Showing posts with label Dalimbi (Vaal). Show all posts
Showing posts with label Dalimbi (Vaal). Show all posts

Thursday, June 16, 2011

पडवळ डाळिंब्या - Padwal Dalimbya

Padwal dalimbi in english

वेळ: २५ ते ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

padwal dalimbya, dalimbi usal, padwal bhaji, snake gourd stir fry, snake gourd sabzi, vaal bhaji, vaal recpe, indian curry
साहित्य:
दीड कप चिरलेले पडवळ (स्टेप २)
१ कप सोललेल्या डाळिंब्या (स्टेप १)
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२ ते ३ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ टेस्पून गूळ
चवीपुरते मीठ
इतर ऐच्छिक साहित्य: २ कोकमचे तुकडे, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून जिरे भाजून केलेली ताजी पुड

कृती:
१) १/२ कप वाल पाण्यात साधारण १२ तास भिजत ठेवावे. वाल भिजले कि पाणी काढून चाळणीत निथळत ठेवावे. नंतर स्वच्छ सुती कपड्यात घट्ट बांधून उबदार जागी ठेवावे. मोड यायला किमान १० तास तरी लागतील. जर हवामान थंड असेल तर अजून वेळ लागू शकतो. मोड आले कि वाल कोमट पाण्यात घालावे. १० मिनिटानी सोलावेत. वाल खूप नाजूक असतात, आणि काळजीपूर्वक सोलले नाहीत तर ते तुटू शकतात. १/२ कप वालाच्या साधारण १ कप डाळिंब्या तयार होतात.
२) पडवळ मधोमध उभे चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. आणि १ सेमीचे तुकडे करावे.
३) तेल तापवून मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. डाळिंब्या आणि पडवळ घालावे. थोडे पाणी शिंपडावे आणि थोडे मीठ घालावे.
४) झाकण ठेवून मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. मध्येमध्ये थोडे पाणी घालावे म्हणजे कढईच्या तळाला भाजी चिकटून करपणार नाही. तरीही खूप जास्त पाणी एकावेळी घालू नये. यामुळे भाजीचा स्वाद कमी होतो. मध्येमध्ये गरजेपुरतेच थोडेसे पाणी घालावे.
५) एक डाळिंबी घेउन बोटाने चेपून पहावी. जर शिजली असेल तर नारळ, गूळ, मीठ आणि रस राहील इतपत पाणी घालावे. या भाजीला थोडा रस चांगला लागतो. खूप सुकी झाली भाजी तर तेवढी चविष्ट लागत नाही.
भाजी शिजली कि पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टिप्स:
१) जर ऐच्छिक साहित्य वापरायचे असेल तर कोकम डाळिंबी-पडवळ बरोबरच घालावे. आणि गोड मसाला व जिरेपूड नारळ घालताना त्याबरोबर घालावी.
२) पडवळ आणि डाळिंब्यांचे प्रमाण आवडीनुसार बदलता येईल. माझ्या घरी या भाजीत डाळिंब्या पडवळापेक्षा जास्त असलेल्या आवडतात. जर पडवळ जास्त असावे असे वाटत असेल तर पडवळाचे प्रमाण जास्त ठेवावे.

Tuesday, May 11, 2010

तोंडली डाळींबी -Tendali Dalimbi

Tondali Dalimbya in English

३ जणांसाठी
वेळ: साधारण ३० मिनीटे

everyday cooking, everyday vegetables, vegetarian cooking, Ivy gourd stir fry, Vaal dalimbya, dalimbi usal, Tendli recipe, Tenda sabziसाहित्य:
एक ते सव्वा कप सोललेल्या डाळींब्या (स्टेप १)
१२ ते १५ तोंडली
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून सुका नारळ
१ टिस्पून जिरे
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
१/४ कप कोथिंबीर
२ टेस्पून ओला नारळ
चवीनुसार मिठ

कृती:
१) साधारण ३/४ कप वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून उबदार ठिकाणी ठेवावे. वालाची पुरचूंडी एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.
२) तोंडली स्वच्छ धुवून घ्यावीत. प्रत्येक तोंडल्याचे उभे ४ ते ५ काप करावेत आणि गार पाण्यात ठेवून द्यावे.
३) कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.
४) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून प्रथम चिरलेली तोंडली घालावीत. २ मिनीटे मध्यम आचेवर वाफ काढावी. नंतर डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. कढईवर पाण्याची ताटली ठेवून वाफ काढावी. हे शक्य नसेल तर गरजेनुसार पाण्याचा हबका मारावा आणि वाफ काढावी. आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी. तसेच भाजलेले जिरे-खोबरेही घालावे.
५) डाळींब्या आणि तोंडली साधारण शिजत आले कि गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
भाजी तयार झाली कि ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) आमसुलाऐवजी चिंचेचे पाणी वापरू शकतो.
२) काही जणांना हि भाजी रसदार आवडते तेव्हा शिजवताना गरजेपुरते पाणी घालावे.
३) या भाजीला थोडा गोडा मसाला (महाराष्ट्रीयन मसाला) घातल्यास छान स्वाद येतो.

Labels:
Tondli Dalimbya usal bhaji, gherkins sabzi, ivy gourd

Thursday, November 12, 2009

डाळींबी आमटी - Dalimbi Amti

Dalimbi Amti in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे

dalimbi amti, dalimbyanchi amati, maharashtrian amti recipe, valachi amtiसाहित्य:
१ कप मोड आलेले आणि सोललेले वाल
१ टेस्पून तेल
१/४ कप सुके खोबरे, किसून
१/२ टिस्पून जिरे, भाजण्यासाठी
१/२ टिस्पून जिरे, फोडणीसाठी
१/८ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून तिखट
३-४ कढीपत्ता पाने
२ टिस्पून कोथिंबीर
२ आमसुलं
१ टिस्पून गूळ किंवा १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) किसलेले सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे. जिरे खमंग भाजावे. भाजलेले खोबरे हातानेच चुरून घ्यावे. भाजलेले जिरे खलबत्त्यात कुटून घ्यावे.
२) डाळींब्या मिठ घालून अगदी किंचीत वाफवून घ्याव्यात. पुर्ण लगदा होवू देवू नये. वाफवलेल्या डाळींब्यातील थोड्या डाळींब्या चेचून घ्याव्यात.
३) पातेल्यात तेल गरम करावे. जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळींब्या घालाव्यात. कपभर पाणी घालावेत. आमसुलं घालावीत. कुटलेले जिरे आणि भाजलेले खोबरे घालावे. मध्यम आचेवर २ मिनीटे उकळी काढावी. पातळपणासाठी गरजेनुसार पाणी घालावे. नंतर गूळ घालून १-२ मिनीटे उकळी काढावी. गरज वाटल्यास मिठ घालावे. एकदम मंद आच ठेवून थोडावेळ झाकण ठेवून आमटी मुरू द्यावी. कोथिंबीर घालून सजवावे.
गरमागरम तूपभाताबरोबर हि आमटी मस्त लागते.

टीप:
१) मी शिजवलेल्या डाळींब्या ५०% चेचून घेते आणि थोडया आख्ख्या ठेवते म्हणजे आमटी छान मिळून येते. फक्त फोटोत डाळींब्या दिसाव्यात म्हणून आख्ख्या ठेवल्या आहेत.

Labels:
Dalimbyanchi Amti, Dalimbi Amti

Tuesday, December 9, 2008

डाळींबी उसळ - Dalimbi Usal

Dalimbi Usal in English

वाढणी: २ जणांसाठी

valachi Usal, Dalimbyanchi Usal, Maharashtrian Cooking, Indian Curry, Kitchen Appliances, food tv

साहित्य:
३/४ कप वाल
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून सुका नारळ
१ टिस्पून जिरे
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
१/४ कप कोथिंबीर
२ टेस्पून ओला नारळ
चवीनुसार मिठ

कृती:
१) वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.
२) कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात १/४ टिस्पून मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोडा पाणी घालावे. १ ते २ टिस्पून कुटलेले जिरे-खोबरे, आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी.
४) डाळींब्या अर्ध्या शिजल्या कि गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
उसळ तयार झाली कि ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Dalimbyanchi Usal, Valachi Usal, Dalimbi Usal