Gulpoli in English
वेळ: साधारण २ तास
नग: जवळपास २५ मध्यम गुळपोळ्या
साहित्य:
सारणासाठी
१/२ किलो गूळ
१ कप बेसन
२ सुक्या नारळाच्या वाट्या
३/४ कप तिळ
१/२ कप शेंगदाणे
१/२ कप खसखस
१/२ कप तेल
आवरणासाठी
दिड कप मैदा
३/४ कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
२ टेस्पून बेसन (ऐच्छिक)
कृती:
१) सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईस्तोवर कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे. कमी असल्यास अजून थोडं खोबरं भाजून चुरा करावा.
२) तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
३) शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकावीत आणि एकदम बारीक कूट करून घ्यावा.
४) एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात १/२ कप तेल गरम करावे. त्यात १ कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
५) गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
६) मैदा, कणिक, मिठ आणि बेसन (ऐच्छिक) एकत्र करावे. २ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधं तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवणे.
७) सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
८) आवरणासाठी आपल्याला "१ सारण गोळ्याला २ पिठाचे गोळे" हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
९) २ पिठाच्या लाटयांमध्ये १ सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
१०) मिडीयम हाय हिटवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.
टीप्स:
१) पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.
Tuesday, December 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment