Padwal dalimbi in english
वेळ: २५ ते ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
दीड कप चिरलेले पडवळ (स्टेप २)
१ कप सोललेल्या डाळिंब्या (स्टेप १)
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२ ते ३ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ टेस्पून गूळ
चवीपुरते मीठ
इतर ऐच्छिक साहित्य: २ कोकमचे तुकडे, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून जिरे भाजून केलेली ताजी पुड
कृती:
१) १/२ कप वाल पाण्यात साधारण १२ तास भिजत ठेवावे. वाल भिजले कि पाणी काढून चाळणीत निथळत ठेवावे. नंतर स्वच्छ सुती कपड्यात घट्ट बांधून उबदार जागी ठेवावे. मोड यायला किमान १० तास तरी लागतील. जर हवामान थंड असेल तर अजून वेळ लागू शकतो. मोड आले कि वाल कोमट पाण्यात घालावे. १० मिनिटानी सोलावेत. वाल खूप नाजूक असतात, आणि काळजीपूर्वक सोलले नाहीत तर ते तुटू शकतात. १/२ कप वालाच्या साधारण १ कप डाळिंब्या तयार होतात.
२) पडवळ मधोमध उभे चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. आणि १ सेमीचे तुकडे करावे.
३) तेल तापवून मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. डाळिंब्या आणि पडवळ घालावे. थोडे पाणी शिंपडावे आणि थोडे मीठ घालावे.
४) झाकण ठेवून मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. मध्येमध्ये थोडे पाणी घालावे म्हणजे कढईच्या तळाला भाजी चिकटून करपणार नाही. तरीही खूप जास्त पाणी एकावेळी घालू नये. यामुळे भाजीचा स्वाद कमी होतो. मध्येमध्ये गरजेपुरतेच थोडेसे पाणी घालावे.
५) एक डाळिंबी घेउन बोटाने चेपून पहावी. जर शिजली असेल तर नारळ, गूळ, मीठ आणि रस राहील इतपत पाणी घालावे. या भाजीला थोडा रस चांगला लागतो. खूप सुकी झाली भाजी तर तेवढी चविष्ट लागत नाही.
भाजी शिजली कि पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टिप्स:
१) जर ऐच्छिक साहित्य वापरायचे असेल तर कोकम डाळिंबी-पडवळ बरोबरच घालावे. आणि गोड मसाला व जिरेपूड नारळ घालताना त्याबरोबर घालावी.
२) पडवळ आणि डाळिंब्यांचे प्रमाण आवडीनुसार बदलता येईल. माझ्या घरी या भाजीत डाळिंब्या पडवळापेक्षा जास्त असलेल्या आवडतात. जर पडवळ जास्त असावे असे वाटत असेल तर पडवळाचे प्रमाण जास्त ठेवावे.
Thursday, June 16, 2011
पडवळ डाळिंब्या - Padwal Dalimbya
Labels:
Bhaji,
Dalimbi (Vaal),
Every Day Cooking,
Maharashtrian,
P - T
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment