Gulabjam in English
सर्व चकलीच्या वाचकांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
साधारण १५ ते १८ गुलाबजाम
वेळ: साधारण १ ते सव्वा तास
साहित्य:
२५० ग्राम गुलाबजामचा खवा
साखरेचा पाक बनवण्यासाठी
दिड कप साखर
सव्वा कप पाणी
१/२ टिस्पून वेलचीपावडर
इतर साहित्य
तळण्यासाठी तेल किंवा तूप
१ टेस्पून मैदा
गरजेप्रमाणे दुध
चिमूटभर बेकिंग सोडा
कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून घ्यावा. यात मैदा आणि अगदी किंचीत बेकिंग सोडा घालावा. निट मिक्स करावे. किंचीत दुध शिंपडून मळून घ्यावे. लागल्यास अगदी थोडे तूप हाताला लावून मध्यम मळावे. ओल्या कपड्याने हा गोळा झाकून ठेवावा.
२) दिड कप साखर, सव्वा कप पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. एकतारी पाक करून घ्यावा. वेलचीपूड घालावी. पाक तयार होत असतानाच मळलेल्या गोळ्याचे दिड ते दोन सेमीचे गोळे बनवावे. गोळ्यांना चिर असू नये त्यामुळे तेलात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
३) तेल व्यवस्थित गरम करून आच मध्यम (मिडीयम लो) करावी. तेलाचे तापमान तपासण्यासाठी प्रथम एक गोळा टाकावा. जर गोळा लगेच वर तरंगला तर तेल जास्त तापले आहे असे समजावे. आधी गोळा तळाला जाऊन काही सेकंदांनी तेलावर तरंगला पाहिजे. म्हणजे तेलाचे तापमान बरोबर आहे असे समजावे. मग आता जास्त गोळे तळणास सोडावेत. हे तरंगलेले गोळे अलगदपणे झार्याने गोलगोल हलवावे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल. तसेच तळताना गुलाबजामवर तेल उडवावे म्हणजे निट तळले जातील. लालसर रंग आला कि तळलेले गोळे तेलातून बाहेर काढावे. व गुलाबजामची दुसरी बॅच तळून होईस्तोवर वार्यावर ठेवावी.
४) वरील पद्धतीनेच गुलाबजामची दुसरी बॅच तळण्यास सोडावी. गुलाबजाम तळावेत, बाहेर काढावेत आणि तळलेली पहिली बॅच गरम पाकात सोडावी. पाक एकदम उकळता गरम असू नये तसेच कोमटही नसावा.
गुलाबजाम पाकात किमान ५ ते ६ तास मुरवावे. शक्यतो आदल्या रात्री करून मुरवल्यास व्यवस्थित मुरतात.
टीप:
१) काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोज इसेंस घालावा.
२) जरा वेगळ्या पद्धतीने गुलाबजाम करायचे असतील तर खव्याचा गोळा वळताना लहान आकाराचे ड्रायफ्रुटचे तुकडे (काजू तुकडा, पिस्ता), खडीसाखरेचा चौकोन किंवा वेलचीचा दाणा असे गोळ्याच्या मध्यभागी घुसवून निट गोळा वळावा आणि तळावे.
३) मैद्याऐवजी आरारूट पावडर किंवा कॉर्न फ्लोर वापरले तरी चालते.
४) गुलाबजाम तळताना तेलाचे तापमान फार महत्त्वाचे असते. जास्त गरम तेल असेल तर गुलाबजामला लगेच लालसर रंग येतो पण आतून कच्चाच राहतो. आणि पाकात टाकल्यावर न शिजलेल्या भागात पाक मुरत नाही. त्यामुळे सुरूवातीला एकदोन गुलाबजाम टाकून तापमान अड्जस्ट करून घ्यावे.
५) गुलाबजामसाठीचा पाक खुप घट्ट करू नये त्यामुळे पाक गुलाबजाममध्ये निट मुरत नाही.
६) गुलाबजामसाठी वेगळा रवाळ असा खवा मिळतो तो वापरावा.
Labels:
Gulabjamun, Gulabjam, gulabjam from khoya
Sunday, March 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment