Sunday, June 3, 2007

पालक परोठा - Palak Paratha

Palak Paratha

साहित्य:
१ जुडी पालक (बारीक चिरून)
१ छोटा कांदा (एकदम बारीक चिरून किंवा मिक्सरमधून काढावा म्हणजे लाटताना परोठा फाटणार नाही)
कणीक
६-७ लसूण पाकळ्या
३-४ तिखट मिरच्या
१ टीस्पून जीरे
मीठ
तेल
परोठे लाटण्यासाठी जाड प्लास्टिकचे दोन चौकोनी तुकडे घ्यावे.

कृती:
१) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात.
२) पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण आणि बारीक चिरलेला कांदा घालावा.
३) त्यात १ कप कणीक घालावी १ टीस्पून मीठ आणि जीरे घालावे.
४) अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे.
५) आधी प्लास्टिक शीट्सला तेल लावून घ्यावे, नंतर हाताला तेल लावून मध्यम आकाराचा गोळा एका प्लास्टिक शीटवर ठेवावा, दुसरी प्लास्टिक शीट त्यावर ठेवून हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवावे. जास्त जोर देऊ नये नाहीतर गोळा खालच्या प्लास्टिक शीटला चिकटतो.
६) गोळा लाटून झाल्यावर फुलक्या एवढा आकार होतो.
७) एका हाताने लाटलेला परोठा प्लास्टिक शीटसकट उचलून दुसर्‍या हातावर ठेवावा. आणि हलकेच प्लास्टिक शीट परोठ्यापासून सोडवावी. आणि परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल सोडावे.
८) दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.

टिप : आवडीनुसार परोठा बटर वर करू शकतो.

No comments:

Post a Comment