Showing posts with label Monsoon Special. Show all posts
Showing posts with label Monsoon Special. Show all posts

Tuesday, August 16, 2011

टोमॅटो रसम - Tomato Rasam

Tomato Rasam in English



वेळ: ४० ते ५० मिनिटे

वाढणी: ३ ते ४ जणांसाठी



rasam soup, tomato rasam, lemon rasam, garlic rasam, rassam recipeसाहित्य:

३ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून

१/४ कप तूर डाळ

२ ते ३ कप साधं पाणी

फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ ते ३ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या, १/२ टीस्पून उडीद डाळ, १५ ते २० मेथी दाणे, २ लसणीच्या पाकळ्या (ठेचून,), १ डहाळी कढीपत्ता

१० ते १२ मिरी दाणे, भरडसर ठेचून

१ हिरवी मिरची, चिरून

दीड टीस्पून धनेपूड

१/२ टीस्पून जिरेपूड

२ टीस्पून चिंच

चवीपुरते मीठ



कृती:

१) प्रेशर कुकरमध्ये तूर डाळ २ कप पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी काढून घ्यावे. डाळ चेपून जेवढे शक्य तेवढे पाणी काढावे.

२) १/२ कप गरम पाणी घ्यावे त्यात चिंच भिजत ठेवावी. १० मिनीटांनी चिंचेचा कोळ काढून घ्यावा.

३) २ कप साधं पाणी आणि २ कप डाळीचे पाणी एकत्र पातेल्यात उकळण्यास ठेवावे. उकळी फुटली कि टोमॅटो घालून किमान २० मिनिटे किंवा टोमॅटो नरम होईस्तोवर मध्यम आचेवर उकळू द्यावे. हिरवी मिरची आणि १/२ चिंचेचा कोळही घालावा.

४) छोट्या कढल्यात तेल गरम करावे. उडीद डाळ, मेथी दाणे घालावेत. रंग गुलाबीसर होईस्तोवर थांबावे. नंतर लसूण आणि लाल मिरच्या घालाव्यात. ५-७ सेकंदानी मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावा. ५-७ सेकंदानी ही फोडणी रस्सम वर घालावी.

५) मीठ, कुटलेली मिरी, धने-जिरेपूड घालून मिक्स करावे. १०-१५ मिनिटे उकळवावे.

चव पाहून जिन्नस (तिखट, मीठ, चिंच ) अड्जस्ट करावे.



रसम भाताबरोबर किंवा नुसते सुपसारखे प्यायलाही छान लागते.



टीप:

१) छान पिकलेले, लालबुंद टोमॅटो वापरावेत.

२) जर टोमॅटोचे बारीक तुकडे रसममध्ये आवडत नसतील तर तोमतो चीरण्याऐवजी प्युरी करावी.

३) रसम थोडे स्पाईसीच असते. पण थोडे कमी तिखट हवे असल्यास मिरीचे प्रमाण कमी करावे.

४) जर रसम थोडे आधी करून ठेवले तर चांगले मुरते आणि चवीला छान लागते.

Thursday, July 21, 2011

ब्रोकोली सूप - Cream of Broccoli Soup

Broccoli Soup in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

broccoli soup, creamy broccoli soup, thick soup recipe, healthy soups, soup recipesसाहित्य:
१ टेस्पून बटर
३०० ग्राम ब्रोकोलीचे तुरे (साधारण दीड कप लहान तुरे)
१ मध्यम कांदा, चिरलेला (३/४ कप)
१ मध्यम गाजर, चिरून
चवीनुसार मीठ आणि मिरपूड
१ टेस्पून मैदा
२ कप पाणी (टीप १)
१/४ कप क्रीम (मी हाफ अँड हाफ वापरले होते)
क्रूटॉन्स

कृती:
१) नॉनस्टिक पॅनमध्ये बटर गरम करावे. त्यात ब्रोकोली, कांदा, आणि गाजर घालावे. थोडे मीठ आणि मिरपूडसुद्धा घालावी. मध्यम आचेवर कांदा थोडा पारदर्शक होईस्तोवर परतावे. साधारण ५ ते ६ मिनिटे.
२) यामध्ये मैदा घालून दोनेक मिनिटे परतावे. पाणी घालून उकळी काढावी. मध्यम आचेवर १० मिनिटे उकळी काढावी.
३) क्रीम घालून ढवळावे. मिक्सरमध्ये प्युरी करावी. मीठ मिरपूड अड्जस्ट करावे. १ ते २ मिनिटे गरम करून सूप सर्व्ह करावे.
सर्व्ह करताना बरोबर तळलेले किंवा बेक केलेले ब्रेडचे तुकडे (क्रूटॉन्स) द्यावे.

टीप:
१) पाण्याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक वापरता येईल.

Thursday, July 14, 2011

पनीर लॉलीपॉप - Paneer Lollypop

Paneer Lollypop in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

paneer snacks, lollypop recipe, paneer lollypop, lollipop, साहित्य:
१ कप पनीर, किसलेले
२ मध्यम बटाटे, उकडलेले
दिड टीस्पून आले, किसलेले
१ टीस्पून लसूणपेस्ट
२ टीस्पून लाइट सोय सॉस
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
२ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/४ कप कांदा, बारीक चिरून
३ टेस्पून मैदा,
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
८ ते १० लाकडी स्टिकस किंवा बेबी कॉर्न्स

कृती:
१) बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
२) मैदा सोडून सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्यावे. मध्यम आकाराचे ८ ते ९ गोळे बनवावे.
३) १ गोळा घेऊन तो नीट दाबून घट्ट करावा व त्यात लाकडी स्टिक एका बाजूने घालावी. मुठीने नीट आवळून नीट बांधून घ्यावा, जेणेकरून तेलात सोडल्यावर गोळा सुटणार नाही. अशाप्रकारे सर्व लॉलीपॉप बनवून घ्यावे.
४) तयार लॉलीपॉप कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. किंचित हलवून जास्तीचा मैदा काढून टाकावा.
५) पुरेसे तेल तापवून आच मध्यम करावी आणि सर्व लॉलीपॉप तळून घ्यावे. तळताना मध्येमध्ये लॉलीपॉप झाऱ्याने फिरवावेत, म्हणजे सगळीकडून नीट तळले जातील.
गरमागरम लॉलीपॉप शेझवान सॉस किंवा टोमाटो केचप बरोबर सर्व्ह करावेत.

टीपा:
१) जे बटाटे शिजल्यावर चिकट होतात असे बटाटे वापरू नयेत.
२) आवडीनुसार हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी जास्त करावे.
३) आईसक्रीम कॅन्डीला जी लाकडी स्टिक असते ती वापरावी. प्लास्टिक किवा इतर मटेरियल वापरू नये जे तेलात जळू शकेल.

Thursday, June 30, 2011

मिरचीची भजी - Mirchichi Bhaji

Mirchi Pakoda in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनिटे

mirchichi bhajji, mirachi chi bhaji, mirchi pakoda, chili pakoda, evening snack, spicy snack, indian snack recipes, quick snack recipesसाहित्य:
८ ते १० लांबड्या मिरच्या
३/४ कप बेसन
१ टेस्पून तांदुळाचे पीठ
१/४ टीस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मिरच्या धुवून घ्याव्यात. एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात. (टीप)
२) बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.
३) तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात. मध्यम आचेवर टाळाव्यात.
गरमागरम सर्व्ह कराव्यात.

टीपा:
१) तुम्ही कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरत आहात त्यावर आतील बिया काढायच्या कि नाही ते ठरवावे. जर मिरच्या खूप तिखट असतील तर बिया काढाव्यात. किंवा काही जणांना भजी कदम झणझणीत असली तर आवडते. तर अशावेळी आवडीनुसार बिया कमी कराव्यात.
२) खूप जाड सालीच्या मिरच्या वापरू नये. त्या तळल्यावर पटकन शिजत नाहीत आणि भजी कचकचीत लागतात. त्यामुळे पातळ सालीच्या आणि मध्यम तिखट अशा मिरच्या घ्याव्यात.
३) मिरचीच्या आतील बिया काढून आत वेगवेगळे सारण भारत येईल. मी बटाट्याची तिखट भाजी (आले-लसूण लावून) आत भरली होती. आणि पिठात बुडवून नेहेमी प्रमाणे तळून काढली.

Thursday, June 23, 2011

नूडल्स थीन सूप - Vegetable Noodles soup

Vegetable noodles soup in English

३ ते ४ जणांसाठी
वेळ: २० मिनिटे

noodles soup, vegetable noodles soup, vegetable thin soupसाहित्य:
२ ते ३ मश्रूम्स
३ टेस्पून गाजर, पातळ काप
३ टेस्पून भोपळी मिरची, पातळ काप
२ टेस्पून कोबी, एकदम बारीक चिरून
२ ते ३ बेबी कॉर्न, १ इंचाचे तुकडे
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
दीड टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून तेल
४ कप व्हेजिटेबल स्टॉक
३० ग्राम नूडल्स
१/४ टीस्पून पांढरी मिरपूड
१ टीस्पून व्हिनेगर
१ पाती कांद्याची काडी, बारीक चिरून पांढरा आणि हिरवा भाग वेगवेगळा ठेवावा.
चवीपुरते मीठ

कृती:
१) पुरेसे पाणी उकळवून नूडल्स शिजवून घ्याव्यात. शिजवताना १ टीस्पून मीठ घालावे. नुद्लेस शिजल्यावर गार पाण्यात घालून ठेवाव्यात.
२) कढईत तेल घेऊन लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालावी. नंतर गाजर, भोपळी मिरची, कोबी, बेबी कॉर्न, मश्रुम्स आणि पाती कांद्याचा पांढरा भाग घालून एक दोन मिनिटे परतावे. नंतर व्हेजिटेबल स्टॉक घालून उकळी काढावी.
३) व्हेजिटेबल स्टॉक उकळायला लागला कि त्यात व्हिनेगर आणि चवीपुरते मीठ घालावे. १-२ मिनिटे उकळून नुडल्स घालाव्यात आणि अजून एक-दोन मिनिटे उकळी काढावी. मिरपूड घालून मिक्स करावे.
सर्व्हिंग बोलमध्ये वाढावे आणि पती कांद्याने सजवून सर्व्ह करावे.

टीप:
१) जर व्हेजिटेबल स्टॉक नसेल तर पाणी वापरले तरी चालेल. तसेच जर चिकन स्टॉक वापरायचा असेल तरीही आवडीनुसार वापरू शकतो.

Thursday, April 15, 2010

पालकाची भजी - Palak Bhajji

Palak Pakoda in English

२ जणांसाठी (साधारण १० ते १२ भजी)
वेळ: २० मिनीटे

साहित्य:
२ ते अडीच कप भरडसर चिरलेली पालकाची पाने
१/४ कप कांदा, उभे पातळ काप
६ ते ७ टेस्पून बेसन
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
५ ते ७ कढीपत्त्याची पाने, बारीक चिरून
१ टिस्पून तिळ (ऐच्छिक)
१ टिस्पून कसूरी मेथी
१/२ टेस्पून लाल तिखट किंवा गरजेनुसार
१/४ टिस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मिठ
२ ते ३ टेस्पून पाणी
तेल, भजी तळण्यासाठी

कृती:
१) मोठ्या वाडग्यात चिरलेला पालक, कांदा आणि मिठ घालून मिक्स करावे. १० मिनीटे तसेच ठेवावे म्हणजे कांद्याला थोडे पाणी सुटेल.
२) नंतर त्यावर प्रथम एकूण बेसनपैकी ४ टेस्पून बेसन आणि तांदूळ पिठ पेरावे. १ टिस्पून तेल कडकडीत गरम करून पिठावर घालावे. २ मिनीटांनी हलकेच चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेऊन उरलेले बेसनही घालावे.
३) आता उरलेले जिन्नसही घालावेत. (आलेलसूण पेस्ट, कसूरी मेथी, तिळ, लाल तिखट, हळद, सोडा, आणि थोडे मिठ) सर्व निट मिक्स करा. लागल्यास अगदी थोडे पाणी घाला आणि चिकटसर असा गोळा तयार करा. हे मिश्रण पातळ नको, घट्ट पण चिकटसर गोळा बनवा.
४) भजी तळण्यासाठी कढईत तेल तापवा आणि आच मिडीयम-हायवर ठेवा. छोटी छोटी बोंडं, गोल्डन ब्राऊन आणि कुरकूरीत होईस्तोवर तळा. तेल टिपण्यासाठी टिश्यु पेपरवर काढा.
गरमा गरम भजी टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा लसणीच्या तिखटाबरोबर सर्व्ह करावी.

टीप्स:
१) पालकाबरोबर थोडी मेथी घातल्यास खुप छान चव येते.
२) १ टिस्पून गरम तेल भजीच्या पिठात घातल्याने भजी छान कुरकूरीत होतात.
३) भजी एकदम मोठ्या आचेवर किंवा कमी आचेवर तळू नयेत. मोठ्या आचेवर तळल्याने भजी बाहेरून लगेच ब्राऊन होतात पण आतमध्ये कच्च्याच राहतात. तसेच एकदम कमी आचेवर तळल्या तर तेलकट होतात. म्हणून नेहमी मिडीयम ते मिडीयम हायवर तळावे.
४) खायचा सोडा घातल्याने भजी हलक्या होतात. पण जास्त प्रमाणात सोडा घातल्यास भजी तेल पितात.
५) पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त पडले तर मिश्रण पातळ होईल आणि भजी कुरकूरीत होणार नाहीत.

Labels:
Palak bhaji, Spinach Pakoda, Palak Pakoda

Thursday, June 18, 2009

ब्रेड पकोडा - Bread Pakoda

Bread Pakoda in English

१६ बाईट साईझ भजी
वेळ: ४० मिनीटे (बटाटा भाजी + भजी)

breadchi bhaji, bajji, bhajji, bread pakoda, pakora, mansoon special bhajjiसाहित्य:
८ ब्रेड स्लाईस
दिड कप बटाट्याची तिखट भाजी (३ ते ४ मध्यम बटाटे)
१ कप बेसन
२ टेस्पून तांदूळ पिठbread pakoda, pavachi bhaji
१ कप पाणी
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून जिरे
चिमुटभर खायचा सोडा
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) बटाटे शिजवल्यावर लगेचच भाजी बनवावी म्हणजे बटाटे चांगल्याप्रकारे मॅश होतात आणि गुठळ्या राहात नाही. बटाट्याची भाजी जरा तिखट असावी नाहीतर भजी तळल्यावर तिखटपणा कमी लागतो.
२) वाडग्यात बेसन आणि तांदूळ पिठ एकत्र मिक्स करावे त्यात पाणी घालून पिठ भिजवावे. हे पिठ पातळही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे. त्यात हळद, खायचा सोडा आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
३) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात (टीप १) एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरवावी. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा. सुरीने आवडीनुसार कापून तुकडे करावेत. (टीप २)
४) प्रत्येक तुकड्यावर पावाच्या दोन्ही बाजूंवर ३ ते ४ थेंब पाणी शिंपडून हलकेच प्रेस करावे. (टीप ३)
५) तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. बटाटा भाजी घातलेले पावाचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मिडीयम हाय गॅसवर गोल्डन रंगावर तळून घ्यावेत.
सर्व्ह करताना पुदीना चटणी, चिंचेची चटणी, किंवा टोमॅटो केचपबरोबर द्यावे. ज्यांना एक्स्ट्रा स्पाईसी खायला आवडत असेल त्यांनी शेजवान सॉसबरोबर हे पकोडे ट्राय करून पाहावेत.

टीप:
१) उरलेल्या पिठात थोडी जिरपूड, लाल तिखट, आमचूर किंवा चाट मसाला घालून मिक्स करावे ब्रेडच्या उरलेल्या कडा या पिठात घोळवून भजीप्रमाणेच तळाव्यात.
२) दुकानात किंवा गाडीवर त्रिकोणी तुकडे मिळतात. मी शक्यतो ४ तुकडे करते म्हणजे खायला सोपे पडते.
३) ब्रेडचा कोरडा तुकडा पिठात घोळवल्यावर, तो पिठ आत शोषून घेतो आणि मग आतपर्यंत गेलेले पिठ निट न शिजल्याने भजी कच्ची राहते म्हणून ब्रेडवर थोडे पाणी शिंपडल्याने, पिठ आतपर्यंत शोषले जात नाही आणि भजी छान तळली जाते.
४) जर प्लेन पकोडे बनवायचे असतील तर बटाट्याची भाजी करू नये फक्त ब्रेडचे कापलेले तुकडे भिजवलेल्या पिठात बुडवून नेहमीसारखे तळावे.