Thursday, June 18, 2009

ब्रेड पकोडा - Bread Pakoda

Bread Pakoda in English

१६ बाईट साईझ भजी
वेळ: ४० मिनीटे (बटाटा भाजी + भजी)

breadchi bhaji, bajji, bhajji, bread pakoda, pakora, mansoon special bhajjiसाहित्य:
८ ब्रेड स्लाईस
दिड कप बटाट्याची तिखट भाजी (३ ते ४ मध्यम बटाटे)
१ कप बेसन
२ टेस्पून तांदूळ पिठbread pakoda, pavachi bhaji
१ कप पाणी
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून जिरे
चिमुटभर खायचा सोडा
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) बटाटे शिजवल्यावर लगेचच भाजी बनवावी म्हणजे बटाटे चांगल्याप्रकारे मॅश होतात आणि गुठळ्या राहात नाही. बटाट्याची भाजी जरा तिखट असावी नाहीतर भजी तळल्यावर तिखटपणा कमी लागतो.
२) वाडग्यात बेसन आणि तांदूळ पिठ एकत्र मिक्स करावे त्यात पाणी घालून पिठ भिजवावे. हे पिठ पातळही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे. त्यात हळद, खायचा सोडा आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
३) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात (टीप १) एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरवावी. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा. सुरीने आवडीनुसार कापून तुकडे करावेत. (टीप २)
४) प्रत्येक तुकड्यावर पावाच्या दोन्ही बाजूंवर ३ ते ४ थेंब पाणी शिंपडून हलकेच प्रेस करावे. (टीप ३)
५) तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. बटाटा भाजी घातलेले पावाचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मिडीयम हाय गॅसवर गोल्डन रंगावर तळून घ्यावेत.
सर्व्ह करताना पुदीना चटणी, चिंचेची चटणी, किंवा टोमॅटो केचपबरोबर द्यावे. ज्यांना एक्स्ट्रा स्पाईसी खायला आवडत असेल त्यांनी शेजवान सॉसबरोबर हे पकोडे ट्राय करून पाहावेत.

टीप:
१) उरलेल्या पिठात थोडी जिरपूड, लाल तिखट, आमचूर किंवा चाट मसाला घालून मिक्स करावे ब्रेडच्या उरलेल्या कडा या पिठात घोळवून भजीप्रमाणेच तळाव्यात.
२) दुकानात किंवा गाडीवर त्रिकोणी तुकडे मिळतात. मी शक्यतो ४ तुकडे करते म्हणजे खायला सोपे पडते.
३) ब्रेडचा कोरडा तुकडा पिठात घोळवल्यावर, तो पिठ आत शोषून घेतो आणि मग आतपर्यंत गेलेले पिठ निट न शिजल्याने भजी कच्ची राहते म्हणून ब्रेडवर थोडे पाणी शिंपडल्याने, पिठ आतपर्यंत शोषले जात नाही आणि भजी छान तळली जाते.
४) जर प्लेन पकोडे बनवायचे असतील तर बटाट्याची भाजी करू नये फक्त ब्रेडचे कापलेले तुकडे भिजवलेल्या पिठात बुडवून नेहमीसारखे तळावे.

No comments:

Post a Comment