Tuesday, December 14, 2010

सोया व्हिट नानकटाई - Soya Wheat Nankatai

Nankatai in English

वेळ: ३० ते ४० मिनीटे
नग: २० ते २२ मध्यम नानकटाई

nanakatai, homemade nankatai, nankatai recipe, shortbread recipe, eggless biscuits, eggless cookiesसाहित्य:
८ टेस्पून अनसॉल्टेड बटर (१/२ कप)
६ टेस्पून पिठी साखर
१/२ कप गव्हाचे पिठ
१/२ कप सोयाबिन पिठ
१/४ टिस्पून बेकिंग पावडर
१/४ टिस्पून वेलची पावडर
२ टेस्पून पिस्त्याचे काप

कृती:
१) नानकटाई बनवण्यापूर्वी बटर २ तास फ्रिजबाहेर काढून ठेवावे म्हणजे एकदम मऊसर होईल. एका मध्यम आकाराच्या खोलगट ताटलीत बटर आणि साखर घ्यावी. आणि मिश्रण हलके होईस्तोवर जोरजोरात फेसावे.
२) ३५० डीग्री F (१७५ डीग्री सेल्सियस) वर ओव्हन प्रिहीट करावे.
३) बेकिंग ट्रे ला तूपाचा किंवा बटरचा हात लावून तयार ठेवावा. वरील प्रमाणासाठी साधारण २ ट्रे लागतील. एकच ट्रे असल्यास दोन विभागात नानकटाई बनवावी.
४) सोयाबिन पिठ, गव्हाचे पिठ, वेलची पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. चाळणीत जर पिठाचे गोळे अडकले असतील तर ते फोडून घ्यावेत. चाळलेले पिठ, बटर-साखरेच्या मिश्रणात घालावे आणि हाताने मळावे. व्यवस्थित गोळा तयार करावा. (कदाचित एखादा चमचा पिठ वाढवावे लागेल)
५) तयार गोळ्याचे साधारण २० ते २२ समान भाग करावे (१ इंच). प्रत्येक गोळा एकमेकापासून २ इंचाच्या अंतरावर ठेवावा. एका ट्रेमध्ये साधारण १२ ते १४ गोळे बसतील. प्रत्येक गोळ्यावर पेढ्याला लावतो तसे पिस्त्याचे काप लावून चेपावे.
६) ओव्हनच्या मधल्या रॅकमध्ये ट्रे ठेवावा व साधारण १२ ते १४ मिनीटे बेक करावे. बेक केल्यावर ट्रे बाहेर काढावा आणि गार होवू द्यावा. १५ मिनीटांनी खुसखूशीत अशा नानकटाई खाण्यासाठी तयार होतील.

टीपा:
१) मिठ नसलेले बटर वापरावे. बटर नसल्यास मऊसूत घरगूती लोणी वापरले तरी चालेल.
२) नानकटाईच्या मिश्रणात बदाम, काजू, पिस्त्याचे पातळ काप मिक्स केले तरीही छान चव येते.
३) नानकटाईसाठी मळलेला गोळा एकदम तुपकट नसावा. जर बटर जास्त वाटत असेल तर चमचाभर पिठ घालावे. कारण खुप तूपकट गोळा बेक केला तर नानकटाई एकदम बसक्या होतात. कणकेला मळतो इतपत गोळा घट्ट असला पाहिजे.

No comments:

Post a Comment