Showing posts with label Tondali. Show all posts
Showing posts with label Tondali. Show all posts

Friday, December 3, 2010

तोंडली डाळ मेथ्या - Tondli Ras bhaji

Tondli Dal Methya in English

वेळ: पूर्वतयारी-१० मिनीटे। पाकृसाठी-१५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

tondli dalimbya, tondali bhaji, tondalyachi bhaji, Indian vegetable, Indian curry recipeसाहित्य:
१/२ पौंड तोंडली (जवळपास पाव किलो)
१/४ कप तूर डाळ
१/२ टिस्पून मेथी दाणे
३ ते ४ लसणीच्या मोठ्या पाकळ्या, बारीक चिरून
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून गूळ
१/२ टिस्पून चिंचेचा घट्ट कोळ किंवा २ कोकमाचे तुकडे
चवीनुसार मिठ
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) तोंडली उभी चिरून मिठाच्या पाण्यात घालावी.
२) तूरडाळ धुवून १० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावी.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण आणि मेथी दाणे फोडणीस घालावे. लसूण थोडी ब्राऊन होवू द्यावी. नंतर मोहोरी, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. तोंडल्यातील पाणी निथळून फोडणीस घालावी. एकदा परतून तूरडाळ घालावी व मिक्स करावे.
४) यामध्ये गूळ, गोडा मसाला, मिठ, आणि कोकम घालावे. थोडे पाणीसुद्धा घालावे (साधारण १/२ कप). मिक्स करून कूकरचे झाकण बंद करावे.
५) ३ शिट्ट्या करून गॅस बंद करावा. वाफ जिरू द्यावी. कूकर उघडून रश्श्याची चव पाहावी आणि तिखट-मिठ-मसाला लागेल तसे अडजस्ट करावे.
कोथिंबीरीने सजवून गरमच पोळीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) पदार्थ शिजायला काही कूकरला जास्त शिट्ट्या लागतात तर काहींना कमी. ३ शिट्ट्यांमध्ये तोंडली शिजतीलच. आपल्याला डाळ शिजलेली हवी पण ती आख्खी राहिली पाहिजे, तीचे वरण होता कामा नये. म्हणून आपापल्या कूकरप्रमाणे किती शिट्ट्या कराव्या ते ठरवावे.

Tuesday, May 11, 2010

तोंडली डाळींबी -Tendali Dalimbi

Tondali Dalimbya in English

३ जणांसाठी
वेळ: साधारण ३० मिनीटे

everyday cooking, everyday vegetables, vegetarian cooking, Ivy gourd stir fry, Vaal dalimbya, dalimbi usal, Tendli recipe, Tenda sabziसाहित्य:
एक ते सव्वा कप सोललेल्या डाळींब्या (स्टेप १)
१२ ते १५ तोंडली
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून सुका नारळ
१ टिस्पून जिरे
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
१/४ कप कोथिंबीर
२ टेस्पून ओला नारळ
चवीनुसार मिठ

कृती:
१) साधारण ३/४ कप वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून उबदार ठिकाणी ठेवावे. वालाची पुरचूंडी एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.
२) तोंडली स्वच्छ धुवून घ्यावीत. प्रत्येक तोंडल्याचे उभे ४ ते ५ काप करावेत आणि गार पाण्यात ठेवून द्यावे.
३) कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.
४) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून प्रथम चिरलेली तोंडली घालावीत. २ मिनीटे मध्यम आचेवर वाफ काढावी. नंतर डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. कढईवर पाण्याची ताटली ठेवून वाफ काढावी. हे शक्य नसेल तर गरजेनुसार पाण्याचा हबका मारावा आणि वाफ काढावी. आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी. तसेच भाजलेले जिरे-खोबरेही घालावे.
५) डाळींब्या आणि तोंडली साधारण शिजत आले कि गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
भाजी तयार झाली कि ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) आमसुलाऐवजी चिंचेचे पाणी वापरू शकतो.
२) काही जणांना हि भाजी रसदार आवडते तेव्हा शिजवताना गरजेपुरते पाणी घालावे.
३) या भाजीला थोडा गोडा मसाला (महाराष्ट्रीयन मसाला) घातल्यास छान स्वाद येतो.

Labels:
Tondli Dalimbya usal bhaji, gherkins sabzi, ivy gourd

Tuesday, March 23, 2010

मायक्रोवेव तोंडली भात - Tondali Bhat

Tondli Rice in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: ५ ते ७ मिनीटे मसाला आणि फोडणी बनविण्यास + २० मिनीटे मायक्रोवेव

tondali bhat, tondli bhat, tondalee bhaat, ivy gourd rice, marathi recipes, ivy gourd recipesसाहित्य:
१ कप बासमती तांदूळ
२ कप पाणी
१५ ते १८ कोवळी तोंडली
मसाला: १ टिस्पून तेल किंवा तूप, १ इंच काडी दालचिनी, २ वेलची, ४ मिर्‍या, ४ लवंगा, १/४ टिस्पून जिरे, ३ लाल सुक्या मिरच्या, २ टेस्पून ताजा खोवलेला नारळ (सुके खोबरे असल्यास १ टेस्पून वापरावे)
फोडणीचे साहित्य: १ टेस्पून तूप, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, ५ ते ६ कढीपत्ता पाने
७-८ काजू पाकळ्या
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, ताजा खोवलेला नारळ गरजेप्रमाणे
भातावर वाढण्यासाठी साजूक तूप

कृती:
१) तांदूळ गार पाण्याने धुवून पाणी काढून टाकावे व १५ मिनीटे निथळत ठेवावे.
२) तोंडली स्वच्छ धुवून घ्यावीत. चिरतना बाजूला एक गार पाण्याचे भांडे घ्यावे ज्यात चिरलेली तोंडली ठेवता येतील. प्रत्येक तोंडल्याची देठं कापून उभे चार भाग करावे. अशाप्रकारे सर्व तोंडली चिरून घ्यावीत आणि पाण्यात बुडवून ठेवावीत म्हणजे काळी पडणार नाहीत.
३) नंतर मसाला बनवून घ्यावा. १ टिस्पून तेलात दालचिनी, वेलची, मिरे, लवंगा परतून घ्याव्यात. नंतर जिरे घालावे. ते तडतडले कि सुक्या मिरच्या आणि नारळ घालून २ मिनीटे मंद आचेवर परतावे. हा परतलेला मसाला जरा गार झाला कि मिक्सरमध्ये वाटून घ्यावा.
४) पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. गॅस एकदम मंद करावा यात काजूबी घालून तेवढ्याच उष्णतेवर परतावे. तसेच तोंडलीही मिनीटभर परतावीत. गॅस बंद करावा.
५) तुम्ही ज्या मायक्रोवेव सेफ भांड्यात भात बनवणार आहात त्या भांड्यात २ कप पाणी घ्या. मायक्रोवेवमध्ये हाय पॉवरवर २ मिनीटे गरम करून घ्यावे. त्यात निथळलेले तांदूळ, मिठ, फोडणीस घातलेली तोंडली (क्रमांक ४) आणि मिक्सरमध्ये वाटलेला मसाला (क्रमांक ३) हे सर्व मिक्स करावे.
६) हे मिश्रण प्रथम हाय (१००) पॉवरवर ५ मिनीटे मायक्रोवेव करावीत. भांडे बाहेर काढून एकदा ढवळून घ्यावे. आणि मिडीयम लो (४०) पॉवरवर साधारण १५ मिनीटे भात शिजू द्यावा.
गरमागरम भात सर्व्हींग प्लेटमध्ये घालून त्यावर कोथिंबीर, नारळ आणि साजूक तूप घालून सर्व्ह करावे.

टीप:
१) १ कप तांदूळाला २ कप पाणी पुरेसे होते पण थोडा फडफडीत होतो. म्हणून वाटल्यास अजून १/४ कप पाणी घातले तरी भात छान होतो.
२) वरील कृतीत फोडणीसुद्धा मायक्रोवेवमध्ये करता येते, पण गॅसवर केलेल्या फोडणीचा खमंगपणा येत नाही.
३) हा भात गॅसवरही करता येतो. फोडणी (क्र. ४) करून त्यात भात २ मिनीटे परतावा त्यात अडीच कप गरम पाणी घालावे. तयार केलेला मसाला आणि मिठ घालून शिजू द्यावे.

Labels:
Tondli bhat, Tondalee bhaat, tondli rice, tendli rice

Thursday, May 21, 2009

भरली तोंडली - Stuffed Tondli

Bharli Tondli in English

वाढणी: ४ जणांसाठी

kundri, kundru, kowai, kovai, kovakkai,kovakka, Bharwa Tindora, Stuffed Ivy Gourd, Maharashtrian Food,
साहित्य:
२०-२२ तोंडली
::मसाला::
४ ते ५ टेस्पून शेंगदाणा कूट
१/२ टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ टिस्पून गूळBharli Tondli, Stuffed Tondli, Tondali, Tindora, Stuffed Tindori, ghiloda, kundri, kundru, kowai, kovai, kovakkai,kovakka, Bharwa Tindora, Ivy Gourd, Stuffed Ivy Gourd
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ
फोडणीसाठी:
२ टेस्पून तेल
१/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१ टेस्पून सुके खोबरे
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टिस्पून गूळ
१ टिस्पून गोडा मसाला
१ टेस्पून शेंगदाणा कूट
चवीपुरते मिठ

साहित्य:
१) प्रथम तोंडली धुवून घ्यावीत. दोन्ही बाजूची टोके कापून टाकावीत. एका वाडग्यात गार पाणी भरून घ्यावे. नंतर एका बाजूने अधिक चिन्हात तोंडल्याला चिर द्यावी, पण पुर्ण कापून तुकडे करू नये. साधारण तोंडल्याच्या उंचीच्या ३/४ भागापर्यंत चिर द्यावी. चिरलेले प्रत्येक तोंडले पाणी भरलेल्या वाडग्यात ठेवावे. अशी सगळी तोंडली चिरून घ्यावीत.
२) तोंडल्यात भरायला मसाला बनवण्यासाठी एका बोलमध्ये शेंगदाणा कूट, लाल तिखट, चिंचेचा घट्ट कोळ, गूळ, जिरेपूड, धणेपूड, गोडा मसाला, आणि चवीपुरते मिठ असे सर्व एकत्र मिक्स करून घ्यावे. या मसाल्याची किंचीत चव घेऊन गरजेनुसार जिन्नस घालावेत.
३) तयार मसाला प्रत्येक तोंडल्यात थोडा थोडा भरावा.
४) फोडणीसाठी लहान कूकरमध्ये तेल गरम करावे. गॅस मध्यम ठेवावा. त्यात मोहोरी, जिरे आणि नारळ घालून मिक्स करावे. नारळ थोडा ब्राऊन रंगाचा झाला कि त्यात हळद आणि लाल तिखट घालावे. या फोडणीत भरलेली तोंडली घालावीत. अलगद हाताने मिक्स करावे. १/२ कप पाणी घालावे.
५) ढवळून त्यात १ टेस्पून चिंचेचा कोळ, १ टिस्पून गूळ, १ टिस्पून गोडा मसाला, १ टेस्पून शेंगदाणा कूट, चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. मध्यम आचेवर उकळी येईस्तोवर थांबावे. रश्श्याची चव पाहावी. काही जिन्नस कमी असेल तर आवडीप्रमाणे वाढवावा. कूकर बंद करून ३ शिट्ट्या करून तोंडली शिजवावीत. वाफ मुरली कि गरमागरम भरली तोंडली पोळीबरोबर सर्व्ह करावीत.

Labels:
Bharli Tondli, Bharwan Tindora, Bharleli Tondali