंदही वापरावेत. काकडी, तोंडली आणि दोडकाही घालता येतो.
२) जर अंबाडीचा पाला वापरणार असाल तर चिंचेचा कोळ घालू नकात अथवा चव पाहून अगदी कमी प्रमाणात घालावा.
३) मी अळूची पाने उकडून, बारीक वाटून घेतली होती. याचे कारण भाजी चांगली मिळून येते. पालेभाज्या नुसत्या बारीक चिरून इतर भाज्यांबरोबर फोडणीस घातल्या तरीही चालेल.
४) आंबट चवीच्या भाज्या आणि चिंच वापरायची नसेल तर भाजी तयार झाल्यावर उकळी काढताना, आंबटपणासाठी १ वाटी घट्ट ताक घालावे आणि थोडावेळ ढवळावे म्हणजे ताक फुटणार नाही.
५) भाजीला तूप-जिर्‍याची फोडणी घातली नाही तरीही चालते. कूकरमध्ये सर्व भाज्या फोडणीशिवाय शिजवाव्यात (वरील कृतीप्रमाणे). आणि भाजी सर्व्ह करताना १ टिस्पून तूप घालून सर्व्ह करावी.
६) भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त केले तरीही चालते.

Labels:
Rishi Panchami Bhaji, Rishi chi Bhaji, Ganapati Recipes

Thursday, May 6, 2010

कॉर्न फ्लेक्स चाट - Corn Flakes Chaat

Corn Flakes Chat in English

४ सर्व्हिंग्ज
वेळ: १० मिनीटे (साहित्य तयार असल्यास)

diet chat recipe, healthy chat recipe, Indian Chat recipe, Pani puri, sevpuri, dahi batata puri, aloo chaatसाहित्य:
१ कप मोड आलेले हिरवे मूग (उकडलेले)
१/२ कप काबुली चणे (उकडलेले)
१ कप कॉर्न फ्लेक्स
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
३/४ कप दही, थोडे मिठ घालून घोटलेले
चिंचगूळाची चटणी आवडीनुसार (साधारण १/२ कप)
हिरवी चटणी आवडीनुसार (साधारण १/४ कप)

१ टिस्पून चाट मसाला (किंवा आवडीनुसार)
१ टिस्पून लाल तिखट (किंवा आवडीनुसार)
मिठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) जर तुम्ही ड्राय मूग आणि काबुलीचणे वापरणार असाल तर टीप १ पाहा.
२) सर्व्हींग प्लेटमध्ये १/४ कप हिरवे मूग आणि २ टेस्पून काबुली चणे पसरवावेत. त्यावर थोडे कॉर्न फ्लेक्स चुरून घालावेत. त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी चटणी घालावी. त्यावर फेटलेले दही आणि चिंचगूळाची चटणी घालावी. वरून चाटमसाला आणि लाल तिखट पेरावे. वरून चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे.
हे चाट लगेच खावे कॉर्न फ्लेक्स मऊ पडले कि चाट चांगले लागत नाही.

टीप:
१) मूग आणि काबुली चणे वेगवेगळे, साधारण ८ ते १० तास भिजवावेत. मूग आणि काबुली चणे शिजवताना कूकरच्या दोन वेगवेगळ्या डब्यात मूग आणि काबुली चणे ठेवावेत. फक्त कूकरमध्ये पाणी घालावे, कूकरच्या डब्यात पाणी घालू नये ज्यामुळे मूग आख्खे राहतात. मूग आणि चणे शिजताना थोडे मिठ घालावे.
२) यामध्ये चिंचगूळाच्या चटणीऐवजी खजूराची चटणीही वापरू शकता. त्या कृतीसाठी इथे क्लिक करा

Labels:
Chaat recipes, Indian Chaat food, Corn flakes chaat

Thursday, April 8, 2010

टोफू पराठा - Tofu Paratha

Tofu Paratha in English

वेळ: पिठ मळण्यासाठी: १० मिनीटे । पराठे बनवण्यासाठी: १५ मिनीटे
६ ते ७ मोठे पराठे (१० इंच प्रत्येकी)

tofu recipes, paratha recipe, tofu paratha, Parathas with Tofu,Indian Bread Recipeसाहित्य:
१५० ग्राम टोफू (मी फर्म टोफू वापरला होता) (टीप १)
१ गाजर, किसलेले
दिड ते दोन कप कणिक (टीप २)
दही (टीप ३)
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
३ ते ४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून
१ टिस्पून धणेजिरे पूड
१/४ टिस्पून हळद
चिमूटभर हिंग
चवीपुरते मिठ
पराठे भाजण्यासाठी तेल (साधारण १/४ कप)

कृती:
१) टोफू हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाकावे. परातीत किंवा खोलगट भांड्यात घेऊन टोफू कुस्करून घ्यावा.
२) त्यात कणिक घालून हलकेच मिक्स करावे. नंतर किसलेलेल गाजर मिरच्या, धणेजिरेपूड, हळद, हिंग, मिठ, कोथिंबीर घालावे चांगले मळावे आणि गरजेप्रमाणे दही घालून पराठ्यासाठी कणिक मळून घ्यावी. खुप घट्ट मळू नये त्यामुळे पराठे कोरडे होवू शकतात.
३) मळलेले पिठ १० मिनीटे झाकून ठेवावे. नंतर तेलाचा हात घेऊन २ ते अडीच इंचाचे समान गोळे बनवावे. तवा गरम करावा. कोरडी कणिक लावून पराठे लाटावेत आणि मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यावेत. पराठे भाजताना कडेने थोडे तेल किंवा बटर घालावे त्यामुळे खमंग स्वाद येतो आणि पराठे मऊ राहतात.

टीप:
१) या पराठ्यांसाठी फर्म टोफू किंवा सिल्कन टोफू, कोणताही प्रकार वापरला तरी चालेल. घरी फर्म टोफू अव्हेलेबल होता म्हणून मी तोच वापरला. सिल्कन टोफू टेक्श्चरला एकदम मऊसूत असतो. म्हणून जर तुम्ही पराठे बनवण्यासाठी खास टोफू आणणार असाल तर शक्यतो सिल्कन टोफू आणा.
२) दही, टोफू यांच्यातील पाण्याच्या अंशानुसार गव्हाचे पिठ थोडे कमी किंवा जास्त लागू शकते.
३) टोफूच्या टेक्श्चरवर दह्याचे प्रमाण अवलंबून आहे. वरील प्रमाणानुसार मला साधारण ३ टेस्पून दही लागले होते.
३) टोफूऐवजी पनीर वापरले तरीही छान चव येते.

Labels:
Tofu recipe, Tofu Paratha, Paratha recipe

Thursday, March 4, 2010

कणकेचे लाडू - Kanakeche Ladu

Wheat Flour Laddu in English

५ ते ८ मध्यम लाडू
वेळ: २० मिनीटे

golpapdi, golpapdi laddu, gulpapdiche ladu, gulache laduसाहित्य:
१ कप कणिक
१/२ कप तूप
१/२ ते ३/४ कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलचीपूड

कृती:
१) तुपावर कणीक मध्यम आचेवर खमंग भाजावी.
२) कणकेचा रंग किंचीत बदलला कि गॅस मंद करून गूळ आणि वेलचीपूड घालावा. आणि निट मिक्स करावे.
३) मिश्रण गरम असतानाच लाडू वळावेत.

टीप:
१) हे लाडू अजून पौष्टिक करण्यासाठी गूळाबरोबर १ चमचा खारीकपूड, १ चमचा बदामपूड १ चमचा भाजलेले सुके खोबरे घालावे आणि मग लाडू वळावेत. हे जिन्नस घातल्यास थोडे तुपाचे प्रमाण वाढवावे.

Tuesday, February 23, 2010

फरसबी कोशिंबीर - Farasbi Koshimbir

Farasbichi Koshimbir in English

वाढणी: २ जणांसाठी
वेळ: १३ ते २० मिनीटे

Farasbi Koshimbir, french beans raita, maharashtrian koshimbir recipe, healthy koshimbir recipe, raita recipes, Indian Raita reipeसाहित्य:
१ कप पातळ चिरलेली फरसबी (गोल चकत्या)
१ हिरवी मिरची
१/२ ते १ टिस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून दाण्याचा कूट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
चवीपुरते मिठ
चवीपुरती साखर (साधारण १/२ टिस्पून)

कृती:
१) पातळ चिरलेली फरसबी कूकरमध्ये पाणी न घालता वाफवून घ्यावी. (टीप १)
२) मिरची बारीक चिरून त्यात चिमटीभर मिठ घालावे आणि मिरची व्य्वस्थित चुरडून घ्यावी.
३) वाफवलेली फरसबी एका वाडग्यात घ्यावी त्यात चुरडलेली मिरची, दाण्याचा कूट, नारळ, कोथिंबीर, मिठ, साखर घालून मिक्स करावे. चव पाहून कमी असलेला जिन्नस आवडीप्रमाणे घालावा.
जेवणात हि कोशिंबीर तोंडीलावणी म्हणून छान लागते.

टीप:
१) 'फरसबी पाणी न घालता शिजवावी' म्हणजे कूकरच्या तळाशी १ भांडे पाणी घालावे. तळाशी कूकरची जाळी असेल तर ती ठेवावी. कूकरच्या आतील डब्यात चिरलेली फरसबी ठेवावी व या डब्यात पाणी घालू नये. कूकर लावून साधारण १ ते २ शिट्ट्यांवर फरसबी शिजू द्यावी.
२) फोडणी न घालता ही कोशिंबीर छानच लागते, पण जर तुम्हाला जिर्‍याची फोडणी घालायची असेल तर, कढल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि हिंग घालून हि फोडणी तयार कोशिंबीरीत घालावी. आणि चमच्याने छान मिक्स करावे.
३) आवडत असल्यास थोडे दही घातले तरी छान चव येते. दही घातल्यास किंचीत मिरचीचे प्रमाण वाढवावे.

Labels:
Farasbi koshimbir, Maharashtrian Koshimbir recipes, Raita recipes

Tuesday, February 9, 2010

ग्रिक सलाड - Greek Salad

Greek Salad in English

वाढणी: १ मध्यम बाऊल
वेळ: १५ मिनीटे

greek salad, greek salad recipe, greek salad dressing
साहित्य:
२ लेटुयुसची पाने, हातानेच तोडून घ्यावी (१ ते २ इंचाचे तुकडे)
१ लहान टोमॅटो, उभे काप करून
काकडीच्या ५ ते ६ पातळ चकत्या (काकडी सोलून)
लाल मुळ्याच्या ५ ते ६ पातळ चकत्या
१ पाती कांदा, १ इंचाचे तिरपे काप
लाल कांद्याची १ पातळ चकती, मोकळी करून
ड्रेसिंग:
१ टेस्पून ऑलिव ऑईल
१ टिस्पून लिंबाचा रस
चिमूटभर ड्राय ओरेगानो
१ लहान लसूण पाकळी, एकदम बारीक किसून
चवीनुसार मिठ आणि मिरपूड

कृती:
१) एक मोठे भांडे (मिक्सिंग बोल) घ्यावे. ड्रेसिंगच्या खाली दिलेले जिन्नस या भांड्यात एकत्र करावे. नीट मिक्स करावे.
२) सर्व्ह करायच्या वेळी लेटुयुसच्या पानाव्यतिरीक्त इतर भाज्या (कांदा, टोमॅटो, काकडी, मुळा, पाती कांदा) तयार ड्रेसिंगमध्ये अलगद हातांनी घोळवाव्या.
३) या घोळवलेल्या भाज्यांमध्ये लेट्युसची तोडलेली पाने घालावीत आणि हलकेच टॉस करा. खुप जास्तवेळ मिक्स करू नकात यामुळे भाज्यांचा, खासकरून लेट्युसचा करकरीतपणा जाऊन भाज्या कोमेजतात.
सलाड तयार झाले कि लगेच सर्व्ह करावे.

Labels:
Greek Salad, Greek Salad Dressing, Lettuce salad, Vegetable greek salad

Tuesday, October 27, 2009

भाजणीचे थालिपीठ - Bhajaniche Thalipith

Bhajani Thalipith in English

साधारण ४ मध्यम थालिपीठे
वेळ: ३० ते ४० मिनीटे

bhajani thalipith, Bhajaniche thalipeeth, thalipeethसाहित्य:
१ कप थालिपीठाची भाजणी
१ कप पाणी
चवीपुरते मिठ
१ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरे
२ चिमूट हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टेस्पून तेल
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप तेल थालिपीठ भाजताना तव्यावर सोडण्यासाठी

कृती:
१) प्रथम भाजणीची उकड काढून घ्यावी त्यासाठी,
१ कप पाणी नॉनस्टिक भांड्यात उकळवण्यास ठेवावे. त्यात तिखट, मिठ, हिंग, हळद, जिरे, १ टेस्पून तेल घालून मिक्स करावे. पाणी उकळले कि गॅस मंद करून पाण्यात भाजणी घालावी आणि लगेच चमच्याने ढवळावे. थोडे मिक्स करून वरती झाकण ठेवून ५ मिनीटे मंद आचेवर वाफ काढावी. गॅस बंद करून वाफ अजून ५ मिनीटे मुरू द्यावे.
२) उकड थोडी कोमट झाली कि पाण्याचा हात लावून मळून घ्यावे. मळतानाच चिरलेला कांदा आणि कोथिंबीर त्यात घालून एकत्र करावे. थोडावेळ झाकून ठेवावे. नंतर ४ ते ५ मध्यम आकाराचे सारखे गोळे करून घ्यावे.
३) जाडसर प्लास्टिकचा तुकडा घ्यावा (२ फुट x १ फुट). लांबड्या बाजूकडून बरोबर अर्धा असा दुमडून घ्यावा. त्याला अगदी थोडा पाण्याचा हात लावावा. मधे १ भाजणीचा गोळा ठेवून वरती अर्धा प्लास्टीकच्या भागाने कव्हर करून लाटावे. कडेला जर भेगा पडत असतील तर बोटांनी जरा आत ढकलून सारख्या करून घ्याव्यात. मध्यम लाटावे.
४) तवा गरम करून तेल घालून त्यावर थालिपीठ घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यावे. (प्रत्येक बाजू साधारण २ ते ३ मिनीटे)
फक्त दह्याबरोबर किंवा दही-मिरची लोणच्याबरोबर आणि कैरी लोणच्याबरोबर थालिपीठ अप्रतिम लागते.

टीप:
१) उकड काढल्याने भाजणी चिकट होत नाही.
२) हाताने थापण्याऐवजी जर लाटण्याने लाटले तर दोन्ही बाजू प्लेन होतात आणि सर्व ठिकाणहून व्यवस्थित भाजल्या जातात.
३) बरेच जण तव्यावरच थालिपीठ थापतात, पण त्यासाठी तवा गार होण्याची वाट पाहावी लागते म्हणून लाटण्याची आयडिया उपयोगी पडते.
४) जर उकड काढायची नसेल तर भाजणीत इतर साहित्य घालून गरम पाण्याने पिठ भिजवावे आणि तव्यावर हाताने थापावे.

Labels:
Thalipith, Bhajaniche thalipeeth, bhajniche thalipith

Tuesday, August 18, 2009

पास्ता सॉस - Homemade Pasta Sauce

Pasta Sauce in English

साधारण १ कप पास्ता सॉस
वेळ: ३५ मिनीटे
pasta sauce, Italian pasta sauce, pasta sauces recipes, vegetarian pasta sauceसाहित्य:
६ टोमॅटो
२ टेस्पून रेडीमेड टोमॅटो पेस्ट
३ टेस्पून ऑलिव ऑईल
४ मोठ्या लसूण पाकळ्या, पातळ चकत्या
१/४ कप कांदा, उभा पातळ चिरून
१/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून ड्राय ओरेगानो
२ चिमटी मिरपूड
मीठ
पास्ता कसा बनवावा?

कृती:
१) प्रत्येक टोमॅटोचे दोन तुकडे करा. मोठ्या बेकिंग ट्रेमध्ये १ टेस्पून ऑलिव ऑईल घालून हाताने पसरवून घ्या. टोमॅटोची चिरलेली बाजू प्लेटला लागेल अशा रितीने ठेवा त्याच भांड्यात लसूण पेरा.
२) दुसर्‍या छोट्या बेकिंग भांड्यात कांदा आणि थोडे तेल असे मिक्स करा. ओव्हन ४०० F वर प्रिहीट करून टोमॅटो आणि कांदा-लसूण १५ मिनीटे बेक करा. दोन्ही भांडी मधल्या कप्प्यावर ठेवा. मधेमधे कांदा आणि लसूण जळत नाहीत ना हे चेक करा.
३) बेक झाल्यावर टोमॅटोला पाणी सुटलेले असेल. कांदा लसणीचा रंग किंचीत बदलला असेल. सर्व गार झाले कांदा बारीक चिरून बाजूला ठेवावा. टोमॅटो आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
४) पॅनमध्ये ऑलिव ऑईल किंचीत गरम करावे त्यात लाल तिखट, कांदा घालून परतावे. नंतर टोमॅटोचे मिश्रण घालावे, ढवळावे. टोमॅटोची पेस्ट घालावी. निट मिक्स करावे आणि मंद आचेवर १०-१५ मिनीटे शिजू द्यावे.
५) सॉस थोडा दाट झाला कि त्यात ओरेगानो, मिरपूड आणि मिठ घालावे २ मिनीटे मंद आचेवर उकळू द्यावे. काचेच्या बरणीत काढून ठेवावा.
हा सॉस साधारण ५ ते ६ जणांच्या सर्व्हींगसाठी उपयोगी पडेल.

टीप:
१) टोमॅटो पेस्टमुळे रंग छान येतो. जर टोमॅटो पेस्ट मिळत नसेल तर थोडा टोमॅटो केचप जो फार गोड नसेल असा वापरू शकतो. पण यामुळे चवीत किंचीत फरक पडेल.
२) जर ओरेगानो हर्ब मिळत नसेल तर बेसिल किंवा थाईमही या सॉसमध्ये वापरू शकतो, प्रत्येक हर्बची चव वेगवेगळे असते त्यामुळे चवीत हर्बच्या फ्लेवरनुसार फरक पडेल.

Labels:
pasta sauce, tomato pasta sauce, Oregano pasta sauce