Showing posts with label Bottlegourd. Show all posts
Showing posts with label Bottlegourd. Show all posts

Thursday, July 28, 2011

दुधी भोपळ्याचे थालीपीठ - Dudhi Thalipeeth

Lauki Thalipeeth in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे

bottle gourd recipe, lauki pancakes, fasting recipes, fast recipes, vrat ka khana, dudhi bhoplyache thalipith, thalipeeth recipeसाहित्य:
१ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
दीड ते दोन कप उपवासाची भाजणी किंवा गरजेनुसार
३ हिरव्या मिरच्या, ठेचून
१/४ चूप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना

कृती:
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्याभागी तेल सोडायला बोटाने छिद्रं करावे.
३) मिडीयम आणि हायच्या मध्ये गॅस अडजस्ट करावा. झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे.

टीप:
१) दुधी बिनबियांचा आणि कोवळा असावा, म्हणजे किसायला सोपा जातो.
२) थालीपिठ शिजायला वेळ लागतो. जास्त थालीपीठं बनवताना वेळ वाचवण्यासाठी दोन शेगड्यावर दोन तवे वापरून थालीपीठं बनवावी.
३) काहीजण दुधी भोपळा उपवासाला खात नाहीत. म्हणून दुधीऐवजी काकडी किसून घालावी.

Tuesday, March 15, 2011

दुधीची भाजी - Dudhichi Bhaji

Bottle gourd Sabzi in English

वेळ: १५ ते २० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

dudhichi bhaji, lauki sabzi, bottle gourd stir fry
साहित्य:
२ कप, दुधीचे मध्यम चौकोनी तुकडे (दुधी सोलून आतील बिया काढणे)
१ टिस्पून + १ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
२ ते ३ टेस्पून दाण्याचा कूट
१/४ ते १/२ कप दुध
चवीपुरते मिठ
२ लाल सुक्या मिरच्या
१/२ टिस्पून उडदाची डाळ
सजावटीसाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) कढईत १ टिस्पून तूप गरम करून त्यात जिरे घालून फोडणी करावी. जिर्‍याचा रंग थोडा बदलला कि त्यात दुधी फोडणी़स घालावा. मिठ घालावे. १-२ वाफा काढाव्यात.
२) नंतर दुध घालावे आणि दुधी शिजू द्यावा. दुधी शिजला कि दाण्याचा कूट घालून १-२ मिनीट शिजवावे.
३) भाजी तयार झाली कि लहान कढल्यात १ टिस्पून तूप गरम करावे. २ लाल मिरच्या हाताने तोडून घ्याव्यात. आधी उडदाची डाळ फोडणीस टाकून गुलाबी होवू द्यावी. नंतर लगेच मिरच्या घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी तयार भाजीवर घालून भाजी लगेच सर्व्ह करावी.

टीप:
१) बरेचजण उपवासाला दुधी खातात. तेव्हा हि भाजी नुसती किंवा साबुदाण्याच्य खिचडीबरोबर भरीला खाऊ शकतो. फक्त वरून जी तूप-जिरे-उडीद डाळ यांची फोडणी घातली आहे ती घालू नये.

Thursday, March 10, 2011

दुधी हलवा - Dudhi Halwa

Dudhi Halwa in English

वेळ: साधारण ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

indian sweets, indian dessert recipe, easy dessert, quick dudhi halva, lauki halwa, bottle gourd halwaसाहित्य:
अडीच कप किसलेला दुधी भोपळा (सोलून बिया काढून)
१ टिस्पून तूप
पाऊण कप कंडेन्स मिल्क
१ टिस्पून चारोळी (३ तास कोमट पाण्यात भिजवावी)
१ टेस्पून बदामाचे काप, (बदाम भिजवून साल काढावे)
१ टेस्पून इतर ड्राय फ्रुट्स जसे काजू, पिस्ता, बेदाणे
१/४ टिस्पून वेलची पूड

कृती:

१) पॅन गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि किसलेला दुधी घालून परतावे. मिडीयम-हाय हिटवर परतत राहावे.
२) साधारण ५ ते ८ मिनीटांनी दुधीमधील पाणी निघून जाईल. आता किसलेल्या दुधीची एक काडी चावून पाहावी. जर कच्चेपणा वाटत असेल तर अजून काही मिनीटे शिजवावे.
३) दुधी शिजला कि कंडेन्स मिल्क घालावे आणि घट्ट्पणा येईस्तोवर परतत राहावे. सुकामेवा घालावा, वेलची पूड घालून मिक्स करावे. थोडावेळ परतून घ्यावे.
असा हा झटपट दुधी हलवा गार किंवा कोमट कसाही छान लागतो.

टीप:
१) कंडेन्स मिल्कचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
२) दुधी शिजवताना झाकण न ठेवता शिजवावा.

दुधी हलवा रेसिपी - दुध आणि साखर वापरून

Thursday, October 29, 2009

दुधी हलवा - Dudhi Halwa

Dudhi Halwa in English

४ ते ५ जणांसाठी (एकूण दिड ते दोन कप)
वेळ: साधारण १ तास

halwa recipe, halva recipe, dudhi halwa, dudhicha halwa, lauki halwa, bottlegourd halwa, indian sweetsसाहित्य:
पाऊण किलो कोवळा दुधी भोपळा (किंवा किसलेला दुधी अडीच कप)
२ टिस्पून साजूक तूप
दिड कप दुध
३/४ कप खवा (आवडत असल्यास थोडा जास्त घेतला तरी उत्तम)
३/४ कप साखर
१/४ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजू तुकडे, चारोळ्या बेदाणे आवडीनुसार

कृती:
१) दुधीची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा. किसलेला दुधी पिळून पाणी काढून घ्यावे. हे पाणी सूप, आमटी किंवा सांबारामध्येमध्ये वापरता येईल.
२) जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात किसलेला दुधी घालावा आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात दुध घालावे आणि मध्यम आचेवर पातेले झाकून शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.
३) दुध आटले कि दुधी व्यवस्थित शिजला आहे कि नाही ते पाहावे. लागल्यास थोडे दुध घालावे. खवा व्यवस्थित बारीक करून घालावा, गुठळ्या राहू देवू नयेत. जर गुठळ्या राहिल्याच तर कालथ्याने फोडाव्यात.
४) खवा घातल्यावर थोड्यावेळानंतर साखर, वेलचीपूड, सुकामेवा घालावा आणि ढवळावे. आच मध्यम ठेवावी. साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल. एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो.

टीप:
१) दुधी बिनबियांचा असावा तसेच कोवळा विकत घ्यावा.
२) जर घरात उरलेले पेढे असतील तर त्याची पावडर करून खवा म्हणून वापरू शकतो, फक्त साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल.

Label:
Dudhi Halwa, Lauki Halwa, Bottlegourd Halwa