Showing posts with label desserts. Show all posts
Showing posts with label desserts. Show all posts

Wednesday, September 28, 2011

चॉकोलेट ब्राउनी सिझलर - Brownie Sizzler

Chocolate Brownie Sizzler in English

वेळ: १५ मिनिटे
४ जणांसाठी

chocolate brownie sizzler, sizzler recipesसाहित्य:
४ चॉकोलेट ब्राउनीज
चॉकोलेट सॉससाठी:- १ मिल्क चॉकोलेटचा बार, १/२ कप दुध
वेनिला आईसक्रीम
सिझलर प्लेट आणि त्याच्याखालील लाकडी ट्रे
ड्राय फ्रुट्स (अक्रोड आणि बदामाचे काप)

कृती:
१) चॉकोलेट सॉससाठी आधी चॉकोलेट वितळवण्याची गरज आहे. चॉकोलेटचे मध्यम तुकडे करून काचेच्या बोलमध्ये ठेवून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. एग बिटरने ढवळावे. गरजेप्रमाणे १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. प्रत्येकवेळी ढवळून पहावे. कारण मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ आतून बाहेर असे कुक होतो. गरजेपेक्षा जास्त मायक्रोवेव्ह केल्यास चॉकोलेट करपेल.
२) एकदा चॉकोलेट वितळले कि त्यात दुध घालून जोरात ढवळावे आणि गुठळ्या राहू देवू नयेत. थोडे थोडे दुध घालावे आणि मिक्स करावे. स्मूथ आणि चकचकीत असा सॉस बनेस्तोवर फेटावे. (सॉस जितका पातळ हवा असेल त्याप्रमाणे दुध जास्त-कमी करावे.)
३) ब्राउनिज जर गर असतील तर १० ते १५ सेकंद मायक्रोवेव्ह कराव्यात. म्हणजे थोड्या कोमट होतील.
४) सिझलर प्लेट गॅसवर गरम करावी. व्यवस्थित गरम होवू द्यात. पक्कडीने काळजीपूर्वक हि प्लेट लाकडी ट्रे मध्ये ठेवावी. मधोमध ब्राउनिज ठेवाव्यात. प्रत्येक ब्राउनीवर एकेक स्कूप वेनिला आईसक्रीम घालावे. आणि वरून चॉकोलेट सॉस घालावा. हा सॉस सिझलर प्लेटवर ओघळला पाहिजे. म्हणजे तो छान सिझल होईल. वरून अक्रोड बदामचे तुकडे घालून गर्निश करावे आणि लगेच सर्व्ह करावे.

कसे खावे? - चमच्यात आईसक्रीम + ब्राउनी + चॉकोलेट सॉस हे तीन्हीचे छोटे चंक्स घेउन खावे.

टीपा:
१) चॉकोलेट सॉस सिझलर प्लेटवर चिकटू नये म्हणून प्लेट गरम करताना त्यावर अल्युमिनम फॉइलचा तुकडा ठेवावा. आणि त्यावर मग ब्राउनी, आईसक्रीम आणि चॉकोलेट सॉस घालावा.
२) चॉकोलेट ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर तुम्ही नोटीस कराल कि बाहेरून चॉकोलेट वितळले नाहीये. पण ढवळल्यावर लक्षात येईल कि आतून चॉकोलेट मेल्ट व्हायला लागले आहे. म्हणून पहिली ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर, ढवळून गरजेनुसार १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. आणि प्रत्येकवेळी ढवळून चेक करावे.
३) खाताना काळजीपूर्वक खावे. सिझलर प्लेटवर जो सॉस आहे तो प्रचंड गरम असतो. आणि जीभ पोळू शकते. म्हणून सॉस कितपत गरम आहे ते चेक करूनच खावे.

Tuesday, May 17, 2011

मँगो आइसक्रीम - Mango Ice cream

Mango Icecream in English

A delicious Homemade Mango Ice-cream.

वेळ: ३० ते ३५ मिनीटे
८ जणांसाठी

Mango Icecream, how to make Icecream at home, eggless icecream, creamy ice creamसाहित्य:
१ कप हेवी व्हिपींग क्रिम, थंडगार
२ कप आंब्याचा रस, थंडगार (मी रेडीमेड कॅन मधील साखर असलेला आंबा रस वापरला होता)
१/२ कप पिठी साखर
वेलचीपूड (ऐच्छिक)

homemade delicious mango icecream, whipping cream, mango pulp, heavy whipping creamकृती:
१) एक मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बोल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
२) गार झालेले काचेचे बोल घेऊन त्यात गार व्हिपींग क्रिम घाला आणि हॅण्ड मिक्सरने जास्त स्पिडवर फेटा.
३) क्रिम थोडे फ्लफी व्हायला लागले कि २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रिम व्यवस्थित फ्लफी झाले कि फेटणे थांबवावे. गरजेपेक्षा जास्त फेटल्याने क्रिम पिवळसर होवून त्यातील स्निग्धांश (fat content) विलग होतो.
४) यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलचीपूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो एसेन्स घालायचा असल्यास २ -३ थेंब घाला. निट मिक्स करा.
५) जर तुमच्याकडे आइसक्रिम मशिन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटवा.
६) जर आईसक्रिम मशिन नसेल तर हे मिश्रण फ्रिझर सेफ प्लास्टिक किंवा फ्रिझर सेफ मेटलच्या भांड्यात घाला (बेकिंगसाठी जे मेटलचे भांडे वापरतात तेही चालेल). साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजरमधून काढा. आईसक्रिम भांड्याच्या कडेने सुटेस्तोवर थांबा. नंतर हे गोठलेले मिश्रण मिक्सरमध्ये काही मिनीटे ब्लेंड करा. परत भांड्यात ओतून १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा. २ तासांनी परत मिक्सरमध्ये फिरवा. असे किमान ३ ते ४ वेळा करा म्हणजे आईसक्रिम स्मूथ लागेल.

टीपा:
१) रेडीमेड आमरसाऐवजी घरी बनवलेला हापूस आंब्याचा रसही वापरता येईल. फक्त आमरस चाळणीतून गाळून घ्यावा म्हणजे गुठळ्या किंवा आंब्यातील धागे निघून जातील. तसेच घरगुती आमरस वापरल्यास जास्त साखरही घालावी लागेल तेव्हा चव पाहून साखर घालावी.
२) भाजलेला खवाही आईसक्रिममध्ये वापरू शकतो. वरील प्रमाणासाठी १/२ ते १ कप खवा वापरावा.
३) बारीक चिरलेले बदाम पिस्ताही घालू शकतो.
४) ३-४ वेळा मिक्सरमध्ये मिश्रण ब्लेंड केल्याव शेवटी जेव्हा आईसक्रिम सेट करण्यास ठेवाल त्यावेळी आंब्याचे साल काढून बारीक तुकडे मिश्रणात घालू शकता, छान लागतात.

Tuesday, May 10, 2011

मँगो लस्सी - Mango Lassi

Mango Lassi in English

२ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे

mango lassi, sweet lassi, khari lassi, Indian bevaragesसाहित्य:
३/४ कप दुध
१ कप दही
३/४ कप आंब्याचा रस (मी कॅनमधील रेडीमेड मँगो पल्प वापरला होता)
४ टेस्पून साखर
१/४ टिस्पून वेलचीपूड (ऐच्छिक)
सजावटीसाठी बदाम पिस्त्याचा भरडसर चुरा

कृती:
१) दुध, दही, मँगो पल्प, साखर आणि वेलचीपूड एकत्र मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावी.
२ सर्व्हींग ग्लासेसमध्ये लस्सी ओतावी. वरून पिस्ता बदामची पूड घालून सजवावे. फ्रिजमध्ये गार करावी आणि मग सर्व्ह करावी.

टीपा:
१) रेडीमेड मँगो पल्पमध्ये बर्‍यापैकी साखर असते. म्हणून ४ टेस्पून साखर वापरली आहे. घरी आमरस बनवून तोही लस्सी साठी वापरता येतो. भरपूर गर असलेले २ हापूस आंबे घ्यावे. साल आणि आतील कोय काढावी. गर मिक्सरमध्ये बारीक वाटावा. जर गरामध्ये आंब्यातील तंतू असतील तर रस गाळून घ्यावा. आणि वरील कृतीप्रमाणे लस्सी बनवावी. आमरस घरी बनवल्याने लस्सीमध्ये साखर अजून घालावी लागेल.
२) शक्यतो पूर्ण स्निग्धांश (Full Fat) असलेले दही वापरावे. घरी विरजले असल्यास उत्तम. ग्रोसरी स्टोअर्समध्ये जे low fat किंवा Fat Free दही मिळते त्याचे टेक्स्चर कधीकधी गुळगुळीत असते त्यामुळे लस्सी चांगली लागत नाही.
३) लस्सीचा पातळ-घट्टपणा आवडीनुसार ठेवावा. त्याप्रमाणे दुधाचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे.

Wednesday, May 4, 2011

आम्रखंड - Amrakhand

!! अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

Amrakhand in English

वेळ: ३० मिनीटे
५ ते ६ जणांसाठी

amrakhand, sweets, shrikhand puri, Gudhi padvaसाहित्य:
३२ OZ चोबानी प्लेन ग्रिक योगर्ट किंवा १/२ किलो चक्का
३/४ ते १ कप आंब्याचा रस (मी कॅनमधील मँगो पल्प वापरला होता)
१ कप साखर
१/२ टिस्पून वेलची पावडर
२ टेस्पून चारोळी
२ टेस्पून पिस्ता, जाडसर पूड करावी किंवा पातळ काप करावे

कृती:
१) ग्रिक योगर्ट सुती कपड्यात बांधून ८ ते १० तास त्यातील पाण्याचा अंश जाईस्तोवर लटकवून ठेवा. खाली एखादे पसरट भांडे ठेवा म्हणजे गळलेले पाणी त्यात जमा होईल.
२) तयार चक्का मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये घ्यावा. त्यात १/२ कप आंब्याचा रस आणि १/२ कप साखर घाला. मिक्स करून १५ मिनीटे साखर विरघळण्यासाठी तसेच ठेवून द्या. परत चमच्याने घोटून चव पाहा. जर आंब्याचा फ्लेवर तसेच गोडपणा हवा असेल तर आवडीप्रमाणे आंब्याचा रस आणि साखर घाला. नंतर पूरणयंत्रातून हे मिश्रण फिरवून घ्या.
३) यात वेलचीपूड, चारोळी, पिस्ता घालून मिक्स करा. फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा आणि पुर्‍यांबरोबर सर्व्ह करा.

टीपा:
१) चक्क्यामध्ये एकाचवेळी सर्व आंब्याचा रस आणि साखर घालू नये. साखर चक्क्यात विरघळली कि चक्का थोडा पातळ होतो. तसेच आंब्याच्या रसाचा पातळपणा आहेच. म्हणून बेताबेताने आंबारस आणि साखर घालून चव पाहावी. आणि गरजेनुसार जिन्नस वाढवावे.
२) घरी काढलेला हापूस आंब्याचा रस रेडीमेड आमरसाऐवजी वापरू शकतो. हा रस पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करावा आणि गाळून घ्यावा. तसेच वरील प्रमाणापेक्षा जास्त साखर घालावी लागेल.
३) किंचीत भरड ठेवलेली साखर किंवा ग्रॅन्युलेटेड शुगर वापरल्यास कदाचित चक्का-साखर पूरणयंत्रातून बारीकही करावे लागणार नाही. फक्त एकदम बारीक पिठी साखर शक्यतो वापरू नये, श्रिखंडाचे टेक्श्चर बदलते.
४) वेलचीऐवजी जायफळ पूडसुद्धा वापरू शकतो.
५) पिस्त्याबरोबर बदाम काजू ही घातले तरी छान लागतात.

Thursday, April 28, 2011

प्रेशर कूकरमधील केक - Pressure Cooker Cake

Cake in Pressure cooker in English

८ ते १० मध्यम तुकडे
पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ मिनीटे

pressure cooker cake, Cake in pressure cooker, chocolate cake in cookerसाहित्य:
३/४ कप मैदा
२५० ते ३०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ ते ३/४ कप )
१/४ कप बटर (मिठविरहित)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)

how to bake cake in pressure cookerकृती:
१) प्रेशर कूकरमधील रींग आणि शिट्टी काढून ठेवावी. आणि प्रेशर कूकर झाकण लावून मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवावा. साधारण ८ ते १० मिनीटे गरम करावा. कूकरमध्ये पाणी घालू नये. कोरडाच गरम करावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे. केकटीनला आतून बटरचे कोटींग करावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. बॅटर एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेपुरतेच बॅटर एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे. खुप जास्त फेटल्याने केक मध्यभागी सिंक होतो.
५) तयार बॅटर केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). कूकरची आच मध्यम करावी. गरम कूकरचे झाकण उघडून त्यात पकडीच्या सहाय्याने केकटीन ठेवावा. झाकण लावावे आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. २५ मिनीटे होईस्तोवर कूकर अजिबात उघडू नये. बेकिग करताना मधेमधे झाकण उघडल्यास कूकरच्या आतील तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण २५ मिनीटांनी कूकरचे झाकण उघडावे. आता केक फुललेला दिसेल पण आतून शिजला नसावा. तरीही मध्यभागी टूथपिकने टोचून पाहावे, जर ओलसर बॅटर लागले असेल तर अजून १०-१२ मिनीटे केक बेक होवू द्यावा.
७) १०-१२ मिनीटांनी टूथेपिकने मध्यभागी टोचून पाहावे. जर टूथपिकला ओलसर बॅटर लागले नसेल आणि टूथपिक क्लिन बाहेर आली तर केक बेक झाला असे समजावे. केकटीन पकडीच्या सहाय्याने बाहेर काढावा.
५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.

टीपा:
१) कंडेन्स मिल्क आवडीनुसार वाढवावे. वरील प्रमाणात बेताचा गोड होतो. काहीजणांना कमीगोड लागू शकतो, म्हणून बॅटर तयार झाले कि त्याची चव पाहावी, लागल्यास थोडे कंडेन्स मिल्क वाढवावे.
२) कूकरची रींग आणि शिट्टी काढायला विसरू नये. तसेच कूकरमध्ये पाणी घालू नये.
३) केकटीन जाड हिंडालियमचा असावा. पातळ मेटल घेऊ नये. उष्णतेमुळे भांड्याला तडा जाऊ शकते.
४) जर दोन कलरमध्ये केक बनवयाचा असेल तर केक बॅटरचे २ भाग करावे. एक भाग तसाच ठेवावा, दुसर्‍या भागात २ ते ३ टेस्पून डार्क कोको पावडर आणि थोडे कंडेन्स मिक्स घालावे. आधी पांढरा तसाच ठेवलेला भाग केकटीनमध्ये ओतावा. त्यावर कोको घातलेले बॅटर घालावे.आणि बेक करावे.
५) केकटीन कूकरमध्ये निट राहतो आहे कि नाही ते आधी तपासून पाहावे. नाहीतर कूकर लहान असल्यास काही करता येणार नाही.
६) केकचे बॅटर केकटीनमध्ये अर्ध्यापेक्षा किंचीत जास्त भरावे. भांडे पूर्ण भरू नये त्यामुळे केक फुलल्यावर भांड्याच्या बाहेर येतो.

Thursday, March 10, 2011

दुधी हलवा - Dudhi Halwa

Dudhi Halwa in English

वेळ: साधारण ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

indian sweets, indian dessert recipe, easy dessert, quick dudhi halva, lauki halwa, bottle gourd halwaसाहित्य:
अडीच कप किसलेला दुधी भोपळा (सोलून बिया काढून)
१ टिस्पून तूप
पाऊण कप कंडेन्स मिल्क
१ टिस्पून चारोळी (३ तास कोमट पाण्यात भिजवावी)
१ टेस्पून बदामाचे काप, (बदाम भिजवून साल काढावे)
१ टेस्पून इतर ड्राय फ्रुट्स जसे काजू, पिस्ता, बेदाणे
१/४ टिस्पून वेलची पूड

कृती:

१) पॅन गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि किसलेला दुधी घालून परतावे. मिडीयम-हाय हिटवर परतत राहावे.
२) साधारण ५ ते ८ मिनीटांनी दुधीमधील पाणी निघून जाईल. आता किसलेल्या दुधीची एक काडी चावून पाहावी. जर कच्चेपणा वाटत असेल तर अजून काही मिनीटे शिजवावे.
३) दुधी शिजला कि कंडेन्स मिल्क घालावे आणि घट्ट्पणा येईस्तोवर परतत राहावे. सुकामेवा घालावा, वेलची पूड घालून मिक्स करावे. थोडावेळ परतून घ्यावे.
असा हा झटपट दुधी हलवा गार किंवा कोमट कसाही छान लागतो.

टीप:
१) कंडेन्स मिल्कचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
२) दुधी शिजवताना झाकण न ठेवता शिजवावा.

दुधी हलवा रेसिपी - दुध आणि साखर वापरून

Thursday, March 3, 2011

फ्रुट सलाड - Fruit Salad

Fruit Salad in English

वेळ: २० ते २५ मिनीटे
वाढणी: ४ ते ५ जणांसाठी

fruit salad, indian fruit salad, fruit dessertसाहित्य:
१ मध्यम केळं
१ लहान सफरचंद
१ मध्यम संत्र
१/२ कप द्राक्षं
१/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे
ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू
१/२ कप कंडेंन्स मिल्क
१/२ कप दूध

कृती:
१) फळांची तयारी
द्राक्षं: द्राक्षांचा आकार लहान असेल तर अख्खी द्राक्षं वापरावी. मोठी द्राक्षं असतील तर प्रत्येकाचे दोन भाग करून घ्यावे.
संत्र: संत्र्याचे साल काढून आतील फोडी विलग कराव्यात. प्रत्येक फोड सोलून घ्यावी आणि आतील गर फक्त वापरावा.
पपई: पपई सोलून आतील बिया फेकून द्याव्यात. पपईचे मध्यम तुकडे करावे.
केळं: केळं सोलून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात.
सफरचंद: नेहमी सफरचंद शेवटी कापावे म्हणजे काळे पडत नाही. सफरचंदातील बिया काढून टाकाव्यात आणि सफरचंदाचे बारीक किंवा मध्यम तुकडे करावेत.

२) सर्व फळं एकत्र करावीत. त्यात कंडेंन्स मिल्क आणि साधे दुध घालून मिक्स करावे. [दूध आणि कंडेंन्स मिल्कचे प्रमाण कमी-जास्त होवू शकते. म्हणून आधी १/४ कप दूध आणि १/४ कप कंडेंन्स मिल्क एकत्र करून फळांमध्ये घालावे. मिक्स करून चव पाहावी. जर गोडपणा बरोबर असेल पण फ्रुट सलाड जास्त घट्ट झाले असेल तर थोडे साधे दुध घालावे.]
ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करावे. (थोडे बेदाणे, पिस्ता, बदाम सजावटीसाठी ठेवावे)
फ्रिजमध्ये गार करून जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) आवडीनुसार तसेच अव्हेलेबल असल्यास चिकू, डाळींब, स्ट्रॉबेरी, हापूस आंबा, पेरू (कमी बियांचे) इत्यादींचे लहान तुकडे फ्रुट सलाडमध्ये घालू शकतो. (तसेच इतर आंबटगोड किंवा फक्त गोड रसाळ अशी फळे वापरता येतील)

Monday, February 14, 2011

बेसिक एगलेस केक - Eggless sponge cake

Eggless Vanilla Cake in English

पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ ते ४० मिनीटे
नग: १० लहान तुकडे

eggless cake, cake without egg, plain sponge cake recipeसाहित्य:
३/४ कप मैदा
२०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ कप + २ ते ४ चमचे)
१/४ कप बटर (मिठविरहित)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)

कृती:
१) प्रथम ओव्हन ३५० F (१८० C) ला प्रिहिट करत ठेवावे. तसेच केक टीनला (बेक करण्यासाठीचा डबा) आतून बटरचा हात लावून तयार ठेवावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. मिश्रण एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेनुसार मिश्रण एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे.
५) तयार मिश्रण केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). केक टीन ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर ठेवावा आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. ३५ मिनीटे होईस्तोवर ओव्हन अजिबात उघडू नये. ओव्हन बेकिग करताना मधेमधे उघडल्यास ओव्हनचे तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण ३५ ते ३७ मिनीटांनंतर केकच्या मध्यभागी टूथपिकने किंवा सुरीने खालपर्यंत टोचून तशीच टूथपिक बाहेर काढावी. जर टूथपिकला ओलसट मिश्रण चिकटले नसेल तर केक बेक झाला असे समजावे. जर टूथपिकला ओलसट मिश्रण लागलेले असेल तर अजून थोडावेळ केक बेक करावा.
एकदा का केक बेक झाला कि ५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.


टीप:
१) केक टीनचे बरेच आकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात, जसे की बदाम, गोल, अंडाकृती, चौकोन इत्यादी. तसे केकटीन वापरून विविध आकारात आपण केक बनवू शकतो.
२) वरील प्रमाणातून २ ते ३ जणांसाठी केक बनवता येईल. जर जास्त प्रमाणात केक बनवायचा असेल तर दुप्पट किंवा तिप्पट प्रमाण घेऊन केक बनवावा.
३) वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. मी ८" लांब x ३" रूद असा केकटीन वापरला होता. मिश्रण टीनमध्ये ओतल्यावर, तळापासून दिड ते २ इंच उंचीपर्यंत टीन भरला होता. वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. जर तुमच्याकडे मोठा केकटीन असेल तर मिश्रण दुप्पट घ्या.
४) प्लेन सोडा वॉटरच वापरावे. सोडा वॉटरमुळे केक हलका होतो. कोक, पेप्सी, जिंजर एल, लेमन सोडा वापरू नये. यामुळे केकच्या चवीत फरक पडेल.
५) सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर मिश्रणाची चव पाहावी. जर मिश्रण अगोड वाटले तर काही चमचे कंडेन्स मिल्क घालून मिक्स करावे आणि मगच बेक करावे.

Tuesday, November 2, 2010

मलई चॉप - Malai Chops

Malai Chop in English

वेळ: ४५ मिनिट्स
नग: साधारण ६ ते ८ लहान पीसेस

rasgulla, malai sandwich, malai chop, sweets, malayee sandwich
साहित्य:
अडीच कप दूध (2 ‍% reduced Fat)
1 टीस्पून विनेगर
२ टेस्पून पाणी
१ कप साखर
३ कप पाणी
१०० ग्राम खवा
२ टिस्पून साखर
४ टेस्पून दूध/ व्हिपींग क्रिम (टीप १)
लहान चिमूट केशरी रंग (टीप २)
वेलची पूड (टीप १)
३ पिस्त्यांचे पातळ काप सजावटीसाठी

कृती:
पनीर (step by step images)
१) पनीर बनवण्यासाठी पातेल्यात अडीच कप दूध, मध्यम आचेवर गरम करत ठेवावे आणि ढवळत राहावे म्हणजे दूध पातेल्याला चिकटणार नाही. एका वाटीत १ ते दिड टिस्पून विनेगर आणि २ टेस्पून पाणी मिक्स करून ठेवावे. दूध गरम झाले कि हळूहळू विनेगर आणि पाण्याचे मिश्रण घालावे. गॅस मंद आचेवर करून ढवळत राहावे. पनीर आणि पाणी विलग होईल. सुती कपडा चाळणीवर पसरवून ठेवावा. आणि पनीर गाळून घ्यावे आणि त्यावर गार पाणी ओतावे म्हणजे विनेगरचा वास जाईल. कपड्याच्या कडा एकत्र करून पनीर घट्ट पिळून घ्यावे. एका फ्लॅट सरफेसवर किंवा एखाद्या ताटात हे पनीर मळून घ्यावे. त्यातील सर्व बारीक गुठळ्या मोडून एकदम स्मूद असा गोळा बनवावा. रवाळपणा एकदम गेला पाहिजे. याचे एकसारखे ८ गोळे बनवावे दोन बाजूंनी किंचीत दाब द्यावा.
पाक(step by step images)
२) एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र उकळवत ठेवावे. मिश्रण उकळायला लागले कि त्यात पनीरचे गोळे टाकावेत आणि वरून झाकण ठेवून २० ते २२ मिनीटे शिजवावेत. (पातेले पुर्ण न झाकता ९० % झाकावे आणि १० % उघडे ठेवावे.). शिजवून झाले कि गॅस बंद करावा आणि पनीरचे गोळे किमान ३ ते ४ तास पाकात मुरू द्यावेत.
खव्याचे मिश्रण: (step by step images)
३) खवा गुलाबीसर भाजून घ्यावा. गार झाल्यावर बोटांनी चुरडून त्यातील गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यात दूध आणि साखर घालून मिक्स करावे. हे मिश्रण निट मळून घ्यावे आणि एकदम स्मूद अशी पेस्ट करावी. रंगासाठी केशरी रंग घालून निट मिक्स करावे. हे मिश्रण झाकून फ्रिजमध्ये ठेवावे.
मलई सॅंडविच (step by step images)
४) पनीरचे मुरलेले गोळे पाकातून बाहेर काढावेत. सुरीने सावकाशपणे हॉरिझॉंटल कापून दोन समान तुकडे करावेत. एका तुकड्यावर खव्याचे मिश्रण पसरवावे. दुसरा तुकडा त्यावर ठेवून अलगद चेपावे. पिस्ता काप घालून सजवावे. (टीप ३)
थोडावेळ थंड करून सर्व्ह करावे.

टीप:
१) मिठाईच्या दुकानात मलई सॅंडविचमधील खव्याच्या मिश्रणात वेलचीपूडऐवजी गुलाबपाणी वापरतात. जर गुलाबपाणी वापरायचे असेल तर ४ टेस्पून दूधाऐवजी ३ टेस्पून दूध घ्यावे आणि १ टेस्पून गुलाबपाणी घ्यावे. मी दुधाऐवजी व्हिपींग क्रिम वापरले होते त्यामुळे दाटपणा येतो.
२) केशरी रंगाऐवजी केशर वापरू शकतो.
३) सजावटीसाठी चांदीचा वर्खही लावू शकतो.

Labels:
Malai Sandwich, Bengali Sweets, Malai sandwich

Thursday, October 21, 2010

पाकातल्या पुर्‍या - Pakatlya Purya

Pakatlya Purya in English

वेळ: २५ ते ३० मिनीटे
नग: २५ ते ३० मध्यम पुर्‍या

diwali faral, divali recipes, shankarpale, chirote, chakali, pakatlya puryaसाहित्य:
१ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तेल, मोहनासाठी
चिमूटभर मिठ
दही (टीप)
पाक करण्यासाठी:- दिड कप साखर आणि १/२ ते पाऊण कप पाणी
१/२ टिस्पून वेलची पावडर
४ केशराच्या काड्या
तळण्यासाठी तूप (टीप)

कृती:
१) मैदा आणि बारीक रवा एकत्र करून १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चिमूटभर मिठ घालावे. दही घालून घट्ट मळून घ्यावे. १ तास तसेच झाकून ठेवावे.
२) साखर आणि पाणी एकत्र करून २ तारी पाक करावा. केशर थोडे गरम करून किंचीत साखरेबरोबर कुटून पाकात घालावे. वेलची पावडर घालून मिक्स करावे.
३) जेवढी मोठी पुरी हवी असेल त्यायोग्य पुरीसाठी समान आकाराच्या लाट्या बनवाव्यात.
४) तूप गरम करून पुर्‍या तळून घ्याव्यात. पुर्‍या टिश्यु पेपरवर काढाव्यात. २-४ मिनीटांनी पाकात पुर्‍या टाकाव्यात. काही मिनीटे मुरू द्याव्यात. नंतर ताटात पाघळवत ठेवाव्यात.
सजावटीसाठी भरडसर वाटलेला पिस्ता पेरावा. या पुर्‍या पक्वान्नं म्हणून जेवणात वाढता येतात.

टीप:
१) दही वापरताना आंबट दही घ्यावे. तसेच जर दही वापरायचे नसेल तर साध्या पाण्याने पिठ भिजवावे आणि पाकामध्ये लिंबाचा रस घालावा म्हणजे गरजेचा आंबटपणा पुर्‍यांना येतो.
२) तूपाऐवजी तेलात पुर्‍या तळल्या तरी चालतात. पण तुपामुळे पुर्‍यांना खुप छान स्वाद येतो.

Sunday, March 14, 2010

गुलाबजाम - Gulabjamun

Gulabjam in English

सर्व चकलीच्या वाचकांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

साधारण १५ ते १८ गुलाबजाम
वेळ: साधारण १ ते सव्वा तास

gulabjamun recipe, gulabjam recipe, jamun recipe, indian dessertसाहित्य:
२५० ग्राम गुलाबजामचा खवा
साखरेचा पाक बनवण्यासाठी
दिड कप साखर
सव्वा कप पाणी
१/२ टिस्पून वेलचीपावडर
इतर साहित्य
तळण्यासाठी तेल किंवा तूप
१ टेस्पून मैदा
गरजेप्रमाणे दुध
चिमूटभर बेकिंग सोडा

कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून घ्यावा. यात मैदा आणि अगदी किंचीत बेकिंग सोडा घालावा. निट मिक्स करावे. किंचीत दुध शिंपडून मळून घ्यावे. लागल्यास अगदी थोडे तूप हाताला लावून मध्यम मळावे. ओल्या कपड्याने हा गोळा झाकून ठेवावा.
२) दिड कप साखर, सव्वा कप पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. एकतारी पाक करून घ्यावा. वेलचीपूड घालावी. पाक तयार होत असतानाच मळलेल्या गोळ्याचे दिड ते दोन सेमीचे गोळे बनवावे. गोळ्यांना चिर असू नये त्यामुळे तेलात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
३) तेल व्यवस्थित गरम करून आच मध्यम (मिडीयम लो) करावी. तेलाचे तापमान तपासण्यासाठी प्रथम एक गोळा टाकावा. जर गोळा लगेच वर तरंगला तर तेल जास्त तापले आहे असे समजावे. आधी गोळा तळाला जाऊन काही सेकंदांनी तेलावर तरंगला पाहिजे. म्हणजे तेलाचे तापमान बरोबर आहे असे समजावे. मग आता जास्त गोळे तळणास सोडावेत. हे तरंगलेले गोळे अलगदपणे झार्‍याने गोलगोल हलवावे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल. तसेच तळताना गुलाबजामवर तेल उडवावे म्हणजे निट तळले जातील. लालसर रंग आला कि तळलेले गोळे तेलातून बाहेर काढावे. व गुलाबजामची दुसरी बॅच तळून होईस्तोवर वार्‍यावर ठेवावी.
४) वरील पद्धतीनेच गुलाबजामची दुसरी बॅच तळण्यास सोडावी. गुलाबजाम तळावेत, बाहेर काढावेत आणि तळलेली पहिली बॅच गरम पाकात सोडावी. पाक एकदम उकळता गरम असू नये तसेच कोमटही नसावा.
गुलाबजाम पाकात किमान ५ ते ६ तास मुरवावे. शक्यतो आदल्या रात्री करून मुरवल्यास व्यवस्थित मुरतात.

टीप:
१) काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोज इसेंस घालावा.
२) जरा वेगळ्या पद्धतीने गुलाबजाम करायचे असतील तर खव्याचा गोळा वळताना लहान आकाराचे ड्रायफ्रुटचे तुकडे (काजू तुकडा, पिस्ता), खडीसाखरेचा चौकोन किंवा वेलचीचा दाणा असे गोळ्याच्या मध्यभागी घुसवून निट गोळा वळावा आणि तळावे.
३) मैद्याऐवजी आरारूट पावडर किंवा कॉर्न फ्लोर वापरले तरी चालते.
४) गुलाबजाम तळताना तेलाचे तापमान फार महत्त्वाचे असते. जास्त गरम तेल असेल तर गुलाबजामला लगेच लालसर रंग येतो पण आतून कच्चाच राहतो. आणि पाकात टाकल्यावर न शिजलेल्या भागात पाक मुरत नाही. त्यामुळे सुरूवातीला एकदोन गुलाबजाम टाकून तापमान अड्जस्ट करून घ्यावे.
५) गुलाबजामसाठीचा पाक खुप घट्ट करू नये त्यामुळे पाक गुलाबजाममध्ये निट मुरत नाही.
६) गुलाबजामसाठी वेगळा रवाळ असा खवा मिळतो तो वापरावा.

Labels:
Gulabjamun, Gulabjam, gulabjam from khoya

Tuesday, December 22, 2009

साबुदाणा शेवई खीर - Sabudana Sevai Kheer

Sabudana Sevai Kheer in English

२ जणांसाठी
वेळ: २० मिनीटे

sabudana kheer, sevai kheer, semai kheer, kheer recipe, payasamसाहित्य:
१/४ कप साबुदाणा
२ टेस्पून शेवया
१/२ टिस्पून तूप
३ कप दूध
१/४ कप कंडेन्स मिल्क (Sweetened)
१/४ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजूचे काप आवडीनुसार

कृती:
१) साबुदाणे पाण्यात भिजवावेत. पाणी काढून टाकावे आणि झाकून ठेवावे. किमान ३ तास तरी भिजवावेत.
२) साबुदाणे भिजले कि खीर बनवण्यास घ्यावी. जाड बुडाच्या पातेलीत १/२ टिस्पून तूप मंद आचेवर गरम करून त्यात शेवया गुलाबीसर रंगावर भाजून घ्याव्यात.
३) शेवया गुलाबी झाल्या कि त्यात दुध घालावे आणि मध्यम आचेवर गरम होवू द्यावे. मधेमधे तळापासून ढवळावे म्हणजे दूध तळाला लागून करपणार नाही. शेवया थोड्याशा शिजू द्यात (साधारण ४-५ मिनीटे).
४) त्यात भिजलेले साबुदाणे घाला आणि मध्यम आचेवर उकळी येऊ द्यात. दोन-तीन मिनीटांनी कंडेन्स मिल्क, वेलचीपूड आणि बदाम काजू घाला. तळापासून ढवळत राहा म्हणजे खीर करपणार नाही.
५) साबुदाणे शिजले कि खिरीवर तरंगायला लागतात. त्यानंतर दोन-तीन मिनीटे मध्यम आचेवर उकळवून खिर सर्व्ह करावी.
हि खिर थोडी कोमट झाली कि खावी.

टीप:
१) कंडेन्स मिल्कमुळे साखर घालावी लागत नाही तसेच किंचीत दाटसरपणाही थोडा लवकर येतो. जर कंडेन्स मिल्क नसेल तर ३ ऐवजी ४ कप दूध घालावे आणि साधारण ३ ते ४ टेस्पून साखर किंवा चवीनुसार साखर घालून थोडे जास्तवेळ उकळावे.
२) या खिरीला अगदी किंचीत दाटसरपणा असतो, फार दाट किंवा फार पातळ नसते.
३) हि खीर गरमसरच खावी. थंड झाली कि फार चांगली लागत नाही कारण यातील साबुदाणा खुप जास्त फुगतो आणि खीर घट्टसर होते.
४) खीर उकळताना थोडे केशर घातले तर फ्लेवर आणि रंग फार छान येतो.

Thursday, November 5, 2009

फालूदा - Falooda

Falooda in English

वाढणी ४ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे (साहित्य तयार असल्यास)

Pakistani dessert, Indian Pakistani Dessert, Falooda, Faluda

साहित्य:
८ स्कूप्स वेनिला आईसक्रिम
१/२ कप रूह अफ्जा रोझ सिरप
२ टेस्पून सब्जा बी
२ ते ३ कप थंड दूध
२ टेस्पून ड्राय फ्रुट्स, छोटे तुकडे
१ पॅकेट फालूदा शेवया
१ कप स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली
४ टेस्पून टूटी-फ्रुटीचे तुकडे
सजावटीसाठी चेरी

falooda, falooda recipe, Indian dessert, Cold Drink dessertकृती:
१) फालूदा बनवायच्या किमान ५ तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकीटावरील कृती वाचून जेली बनवावी.
२) सब्जा बी फालूदा बनवण्याच्या किमान २ ते ४ तास आधीच १/२ कप पाण्यात भिजवून ठेवाव्यात.
३) १ लिटर पाणी उकळवावे त्यात फालूदाच्या शेवया घालून ४ ते ५ मिनीटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसर्‍या भांड्यात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे.
४) दुध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे.
५) फालूदा बनवायच्या वेळेस ४ ग्लास घ्यावे . त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आईसक्रिमचा १ स्कूप, दुध आणि परत त्यावर १ स्कूप वेनिला आईसक्रिम घालावे. ड्रायफ्रुट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सर्व्ह करावे. सर्व्ह करताना ग्लासमध्ये १ स्ट्रॉ आणि चमचा घालून द्यावा.

टीप:
१) फालुदाच्या मधल्या लेयरमध्ये स्ट्रॉबेरी, द्राक्षं, अननसाचे तुकडे इत्यादी आंबटगोड चवीची फळे घातल्यास फालुदा दिसायला आकर्षक तसेच चवीला स्वादिष्ट लागतो.
Labels:
Falooda, Indian Dessert, Phalooda

Thursday, October 29, 2009

दुधी हलवा - Dudhi Halwa

Dudhi Halwa in English

४ ते ५ जणांसाठी (एकूण दिड ते दोन कप)
वेळ: साधारण १ तास

halwa recipe, halva recipe, dudhi halwa, dudhicha halwa, lauki halwa, bottlegourd halwa, indian sweetsसाहित्य:
पाऊण किलो कोवळा दुधी भोपळा (किंवा किसलेला दुधी अडीच कप)
२ टिस्पून साजूक तूप
दिड कप दुध
३/४ कप खवा (आवडत असल्यास थोडा जास्त घेतला तरी उत्तम)
३/४ कप साखर
१/४ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजू तुकडे, चारोळ्या बेदाणे आवडीनुसार

कृती:
१) दुधीची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा. किसलेला दुधी पिळून पाणी काढून घ्यावे. हे पाणी सूप, आमटी किंवा सांबारामध्येमध्ये वापरता येईल.
२) जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात किसलेला दुधी घालावा आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात दुध घालावे आणि मध्यम आचेवर पातेले झाकून शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.
३) दुध आटले कि दुधी व्यवस्थित शिजला आहे कि नाही ते पाहावे. लागल्यास थोडे दुध घालावे. खवा व्यवस्थित बारीक करून घालावा, गुठळ्या राहू देवू नयेत. जर गुठळ्या राहिल्याच तर कालथ्याने फोडाव्यात.
४) खवा घातल्यावर थोड्यावेळानंतर साखर, वेलचीपूड, सुकामेवा घालावा आणि ढवळावे. आच मध्यम ठेवावी. साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल. एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो.

टीप:
१) दुधी बिनबियांचा असावा तसेच कोवळा विकत घ्यावा.
२) जर घरात उरलेले पेढे असतील तर त्याची पावडर करून खवा म्हणून वापरू शकतो, फक्त साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल.

Label:
Dudhi Halwa, Lauki Halwa, Bottlegourd Halwa

Tuesday, July 7, 2009

शेवयांची खीर- Shevai Kheer

Shevai kheer in English

वेळ: ३५ मिनीटे
२ ते ३ जणांसाठी

shevayanchi kheer, sevai kheer, kheer recipe, vermicelli pudding
साहित्य:
१/४ कप शेवया
१/२ टिस्पून साजूक तूप
साडेतीन ते ४ कप दूध
१/४ कप साखर
३ वेलचींची पूड
२ टेस्पून पिस्ता, बदाम यांचे काप

कृती:
१) बदाम किमान २ ते ३ तास तरी भिजवावेत. साल काढून पातळ काप करावेत. पिस्त्याचेही बारीक तुकडे करावेत. वेलची सोलून वेलची दाण्यांची पूड करावी.
२) पातेले मंद आचेवर गरम करून त्यात तूप घालावे. तूप पातळ झाले कि त्यात शेवया घालून अगदी मंद आचेवर शेवया गुलाबीसर रंग येईस्तोवर भाजाव्यात. खुप जास्त ब्राऊन रंग येईस्तोवर भाजू नयेत, त्यामुळे खिरीची चव चांगली लागत नाही.
३) गुलाबी रंगावर भाजलेल्या शेवया बाजूला काढून ठेवाव्यात. त्याच पातेल्यात दूध गरम करावे. उकळी आल्यावर त्यात ३ टेस्पून किंवा चवीनुसार साखर, वेलचीपूड आणि भाजलेल्या शेवया घालाव्यात. मध्यम आचेवर शेवया शिजू द्याव्यात. मधेमधे ढवळावे नाहीतर दूध करपण्याची शक्यता असते. वाटल्यास पातेल्यावर झाकण ठेवावे म्हणजे शेवया शिजतील.
४) दूध चांगले आटले आणि शेवया व्यवस्थित शिजल्या कि गॅसवरून पातेले उतरवावे. बदाम, पिस्ते घालून सजवावे. गरम किंवा थंड करून सर्व्ह करावे.

टीप:
शेवया मोठ्या आचेवर भाजू नयेत त्यामुळे शेवया निट भाजल्या जाणार नाहीत.

Thursday, May 14, 2009

एगलेस खजूर आणि अक्रोडाचा केक

Eggless dates and walnut cake in English

eggless cake, sweets, dessert, eggless cake mix just add water, eggless cake recipe, eggless chocolate cake recipes, eggless cakesसाहित्य:
३/४ कप मैदा
१/२ कप खजूराचे तुकडे
१/४ कप पाणी, खजूर भिजवण्यासाठी
१/४ कप अक्रोडाचे तुकडे
७ oz कन्डेन्स मिल्क (३/४ कप + २ टेस्पून)
१/२ बटर स्टिक (४ टेस्पून), वितळवून
१ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून वेनिला इसेंस

कृती:

१) १/४ कप कोमट पाण्यात खजूराचे तुकडे साधारण ३० मिनीटे भिजवून ठेवावे. नंतर खजूर पाण्यातून काढावे, बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पेस्ट करताना भिजवायला वापरलेले पाणी वापरावे.
२) ओव्हन ३२५ F (१६० C) वर प्रिहीट करावे. मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून २ ते ३ वेळा चाळून घ्यावे, यामुळे तिन्ही जिन्नस छान मिक्स होतील आणि गुठळ्या राहणार नाहीत. दुसर्‍या वाडग्यात कन्डेन्स मिल्क, वितळवलेले बटर आणि वेनिला इसेंस घालून मिक्स करावे. मैद्याचे मिश्रण घालून गुठळ्या न होता फेटून घ्यावे. नंतर त्यात खजूराची पेस्ट आणि अक्रोडाचे तुकडे घालून मिक्स करावे.
३) ओव्हनसेफ भांडे आतून बटरने ग्रिस करावे म्हणजे केक बेक झाला कि भांड्याला चिकटणार नाही. केकसाठीचे मिश्रण भांड्यात ओतावे आणि वरून चमच्याने सारखे करावे. प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर केकचे भांडे ठेवावे आणि ४५ मिनीटे बेक करावे.
४) ४५ मिनीटांनी ओव्हन बंद करावे, पण भांडे लगेच बाहेर काढू नये. ५ मिनीटांनी बाहेर काढावे.
५) ५ मिनीटांनी भांडे ओव्हनच्या बाहेर काढावे आणि जाळीच्या रॅकवर काढून ठेवावे आणि गार होवू द्यावे. केक गार झाला कि सावकाशपणे भांड्यातून बाहेर काढावा. कापण्यापूर्वी केक पूर्ण गार झाला पाहिजे.
१/२ इंचाचे तुकडे करून डब्यात भरून ठेवावा.

टीप:
१) प्रत्येक ओव्हनची हिटींग पॉवर वेगवेगळी असते त्यामुळे बेकिंगसाठी काही मिनीटे कमीजास्त होवू शकतात.
Labels:
eggless cake, Dates cake, Vanilla cake

Thursday, March 26, 2009

श्रीखंड - Shrikhand

shrikhand in English

चकलीच्या सर्व वाचकांना दसर्‍याच्या खुप खुप शुभेच्छा !!!

२ जणांसाठी

shrikhand puri recipe, maharashtrian sweets, Gudi Padwa recipeसाहित्य:
१०० ते १५० ग्राम चक्का (दह्यापासून) (साधारण सव्वा कप)
१/२ कप ग्रॅन्युलेटेड साखर (साधारण १०० ते १५० ग्राम) (टीप १)
१/२ टिस्पून वेलचीपूड
१/२ टिस्पून चारोळी, १ टेस्पून पिस्त्याचे आणि १ टेस्पून बदामाचे पातळ काप सजावटीसाठी
पुरण यंत्र (मी बारीक जाळीचे मोठे गाळणे वापरले)

god padartha, sweet dish, Srikhand Puri, Puri shrikhanda
Sour Cream पासून इंस्टंट श्रिखंड

कृती:

१) चक्का एका बोलमध्ये घ्यावा. त्यात साखर घालावी आणि निट मिक्स करावे.
i) पुरण यंत्र
जर पुरण यंत्र वापरणार असाल तर चक्का आणि साखरेचे मिश्रण पुरणयंत्रातून बारीक भोकांची चकती बसवून फिरवावे.
ii) चाळणी/ गाळणे
बारीक जाळीची चाळणी किंवा गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन चाळणीतून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा निघून जाईल, तसेच साखर आणि चक्का चांगला मिक्स होईल.
२) गाळलेल्या तयार श्रीखंडात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित मिक्स करावे. तयार श्रिखंड सर्व्हींग बोलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
थंडगार श्रीखंड पुरीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) चवीनुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) श्रीखंडाला पिवळसर रंग येण्यासाठी अगदी चिमुटभर केशरी रंग वापरावा. किंवा केशराच्या ३ ते ४ काड्या २ टेस्पून दुधात मिक्स करून या मिश्रणाचा रंग आणि स्वादासाठी वापर करावा.
३) श्रीखंड बनवताना त्याचे Texture खुप महत्त्वाचे असते. जितके स्मूथ टेक्श्चर तितके ते चवीला छान लागते. त्यामुळे रवाळपणा अजिबात राहता कामा नये. यासाठी एकदम बारीक जाळीची चाळणी घ्या ज्यामुळे चक्क्यातील रवाळ कण मोडले जातील.
४) जर चक्का घरी बनवणार असाल तर चांगल्या प्रतीचे ऑर्गॅनिक दही वापरा. आणि पाण्याचा अंश काढून टाका.

Labels:
Gudhi Padva special, Shrikhand Puri, Maharashtrian Shrikhand recipe

दह्यापासून चक्का

Chakka in English

साहित्य:

३ कप घरगुती घट्टसर दही किंवा ऑर्गॅनिक दही, चक्का बनविण्यासाठी (मी Stoneyfield lowfat yogurt वापरले.)
३ फुट X ३ फुट सुती कपडा

कृती:
सुती कापडात दही घालून सर्व बाजू एकत्र करून गाठ बांधावी आणि बेसिनच्या वरती, नळाला साधारण ७ ते ८ तास टांगून ठेवावे, म्हणजे दह्यातील सर्व पाणी गळून जाईल. टांगलेले दही खाली टेकू देवू नये. मधेमधे थोडासा दाब देऊन पाणी बाहेर पाडावे म्हणजे पाणी लवकर गळून जायला मदत होईल. सर्व पाणी गळून गेल्यावर साधारण ७-८ तासांनी घट्टसर चक्का तयार होईल.

श्रीखंडाची कृती

Wednesday, March 11, 2009

पुरणपोळी - Pooranpoli

Puranpoli in English

१० मध्यम पोळ्या
वेळ: २५ मिनिटे (पुरण व मैदा भिजवून तयार असल्यास)

Maharashtrian reccipe, Holi Spcial, Pooranpoli, Puranpoli, Sweets recipe, Healthy recipe
साहित्य:
१ कप चणाडाळ
१ कप किसलेला गूळ
एक कप मैदा
१/२ कप गव्हाचे पिठ
७ ते ८ टेस्पून तेल
१ टिस्पून वेलचीपूड


Maharashtrian reccipe, Holi Spcial, Pooranpoli, Puranpoli, Sweets recipe, Healthy recipe
कृती:
१) चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.
३) मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण जरा गार झाले कि पुरणयंत्रातून ते फिरवून घ्यावे. जर पुरणयंत्र नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करावे.
४) मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ १-२ तास मुरू द्यावे.
५) पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
६) पोळपाटावर थोडा मैदा भुरभुरवून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.

Friday, October 10, 2008

दहीवडा - Dahi vada

Dahi Wada in English

वाढणी: साधारण १० मध्यम वडे

dahi wada, chat food, North Indian Snack, starter, appetizer
साहित्य:
::::वड्यांसाठी::::
पाउण कप उडदाची डाळ
१/४ कप ओल्या खोबर्‍याचे पातळ तुकडे
४-५ मिरं
चवीपुरते मिठ
२ कप पातळ ताक
तळण्यासाठी तेल
::::दही बनवण्यासाठी::::
दिड कप दही, ५-६ टेस्पून साखर, १ टिस्पून मिठ
::::वरून भुरभूरवण्यासाठी::::
मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला

कृती:
१) उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. ४-५ तासानंतर डाळ उपसून ठेवावी. आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण आपल्याला घट्टसर हवे आहे. पण अगदी गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. त्यात मिठ, ठेचलेले मिरं, आणि खोबर्‍याचे पातळ काप घालावेत.
२) वडे मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात तळून घ्यावे. वड्यांचा आकार खुप मोठा ठेवू नये. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहू शकतात.
३) पातळ ताकात थोडी साखर आणि किंचीत मिठ घालावे. यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावे.
४) तोवर वरून घालायचे दही तयार करून घ्यावे. वाडग्यात दही घ्यावे, रवीने नुसतेच घुसळून घ्यावे. मग किंचीत पाणी घालून आवश्यक तेवढा पातळपणा द्यावा. त्यात चवीनुसार साखर आणि मिठ घालावे. ढवळून घ्यावे. आणि थोडावेळ फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे.
सर्व्ह करताना ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घालावेत. त्यावर दही घालून वरती चाट मसाला, मिरपूड, आणि लाल तिखट घालावे.

Labels:
Dahi Vada, Chat food, Indian Wedding Food, Dahi wada recipe, Indian Chat food