Showing posts with label Tava. Show all posts
Showing posts with label Tava. Show all posts

Thursday, September 1, 2011

घावन घाटले - Ghavan Ghatle

Ghavan Ghatle in English



चकलीच्या सर्व वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी खास रेसिपीज - इथे क्लिक करा



काही दिवसातच गौरींचे आगमन होईल. इतर गोड पदार्थांबरोबरच घावन आणि घाटले हा पारंपारिक पदार्थ गौरींना नैवेद्य म्हणून दाखवायची प्रथा आहे. त्याची कृती पुढील प्रमाणे. नक्की करून पहा!!



घावनाचे साहित्य आणि कृती



वेळ: पूर्वतयारी- ५ मिनिटे | पाकृसाठी - २५ मिनिटे

वाढणी: ८ ते ९ मध्यम घावने

घावन घाटले, gauri poojan naivedya, gaurincha naivedya, ghavan ghatleसाहित्य:

१ कप तांदुळाची पिठी

२ कप दुध / पाणी

चिमूटभर मीठ

घावन बनवण्यासाठी तूप



कृती:

१) तांदुळाचे पीठ, दुध, आणि मीठ एका वाडग्यात मिक्स करावे. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२) नॉनस्टिक तवा मिडीयम फ्लेमवर गरम करावा. तवा गरम झाला कि थोडे तूप घालावे. आणि त्यावर डावभर मिश्रण घालून पसरावे. झाकण ठेवून एक बाजू किमान २ ते ३ मिनिटे शिजू द्यावी. बाजू पालटून झाकण ठेवून दुसरी बाजू शिजवावी. जर असे वाटले कि पूर्ण शिजले नाहीये तर अजून थोडावेळ झाकण ठेवून शिजवावे.

तयार घावन घाटल्याबरोबर सर्व्ह करावे.



टीप:

१) गोड घावन आवडत असल्यास मिश्रणात थोडा गुळ घालावा.



==================================



घाटल्याचे साहित्य आणि कृती:




वेळ: १० मिनिटे

दीड कप (साधारण ३ जणांसाठी)



घावन घाटले, gauri poojan naivedya, gaurincha naivedya, ghavan ghatleसाहित्य:

दीड कप नारळाचे घट्ट दुध

१ टेस्पून तांदूळ पीठ

२ ते ३ चिमटी वेलची पूड

गूळ, गरजेनुसार (मी २ टेस्पून गुळ वापरला होता)



कृती:

१) सर्व साहित्य एकत्र करा. तांदूळ पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची दक्षता घ्या.

२) तयार मिश्रण लहान पातेल्यात घ्या. मंद आचेवर ढवळून शिजवा. मिश्रण दाटसर झाले कि गॅस बंद करा.

तयार घाटले गरम घावानाबरोबर सर्व्ह करा.



टीप:

१) घाटल्यामध्ये काजू पिस्त्याचे काप घातले तरीही चालतील.

२) गुळाचे प्रमाण गरजेनुसार कमी-जास्त करावे.

Thursday, July 28, 2011

दुधी भोपळ्याचे थालीपीठ - Dudhi Thalipeeth

Lauki Thalipeeth in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे

bottle gourd recipe, lauki pancakes, fasting recipes, fast recipes, vrat ka khana, dudhi bhoplyache thalipith, thalipeeth recipeसाहित्य:
१ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
दीड ते दोन कप उपवासाची भाजणी किंवा गरजेनुसार
३ हिरव्या मिरच्या, ठेचून
१/४ चूप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना

कृती:
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्याभागी तेल सोडायला बोटाने छिद्रं करावे.
३) मिडीयम आणि हायच्या मध्ये गॅस अडजस्ट करावा. झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे.

टीप:
१) दुधी बिनबियांचा आणि कोवळा असावा, म्हणजे किसायला सोपा जातो.
२) थालीपिठ शिजायला वेळ लागतो. जास्त थालीपीठं बनवताना वेळ वाचवण्यासाठी दोन शेगड्यावर दोन तवे वापरून थालीपीठं बनवावी.
३) काहीजण दुधी भोपळा उपवासाला खात नाहीत. म्हणून दुधीऐवजी काकडी किसून घालावी.

Tuesday, June 14, 2011

नाचणीचे डोसे - Raagi flour dosa

Nachni flour dosa in English

वेळ: ३० मिनिटे
१२ ते १५ मध्यम डोसे

dosa recipe, Indian dosa recipe, raagi flour dosa, nachni pithache dose, healthy breakfast recipe
साहित्य:
१ कप नाचणीचे पीठ
१/२ कप तांदुळाचे पीठ
१/२ कप उडीद डाळ
७ ते ८ मेथी दाणे
चवीपुरते मीठ
डोसा बनवताना थोडे तेल

कृती:
१) नाचणीचे पीठ आणि तांदुळाचे पीठ पाण्यात किमन ५ तास भिजवावे. खूप जास्त पाणी घालू नये बटाटा वड्याच्या पिठाला भिजवतो तसे घट्टसर भिजवावे. दुसऱ्या भांड्यात उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्र करून ५ तास भिजत ठेवावे.
२) ५ तासानंतर उडीद डाळीतील पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी. लागल्यास किंचित पाणी घालावे. आता भिजवलेले पीठ आणि उडीद डाळीची पेस्ट एकत्र करावी. लागेल तसे पाणी घालून नेहमीच्या डोसा पिठाला जेवढं पातळ पीठ असते तेवढे पातळ ठेवावे. चवीपुरते मीठ घालावे.
३) नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर डावभर पीठ घालावे आणि डाव गोलगोल फिरवून डोसा पातळसर पसरवावा. कडेने तेल सोडावे. एक बाजू खरपूस झाली कि डोसा उलटून दुसऱ्या बाजूने निट भाजू द्यावा.
गरम गरम डोसे चटणी बरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) डोसे छान पातळ पसरले गेले पाहिजेत, म्हणून डोशाचे पीठ पातळ ठेवावे. तसेच प्रत्येक वेळी डोसा बनवताना पीठ ढवळून घ्यावे, कारण डोशाचे पीठ स्थिर राहिले कि नाचणीचे पीठ तळाला बसते.
२) हे डोसे सकाळच्या न्याहारीला छान लागतात. म्हणून रात्रभर पीठ आणि डाळ भिजवून सकाळी डाळ वाटून लगेच डोसे बनवता येतात.
३) डोसे दोन्ही बाजूंनी नीट भाजावेत. कारण नाचणीचे पीठ जरा जरी शिजले नाही तर कचकचीत लागते.
४) डोसे बनवताना आवडीनुसार कोथिंबीर, मिरची, कांदा, टोमॅटो घालू शकतो.

Thursday, October 7, 2010

काकडीचे थालिपीठ - kakdiche thalipeeth

Kakdiche Thalipeeth in English

वेळ: २५ मिनीटे
२ ते ३ मध्यम थालिपीठं

fasting recipes, upasache padarth, upasache thalipith, sabudana khichdi, sabudana thalipeeth, kakdiche thalipithसाहित्य:
१ कप काकडीचा किस
दिड कप उपासाची भाजणी
१/४ कप दाण्याचा कूट
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
२ ते ३ हिरव्या मिरच्यांचा ठेचा
चवीपुरते मिठ
तूप

कृती:
१) काकडी सोलून किसावी. किसल्यावर त्यातील पाणी काढून टाकू नये.
२) काकडीच्या किसात थोडे मिठ टाकावे. नंतर दाण्याचा कूट, मिरचीचा ठेचा, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
३) काकडीच्या मिश्रणात भिजेल इतकी उपासाची भाजणी घालावी. व्यवस्थित गोळा मळून घ्यावा.
४) तव्याला तूपाचा हात लावावा. तयार गोळ्याचे २ ते ३ समान भाग करावे. त्यातील १ भाग घेऊन तव्यावर थापावा. झाकण ठेवून थोडावेळ शिजू द्यावे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी थालिपीठ खरपूस होवू द्यावे. थालिपीठ भाजताना कडेने थोडे तूप सोडावे.
दही, लिंबाच्या गोड लोणच्याबरोबर काकडीचे थालिपीठ चविष्ट लागते.

Thursday, April 1, 2010

पोळ्या - Chapati

Chapati in English

साधारण ५ ते ६ मध्यम आकाराच्या पोळ्या
वेळ: १० ते १५ मिनीटे

साहित्य:
१ कप पिठाची मळलेली कणिक
थोडे तेल किंवा तूप
१/२ कप गव्हाचे कोरडे पिठ

कृती:
१) कणकेचे ५ ते ६ मध्यम गोळे करून घ्यावे. तवा गरम करून आच मिडीयम हायवर ठेवावी.
२) एक गोळा घेऊन हाताच्या तळव्यांनी चपटा करून घ्यावा. कोरड्या पिठात बुडवून पातळ पोळी लाटून घ्यावी.
३) लाटलेली पोळी तव्यावर टाकून लगेच ५ ते ६ सेकंदात दुसर्‍या बाजूला उलटावी. हि बाजू ब्राऊन डाग येईस्तोवर भाजावी. पोळी निट आणि सर्व ठिकाणहून भाजण्यासाठी सुती कपड्याने वरून हलकेच दाब द्यावा.
४) एक बाजू भाजली गेली कि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजावी.
पोळी भाजली गेली कि तव्यावरून काढून तेल किंवा पातळ तूप लावून गरम सर्व्ह कराव्यात किंवा डब्यात भराव्यात.
अशाप्रकारे सर्व पोळ्या भाजून घ्याव्यात.

टीप:
१) जर तुम्ही थंड प्रदेशात राहात असाल आणि जर टिफीनसाठी पोळ्या करायच्या असतील तर शक्यतो तुप लावू नये, तेल लावावे. थंडीमुळे तूप गोठते.
२) सर्व पोळ्या लाटून ठेवून भाजल्यास पोळ्या कडक होतात.
३) जास्त पोळ्या बनवून जर डब्यात भरणार असाल तर पोळीच्या डब्यात पंचा किंवा कॉटनचा स्वच्छ कपडा लावून त्यात पोळ्या ठेवाव्यात आणि पोळ्या बनवून झाल्या कि पंचाची उरलेली टोके एकत्र आणून पोळ्या कव्हर कराव्यात वरून डब्याचे झाकण लावावे.
४) पोळ्या नरम होण्यासाठी चांगल्या प्रतीचे गव्हाचे पिठ, गरजेपुरते तेल आणि पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे असते तसेच कणिक व्यवस्थित मळलेली असावी.
५) पोळ्या आपल्या आवडीनुसार जाड किंवा पातळ लाटाव्यात. फक्त सर्व ठिकाणहून सारख्या लाटल्या गेल्या पाहिजेत.
६) तवा व्यवस्थित (मिडीयम हाय) तापलेला असला पाहिजे. खुप जास्त तापला असेल तर पोळ्या करपतात आणि कमी तापला असेल तर पोळ्या कच्च्या राहतात तसेच कडक होतात.
७) पोळीसाठी शक्यतो बिनकाठाचा तवा वापरावा. पण जर तसे शक्य नसेल तर पोळ्यांच्या आकारापेक्षा मोठा तवा किंवा पॅन वापरावा.

Labels:
Chapati, roti, wheat flour roti, polya, kanakechi poli, fulka

Thursday, July 16, 2009

रव्याचे धिरडे - Ravyache Ghavan

Rava Ghavan in English

८ ते १० लहान घावन
वेळ: २० मिनीटे (पिठ भिजवून तयार झाल्यावर)

साहित्य:
१ कप रवा
३/४ कप दही
१/२ कप पाणी
१/२ कप कांदा, बारीक चिरलेला
१/२ कप टोमॅटो, बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून आलेपेस्ट
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
चिमूटभर बेकींग सोडा (खायचा सोडा)
१/४ कप तेल

कृती:
१) दही आणि पाणी एकत्र करून घट्ट ताक बनवून घ्यावे. त्यात रवा घालून मिक्स करावे. लागल्यास अजून थोडे ताक घालावे. मिश्रण पातळ नको आणि खुप घट्टही नको. मिश्रण एक दिड तास झाकून ठेवून दयावे.
२) एक दिड तासांनंतर त्यात कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलेपेस्ट, जिरे, कोथिंबीर, मिठ आणि बेकींग सोडा घालून मिक्स करावे.
३) नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून गरम करावा. तवा गरम झाला कि १ डाव मिश्रण घालावे, फक्त पळीने पसरू नये, घावन जाडसरच ठेवावे. मिडीयम हाय फ्लेमवर तव्यावर झाकण ठेवून शिजू द्यावा. एक बाजू शिजली कि थोडे तेल घालून दुसरी बाजू भाजून घ्यावी.

गरमच असताना खावे. नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Rava uttappa, Rava Ghavan, Semolina Pancakes

Tuesday, May 5, 2009

खव्याच्या पोळ्या

khavyachi Poli in English

वाढणी: १२ ते १५ मध्यम (५ इंच)

khavyachya Polya, pakvanna, god dhod, pancha pakvanna, Khoya Roti, Sweet Roti, Sweet Poli
साहित्य:
सारण::::
१ कप खवा (रिकोटा चिजपासून खवा कसा बनवावा?)
१/२ ते ३/४ कप पिठीसाखर
२ टिस्पून तूप
६ टेस्पून बेसन (१/४ कप + २ टेस्पून)
१ टिस्पून वेलचीपूड
पोळी::::
३/४ कप मैदा
१/४ कप + २ टेस्पून गव्हाची कणिक
३ टेस्पून तेल
१/४ टिस्पून मिठ
१/२ कप मैदा पोळी लाटण्यासाठी

कृती:
१) पोळीसाठी आधी मैदा आणि कणकेचे पिठ भिजवून घ्यावे. मैदा आणि कणिक मिक्स करून घ्यावी, मिठ घालावे. ३ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. थोडे पाणी घालून पिठ घट्टसर मळून घ्यावे. खव्याचे मिश्रण तयार होईस्तोवर पिठ झाकून ठेवावे.
२) खवा गुलाबीसर भाजून घ्यावा आणि एका भांड्यात काढून ठेवावा. खव्यात गाठी असतील फोडून घ्याव्यात. २ टेस्पून तूप गरम करून त्यात बेसन मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे आणि एका वाडग्यात काढून ठेवावे. कोमटसर झाल्यावर खवा, बेसन, साखर आणी वेलचीपूड एकत्र करून मळून घ्यावे. हे मिश्रण जर खुप चिकट वाटले तर थोडे तूप हातावर घेऊन मळावे. मिश्रणात गुठळ्या नसाव्यात.
३) पोळ्या करायच्या आधी मैदा-कणकेचे मळलेले पिठ परत एकदा मळून घ्यावे. पोळी करायला खव्याच्या मिश्रणाची दिड ते २ इंचाचे गोळी करावी. आणि मैद्याच्या दोन गोळ्या कराव्यात, त्या खवा मिश्रणाच्या निमपट आकाराच्या असाव्यात. मैद्याच्या दोन लाट्या लाटून खव्याचे मिश्रण मधे भरावे. आणि कडा सिल करून हलक्या हाताने पोळी लाटावी. लाटताना थोडा सुका मैदा घ्यावा.
४) तवा गरम करावा त्यावर लाटलेली पोळी थोड्या तूपावर खरपूस भाजून घ्यावी. आच मध्यम ठेवावी, मोठ्या आचेवर भाजू नये त्यामुळे कव्हर कच्चे राहू शकते.

Labels:
Khoya Roti, Khava Poli, खव्याच्या पोळ्या

Thursday, August 7, 2008

तवा पुलाव - Tava Pulav

Tawa Pulao (English Version)

वाढणी : जणांसाठी


हा चमचमीत तवा पुलाव चविष्ट अशा रायत्याबरोबर खा आणि खिलवा !!!

veg dish, tawa recipe, Curry rice recipe, Indian Recipe, veg dish, cooking rice, healthy recipe, fat burn

साहित्य:
:::: भातासाठी ::::
टिस्पून + टिस्पून बटर
/ कप बासमती तांदूळ
दिड ते पाउणेदोन कप पाणी
मिठ
:::: मसाला ::::
गाजर : / कप पातळ चिरलेले ( इंच तुकडे)
भोपळी मिरची: / कप पातळ उभी चिरलेली ( इंच तुकडे)
फ्लॉवरचे तुरे अर्धे शिजवलेले : / कप
कांदा : / कप बारीक चिरून / कप उभा चिरून tawa pulao recipe, Indian recipe, Basmati rice recipe, weight gain, basmati rice recipe, vegetarian recipe
टॉमेटो : / कप बारीक चिरून
शिजवलेला बटाटा : / कप बारीक फोडी
वाफवलेले मटार : / कप
दिड टिस्पून लसूण पेस्ट
/ टिस्पून जिरे
दिड टिस्पून लाल तिखट
टिस्पून बटर
टिस्पून पावभाजी मसाला
खडा मसाला : लहान तुकडा दालचिनी, लवंगा, तमाल पत्र, वेलची
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

कृती:
) बासमती तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवावा. नंतर टिस्पून बटर नॉनस्टिक भांड्यात गरम करावे त्यावर बासमती तांदूळ ते मिनीटे परतावा. नंतर दिड ते पाउणेदोन कप पाणी घालावे. थोडे मिठ घालावे. मिडीयम लो फ्लेमवरती झाकण ठेवता भात शिजवावा. मधेमधे ढवळावा. भात शिजला कि एका ताटात किंवा परातीत तो मोकळा करावा. थोडे बटर शिजलेल्या भाताला लावून घ्यावे. वरून बटर घातल्याने भाताला छान तकाकी येते. हे करताना भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
) नंतर नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करावा. त्यात टिस्पून बटर घालावे. लगेच जिरे घालावे. जिरे तडतडले कि लसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे. ३० सेकंद परतावे.
) कांदा घालून थोडे परतावे. कांदा थोडा शिजला कि भोपळी मिरची आणि गाजर घालावे. साधारण ते मिनीटे परतावे. भाज्या अगदी पूर्ण शिजवू नयेत.
) नंतर फ्लॉवरचे तुरे, टॉमेटो घालून - मिनीटे परतावे. नंतर मटार, बटाटा आणि पावभाजी मसाला घालावा. चवीनुसार मिठ घालावे. पावभाजीला करतो तशा या भाज्या आपण मॅश करणार नाही आहोत कारण पुलावमध्ये भाज्या दिसल्या पाहिजेत.
) हि भाजी तयार झाली कि ती तव्याच्या एका कडेला करून घ्यावी. तव्याच्या रिकाम्या भागात / टिस्पून बटर घालावे त्यात खडामसाला घालावा. १० - १५ सेकंद परतून भाजी त्यात मिक्स करावी. जर आपण खडा मसाला आधीच फोडणीत घातला असता तर त्याचा स्वाद गरजेपेक्षा जास्त उतरला असता. म्हणून भाजी झाल्यावर शेवटी खडा मसाल्याची फोडणी करून भाजीत मिक्स करावी.
) भाजी झाली कि गॅस मिडीयम हायवर ठेवावा. या भाजीत तयार भात घालावा. भाताचे भाग करून एकेक भाग भाजीत घालावा म्हणजे सर्व भाताला भाजी लागेल आणि निट मिक्स होईल. तव्यावर हा भात छान परतून रायत्याबरोबर गरम गरम सर्व्ह करावा.

Labels: tawa Pulao, Mumbai Tawa Pulav, Pulav recipe, Tawa recipe, pavbhaji pulav, spicy pulao recipe

Tuesday, July 8, 2008

रताळे पोळी - Ratale Poli

Sweet Potato Roti (English Version)

Ratale poli, ratale recipe, Sweet potato Recipe, Sweet Potato roti, maharashtrian Recipe, indian grocery

साहित्य:
२ कप रताळ्याच्या फोडी
१ कप किसलेला गूळ
कणिक
२ टेस्पून तेल
तूप

कृती:
१) फोडी कूकरमध्ये वाफवून घ्याव्यात. फोडी कूकरच्या डब्यात ठेवाव्यात, डब्यात पाणी घालू नये. डब्यावर झाकण ठेवावे व फक्त कूकरच्या तळाशी पाणी घालावे. आणि २-३ शिट्ट्या कराव्यात.
२) गरम फोडींमध्ये गूळ घालून चमच्याने ढवळावे. मिश्रण पातळसर झाले कि भिजेल इतकी कणिक त्यात घालावी व तेल लावून मळावे. मध्यम भिजवावे. पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.
३) पोळ्या लाटून तूपावर खरपूस भाजून घ्याव्यात.
या पोळ्या ३-४ दिवस छान टिकतात.

टीप:
१) पोळ्या जर जास्त गोड हव्या असतील तर १ कप ऐवजी सव्वा कप गूळ वापरावा.

Labels:
Ratale poli, Sweet Potato recipe, Ratale

Thursday, May 29, 2008

मिनी उत्तप्पा - Mini Uttappa

Mini Uthappa (English Version)

uthappa recipe, Uttappa recipe, South Indian Uthappa, Onion Uthappa, Masala Uthappa

साहित्य:
१/२ कप उडीद डाळ
सव्वा ते दिड कप तांदूळ
चवीपुरते मिठ
१ कांदा
१ टोमॅटो
१ टीस्पून मिरचीचा ठेचा (ऑप्शनल)
कोथिंबीर
१/२ वाटी तेल

कृती:
१) तांदूळ आणि उडीद डाळ पाण्यात साधारण ७-८ तास भिजत घालावे. नंतर मिक्सरमध्ये थोडे बारीक वाटून घ्यावे. मिश्रण एकदम पातळ किंवा घट्टं नसावे. मध्यमसरच वाटावे, त्यानुसार वाटताना पाणी घालावे. मिक्सरमध्ये डाळ व तांदूळ वाटताना १ चमचाभर मिठ घालावे.
२) वाटलेले मिश्रण आंबवण्यासाठी उबदार ठिकाणी किमान १०-१२ तास झाकून ठेवावे. जर वातावरण खुप थंड असेल तर ओव्हन २-३ मिनीटे प्रिहीट करून बंद करावा व मिश्रण झाकून ओव्हनमध्ये ठेवावे. तेवढ्या उबेवर पिठ आंबते. आवश्यकतेनुसार आंबवलेल्या पिठात मिठ घालावे.
३) पिठ आंबले कि कांदा पातळ आणि उभा चिरावा. कांद्याला थोडे मिठ चोळून घ्यावे. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
४) नॉनस्टीक तवा गरम करावा. १/२ चमचा तेल घालावे. आंबवलेल्या पिठापैकी १ डाव पिठ तव्यावर घालून थोडे जाडसर पसरवावे. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आवडत असल्यास किंचीत मिरचीचा ठेचा लावावा.
५) मध्यम आचेवर तव्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढावी. एक बाजू शिजली कि सावकाशपणे कालथ्याने बाजू पलटावी कारण वरच्या बाजूवर आपण कांदा टोमॅटो घातले आहेत. दुसरी बाजू शिजू द्यावी. गरम गरम मिनी उत्तपा, सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे.


टीप:
१) मसाला डोसा बनवताना जी बटाट्याची भाजी करतो ती भाजी, उत्तप्प्यावर कांदा टोमॅटो घालून एक वाफ काढली कि पसरवावी आणि हि बाजू शेकवावी. हा मसाला उत्तप्पाही मस्त लागतो.

Labels:
Mini Uttappa, Onion Uttappa, Tomato Uthappa, South Indian Recipe, Onion Tomato Uthappa

Friday, March 7, 2008

टोमॅटो ऑम्लेट - Tomato Omlete

Tomato Omelette (English Version)

tomato recipe, tomato omlette recipe, snacks, weight loss tomato diet, indian recipe, indian tava recipe, healthy recipe, Healthy indian recipe, low sugar recipe, low calorie recipe
साहित्य:
३ वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो
एक ते दिड वाटी बारीक चिरलेला कांदा
दोन वाट्या तांदूळ पिठ
अर्धी वाटी बेसन
२ मिरच्या बारीक चिरून किंवा चवीनुसार लाल तिखट
२-३ लसूण पाकळ्यांची पेस्ट (ऑप्शनल)
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा हळद
१ चमचा जिरेपूड
हिंग
तेल
मीठ

कृती:
१) चणापिठ आणि तांदूळपिठ एकत्र करावे त्यात पाणी घालून दाटसर भिजवावे. गुठळ्या राहू देवू नयेत. त्यात हळद, हिंग, चिरलेला टोमॅटो, कांदा, मिरच्या, लसूणपेस्ट, १ चमचा जिरेपूड
, कोथिंबीर, मीठ घालून निट मिक्स करावे. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असू नये.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनला तेल लावून घ्यावे. पॅन गरम होवू द्यावा. पॅन गरम झाला कि गॅस मध्यम आचेवर ठेवावा. एक डावभर मिश्रण फ्राईंग पॅनमध्ये घालावे. पाण्याचा हात घेउन मिश्रण बोटांनी किंवा डावेनेच पसरवावे. कडेने तेल घालावे. वरून झाकण ठेवावे. एक बाजू खरपूस झाली कि कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू शिजू द्यावी.
टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावे. तसेच टोमॅटो ऑम्लेटबरोबर स्लाईस ब्रेडसुद्धा छान लागतो.

टीप :
१) काही जणांना पथ्यामुळे चणापिठ खायचे नसते त्यांनी पूर्ण तांदूळपिठ वापरून टोमॅटो ऑम्लेट बनवले तरीही चालते.

Labels:
Tomato Omelette, tomato Omlet, veg omlet recipe

Monday, October 15, 2007

घावन - Ghavan

Ghavan



साहित्य:
१/२ कप तांदूळ पिठ
२ टेस्पून चणा पिठ
दिड कप आंबट ताक
१/४ कप बारीक चिरलेला कांदा (ऑप्शनल)
२-३ हिरव्या मिरच्या
२ पाकळ्या बारीक चिरलेली लसूण
१/२ टिस्पून हळद
१/२ टिस्पून जिरे
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
१/२ कप तेल


कृती:
१) तांदूळ पिठ आणि चणा पिठ एकत्र करून त्यात ताक घालावे. गुठळ्या न होता पातळसर भिजवून घ्यावे.
२) त्यात जिरे, कांदा, मिरच्या, हळद, कोथिंबीर, लसूण, मीठ घालून निट ढवळून घ्यावे.
३) नॉनस्टीक फ्राईंग पॅन गरम करावा. त्यामध्ये किंचीत तेल घालून घावन घालावे. लसणीच्या तिखटाबरोबर गरम गरम खावे.

टीप:
१) जर ताकाची आंबट चव नको असेल तर त्याऐवजी पाणी घालावे.
२) जर कांदा आवडत नसेल तर कांदा वगळून घावन घालावे.
३) पिठ जर थोडे पातळ भिजवले तर घावनाला छान जाळी पडते.

Labels:
Ghavan, spicy pancake, Amboli recipe, Ghavan Recipe, Ghawan Recipe, Maharashtrian Pancake recipe

Monday, October 8, 2007

आलू पराठा - Aloo Paratha

Aloo Paratha in English

marathi, aloo paratha, batata paratha, batata paratha recipe
साहित्य:
गव्हाचे पिठ
२ मध्यम आकाराचे शिजलेले बटाटे
१ चमचा लसूण पेस्ट
१ ते दिड चमचा हिरव्या मिरच्यांचा ठेचा
पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा जिरे
१ लहान चमचा जिरेपूड
मीठ
बटर

कृती:
१) २ ते अडीच वाट्या गव्हाचे पिठ मळून घ्यावे. चवीसाठी मिठ घालावे.
२) शिजलेले बटाटे किसून घ्यावेत त्यामुळे बटाट्याच्या गुठळ्या होणार नाहीत. त्यात लसूण पेस्ट, मिरची ठेचा, कोथिंबीर, जिरे, जिरेपूड आणि मिठ मिक्स करावे.
३) कणकेचे आणि बटाट्याच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे समान गोळे करावे.
४) ४ इंच गोल पोळी लाटून त्यात बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा आणि कणकेची बाकी टोकं मध्यभागी आणून बटाट्याचे मिश्रण पूर्ण कव्हर करावे (पुरणपोळीला जसे स्टफिंग करतो तसे).
५) पोळपाटावर थोडे गव्हाचे पिठ लावावे. आणि हलक्या हाताने पराठा लाटावा. तवा गरम करावा आणि मगच पराठा त्यावर टाकावा. बटर किंवा तेलावर हा पराठा दोन्ही बाजूंनी निट भाजावा.


टीप:
१) पराठ्यात लसणीऐवजी अगदी बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकतो.
२) पिठ अगदी सैल मळू नये, किंचीत घट्टच असावे.

चकली

Tuesday, September 25, 2007

साबुदाणा थालिपीठ - Sabudana Thalipith

Sabudana Thalipeeth (English Version)

Sabudana Thalipith, Thalipith Recipe, Upavasache Thalipith, Thaleepith, Sago Recipe, fasting recipe, fast recipe, sago thalipith


साहित्य:
२ वाट्या साबुदाणा
२ मध्यम बटाटे (शिजवलेले)
१/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट
५-६ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा जीरे
१/२ चमचा जीरेपूड
चवीपुरते मिठ
तेल/ तूप
थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शिट


कृती:
१) साबुदाणे पाण्यात भिजवावे.उरलेले पाणी काढून टाकावे. ३-४ तास भिजत ठेवावेत.
२) शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
३) मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
४) शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर बारीक करावेत.
५) भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
६) प्लास्टीक शिटला तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
७) नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. दही, मिरचीचा ठेचा, किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते.


चकली

Wednesday, September 5, 2007

मसाला डोसा - Masala Dosa

Masala Dosa in English

कृती वाचल्यावर त्याखालील टीपा जरून पाहा.

साहित्य :
डोसा
१ कप उडीद डाळ
अडीच ते पाऊणेतीन कप तांदूळ
१/२ कप चणा डाळ
१/२ टिस्पून मेथीदाणे
चवीपुरते मीठ
मसाला
२ उकडलेले मोठे बटाटे
१ मध्यम कांदा, उभा तापळ चिरून
१ टिस्पून उडीद डाळ
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५ ते ६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून किसलेले आले
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद

कृती:
डोसा
१) उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून, ६-७ तास पाण्यात भिजत ठेवावे. उडीद डाळी बरोबरच मेथी दाणे आणि चणा डाळ भिजवावी.
२) नंतर त्यातील पाणी काढून टाकून मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे. तांदूळ वाटताना त्यात १ टिस्पून साखर आणि १ टिस्पून मिठ घालावे. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करावेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ करू नये. मिश्रण चांगले मिळून आले पाहिजे.
३) वरुन झाकण ठेवून १० ते १२ तास मिश्रण आंबू द्यावे. मिश्रण आंबले कि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. याच पिठाच्या इडल्याही करता येतील. म्हणून मिश्रण घट्टसरच ठेवावे. डोसे बनवण्यासाठी आंबलेले पिठातील थोडे पिठ दुसर्‍या भांड्यात काढावे आणि किंचीत पाणी घालून पातळ करावे.
४) डोसे घालण्यासाठी नॉनस्टीक तवा वापरावा. आमटी वाढायच्या पळीने डोसे नीट घालता येतात.
मसाला/ बटाटा भाजी
१) शिजलेले बटाटे अगदी बारीक चिरून घ्यावे. कांदा बारीक उभा चिरून घ्यावा.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आले घालून फोडणी करावी. त्यात थोडी उडीद डाळ घालावी. मिरच्या बारीक चिरून घालाव्या. कढीपत्ता घालावा.
३) मध्यम आचेवर कांदा परतावा. चिरलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
डोसे गरमागरम सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे.


संबंधित पाककृती:
उडीपी सांबार रेसिपी
दाक्षिणात्य पद्धतीची नारळाची चटणी
हिरव्या रंगाची नारळाची चटणी

टीप:
१) आधी भाजी करून मग डोसे करावेत.
२) डोसे बनवताना तव्यावर तेल नसावे. जर डोसा-पिठ पसरवायच्या आधीच तेल घातले तर पिठ व्यवस्थित तव्यावर पसरत नाही. अशावेळी आधी डोसा पिठ घालून व्यवस्थित पातळ पसरवून घ्यावे. थोडा ब्राऊन रंग दिसला कि मग कडेने तेल सोडावे.
३) डोश्याला आतमध्ये थोडा शेजवान सॉस लावला तर मस्त टेस्ट येते.
४) मेथी दाण्यांमुळे फ्लेवर चांगला येतो. तसेच चणाडाळीमुळे थोडा कुरकूरीतपणा आणि किंचीत पिवळसर रंग येतो.
५) साखरेमुळे पिठ आंबण्याची क्रिया चांगली होते.
६) डोशाचे पिठ आंबण्यासाठी , पिठ बारीक करून उबदार जागी ठेवावे. थंड प्रदेशात डोशाचे पिठ आंबत नाही त्यामुळे ओव्हन २ ते ३ मिनीटे २७५ डीग्री Fahrenheit (१३५ डीग्री Celsius) वर प्रिहीट करावा. २ ते ३ मिनीटांनंतर ओव्हन बंद (स्विच ऑफ) करावा, तसेच जास्तवेळ गरम करू नये. आणि भिजवलेले पिठ झाकण ठेवून ओव्हनमध्ये साधारण १० तास ठेवावे. पिठ आत टाकल्यावर ओव्हनचे दार उघडू नये.

Labels:
Masala Dosa, Dosai recipe

Saturday, September 1, 2007

कोथिंबीर वडी - Kothimbir Wadi

kothimbir Wadi in English

kothimbir wadi, cilantro snacks, cilantro fried cakes, corinader wadi, coriander pakodaसाहित्य:
३ जुड्या कोथिंबीर निवडून चिरलेली
सव्वा कप चणा पिठ
१ कप पाणी
१ टेस्पून तांदूळ पिठ
७-८ लसूण पाकळ्या
१ छोटा आल्याचा तुकडा, किसून
६-७ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून हळद
१ टिस्पून जिरे
२ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) प्रथम लसूण, आले यांची पेस्ट करून घ्यावी. मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. बारीक चिरून ठेवावी.
२) चणा पिठात पाणी, तांदूळ पिठ घालून भज्यांसाठी जेवढे घट्ट पिठ भिजवतो तेवढे घट्ट भिजवावे. चवीपुरते मीठ घालावे. गुठळ्या राहू देवू नयेत.
३) कढईत १ चमचा तेल गरम करावे. हळद, जिरे, आले-लसूण पेस्ट, मिरच्या यांची फोडणी करावी. त्यात कोथिंबीर अर्धा ते एक मिनीट परतावी. गॅस मध्यम ठेवावा. भिजवलेले पिठ घालावे आणि सतत ढवळत राहावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण घट्टसर होईस्तोवर ढवळावे आणि जर थोड्या गुठळ्या झाल्याच तर कालथ्याने मोडाव्यात. बारीक गॅसवर कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. मिश्रण कढईच्या तळाला लागणार नाही याची काळजी घ्यावी.
५) मिश्रणाला आवश्यक तेवढा घट्टपणा आला आहे कि नाही हे बघण्यासाठी कालथा मिश्रणात रोवून ठेवावा. जर तो सरळ उभा राहिला तर मिश्रण तयार झाले आहे असे समजावे. गॅस बंद करावा. मिश्रण शिजायला साधारण ८ ते १० मिनीटे लागतात.
६) मिश्रण थोडे निवळले की परातीत किंवा स्टीलच्या ताटाला थोडे तेल लावून मिश्रण त्यावर समान थापावे. १ ते दिड सेंटीमिटरचा थर करावा. थापलेले मिश्रण थंड झाले कि वड्या पाडाव्यात.
७) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. पुर्ण पॅनमध्ये तेल पसरले गेले पाहिजे. तयार कोथिंबीर वड्या त्यात मध्यम आचेवर दोन्ही बाजू छान गोल्डन ब्राउन होईस्तोवर फ्राय कराव्यात.

टीप:
१) तिखटपणा कमी-जास्त हवा असेल तर त्या प्रमाणात मिरच्या घालाव्यात.
२) जर आवडत असेल तर या वड्या शालो फ्राय न करता डीप फ्रायसुद्धा करू शकतो.

Labels:
deep fried snack, indian snack, savory snacks, fritters, kothimbir wadi, cilantro wadi, coriander vadi

Thursday, August 23, 2007

मूगाचा डोसा (पेसरट्टू) - Moogacha Dosa

Moogacha Dosa


"पेसरट्टू" म्हणजेच मूगाच्या डाळीचा डोसा. हा डोसा मुख्यतः दक्षिण भारतातील आन्ध्र प्रदेश या राज्यात बनवला जातो. आन्ध्र प्रदेशात पेसळू (Pesalu) म्हणजे हिरवे मूग. सालासकट मूगाची डाळ यासाठी वापरली जाते. नारळाच्या चटणीबरोबर हा डोसा फारच रुचकर लागतो.मी Mints च्या ब्लॉगवरून कृती पाहून हा मुगाचा डोसा ट्राय केला.

चकली

Tuesday, July 3, 2007

पावभाजी - Pavbhaji

Pav Bhaji In English

साधारण २ ते ३ प्लेट

Pav bhaji, Paobaji, Bombay Pavbhaji, Spicy Pao Bhaji, Butter Pao Bhaji, Cheese Pao bhajiसाहित्य:
१० ते १२ पाव (लादीपाव)
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
दिड कप बारीक चिरलेला टोमॅटो
१ कप उकडून किसलेला बटाटा
१०-१२ वाफवलेले फ्लॉवरचे छोटे तुरे
१/२ कप वाफवलेले मटार
१/४ ते १/२ कप सिमला मिरचीचे छोटे तुकडे
८ लसूण पाकळ्या
१ टिस्पून लाल तिखट
४ टेस्पून तेल
१/२ टिस्पून जिरे
२ टेस्पून पावभाजी मसाला
चवीनुसार मीठ
सर्व्ह करताना बटर, लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर

कृती :
१) चिरलेल्या आणि वाफवलेल्या भाज्या तयार ठेवाव्यात.
२) लसूण सोलून त्यात लाल तिखट घालावे. १ मोठा चमचा पाणी घालून मिकसरवर बारीक करावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालावे, लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट घालावी.लसूण परतले गेल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. मध्यम आचेवर तो शिजू द्यावा. नंतर त्यात चिरलेली सिमला मिरची घालावी.
४) २-३ मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालावे. टोमॅटो नरम झाले की बटाटा, फ्लॉवर आणि मटार घालावे. ढवळून त्यात पावभाजी मसाला घालावा. थोडे पाणी घालावे.पावभाजी कढईच्या तळाला लागू नये म्हणून मधेमधे ढवळत राहावे. मॅशरने चांगले मॅश करावे.
५) नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे. वाढताना बटर घालावे. वरुन लिंबू पिळावे आणि कोथिंबीर पेरावी.

Labels:
Paobhaji, Bhaji Pao, Bombay Pavbhaji recipe, Mumbai Street food

Thursday, June 21, 2007

वांग्याचे काप - Vangyache Kap / Kaap

Vangyache Kap in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: ३० मिनीटे

vangyache kaap, eggplant recipes, vegetarian recipe, healthy recipes, lose weight, health benefits of eggplant, baingan recipe,साहित्य :
१ मध्यम वांगे
१/२ कप तांदूळ पीठ
१ टेस्पून बेसन पीठ
२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून जीरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ
साधारण वाटीभर तेल

कृती :
१) वांग्याच्या गोल चकत्या कराव्यात. ८-१० मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावे.
२) पाण्याबाहेर काढून वांग्यावरील पाणी टिपून घ्यावे.
३) चणा पीठ, तांदूळ पीठ, हळद, तिखट, हिंग, मीठ, जीरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर एकत्र करावे. (अजिबात पाणी घालू नये)
४) काप दोन्ही बाजूंनी वरील मिश्रणात घोळवून घ्यावे.
५) नॉन स्टिक तव्यावर २-३ चमचे तेल घालावे. आणि काप तव्यावर ठेवावे. मध्यम आचेवर वरुन झाकण ठेवून काप शिजू द्यावेत. बाजूने थोडे तेल सोडावे.
६) एक बाजू गोल्डन ब्राऊन झाल्यावर काप दुसर्‍या बाजूवर परतावे.
७) ३-४ मिनिटांनी सुरीने काप शिजले आहेत की नाही ते बघावे. जेवताना गरम गरम तोंडी लावणी म्हणून हे काप छान लागतात.

टीप:
१) वांगी ताजी असावीत, जुन वांग्यामध्ये बिया असतात, तसेच काही वांगी खाल्ल्यावर घशाला खवखवतात. त्यामुळे वांग्याचा एखादा तुकडा जिभेला लावून पाहावा.
२) मोठी वांगी किंवा जपानी वांगी (लांब आणि बारीक) दोन्ही कापांसाठी चालतात, फक्त जपानी वांग्यांना किंचीत गोड चव असते.

Labels
vange Kaap, Vangyachi Kaape, Eggplant fritters, eggplant fry

Sunday, June 3, 2007

पालक परोठा - Palak Paratha

Palak Paratha

साहित्य:
१ जुडी पालक (बारीक चिरून)
१ छोटा कांदा (एकदम बारीक चिरून किंवा मिक्सरमधून काढावा म्हणजे लाटताना परोठा फाटणार नाही)
कणीक
६-७ लसूण पाकळ्या
३-४ तिखट मिरच्या
१ टीस्पून जीरे
मीठ
तेल
परोठे लाटण्यासाठी जाड प्लास्टिकचे दोन चौकोनी तुकडे घ्यावे.

कृती:
१) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात.
२) पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण आणि बारीक चिरलेला कांदा घालावा.
३) त्यात १ कप कणीक घालावी १ टीस्पून मीठ आणि जीरे घालावे.
४) अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे.
५) आधी प्लास्टिक शीट्सला तेल लावून घ्यावे, नंतर हाताला तेल लावून मध्यम आकाराचा गोळा एका प्लास्टिक शीटवर ठेवावा, दुसरी प्लास्टिक शीट त्यावर ठेवून हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवावे. जास्त जोर देऊ नये नाहीतर गोळा खालच्या प्लास्टिक शीटला चिकटतो.
६) गोळा लाटून झाल्यावर फुलक्या एवढा आकार होतो.
७) एका हाताने लाटलेला परोठा प्लास्टिक शीटसकट उचलून दुसर्‍या हातावर ठेवावा. आणि हलकेच प्लास्टिक शीट परोठ्यापासून सोडवावी. आणि परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल सोडावे.
८) दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.

टिप : आवडीनुसार परोठा बटर वर करू शकतो.