Tomato Rasam in English
वेळ: ४० ते ५० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
३ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१/४ कप तूर डाळ
२ ते ३ कप साधं पाणी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ ते ३ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या, १/२ टीस्पून उडीद डाळ, १५ ते २० मेथी दाणे, २ लसणीच्या पाकळ्या (ठेचून,), १ डहाळी कढीपत्ता
१० ते १२ मिरी दाणे, भरडसर ठेचून
१ हिरवी मिरची, चिरून
दीड टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
२ टीस्पून चिंच
चवीपुरते मीठ
कृती:
१) प्रेशर कुकरमध्ये तूर डाळ २ कप पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी काढून घ्यावे. डाळ चेपून जेवढे शक्य तेवढे पाणी काढावे.
२) १/२ कप गरम पाणी घ्यावे त्यात चिंच भिजत ठेवावी. १० मिनीटांनी चिंचेचा कोळ काढून घ्यावा.
३) २ कप साधं पाणी आणि २ कप डाळीचे पाणी एकत्र पातेल्यात उकळण्यास ठेवावे. उकळी फुटली कि टोमॅटो घालून किमान २० मिनिटे किंवा टोमॅटो नरम होईस्तोवर मध्यम आचेवर उकळू द्यावे. हिरवी मिरची आणि १/२ चिंचेचा कोळही घालावा.
४) छोट्या कढल्यात तेल गरम करावे. उडीद डाळ, मेथी दाणे घालावेत. रंग गुलाबीसर होईस्तोवर थांबावे. नंतर लसूण आणि लाल मिरच्या घालाव्यात. ५-७ सेकंदानी मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावा. ५-७ सेकंदानी ही फोडणी रस्सम वर घालावी.
५) मीठ, कुटलेली मिरी, धने-जिरेपूड घालून मिक्स करावे. १०-१५ मिनिटे उकळवावे.
चव पाहून जिन्नस (तिखट, मीठ, चिंच ) अड्जस्ट करावे.
रसम भाताबरोबर किंवा नुसते सुपसारखे प्यायलाही छान लागते.
टीप:
१) छान पिकलेले, लालबुंद टोमॅटो वापरावेत.
२) जर टोमॅटोचे बारीक तुकडे रसममध्ये आवडत नसतील तर तोमतो चीरण्याऐवजी प्युरी करावी.
३) रसम थोडे स्पाईसीच असते. पण थोडे कमी तिखट हवे असल्यास मिरीचे प्रमाण कमी करावे.
४) जर रसम थोडे आधी करून ठेवले तर चांगले मुरते आणि चवीला छान लागते.
Tuesday, August 16, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment