३ ते ४ जणांसाठी
वेळ: २० मिनीटे
१/२ किलो ताजी कोबी (कोबी बारीक चिरून ४ कप)
१ मध्यम बटाटा
१/४ कप मटार
फोडणीचे साहित्य: १ टेस्पून तेल, दोन चिमटी मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, ४ कढीपत्ता पाने
३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/२ टिस्पून किसलेले आले
चवीपुरते मिठ
१ टिस्पून साखर
१ टिस्पून लिंबाचा रस
१/४ कप ताजा खवलेला नारळ
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) कोबी धुवून बारीक चिरून घ्यावी. बटाटा सोलून मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरची आणि किसलेले आले घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून बटाट्याच्या फोडी घालाव्यात. मध्यम आचेवर वाफ काढावी.
३) बटाट्याच्या फोडी अर्धवट शिजल्या कि चिरलेली कोबी आणि मटार घालावेत (टीप २). निट मिक्स करून मध्यम आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे म्हणजे कढईच्या तळाला कोबी लागून जळणार नाही.
४) कोबी थोडी ६० टक्के आळली कि झाकण न ठेवता मध्यम आचेवर शिजवा. म्हणजे अधिकचे सुटणारे पाणी कमी सुटेल आणि भाजी पाणचट लागणार नाही. तसेच मिठ, साखर आणि लिंबाचा रस घाला.
५) भाजी शिजली कि खोवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून पोळीबरोबर सर्व्ह करा.
टीप:
१) कोबीचा कांदा ताजा आणि कोवळा असावा. जून कोबी परतल्यावर उग्र लागतो. भाजीची चव बिघडते.
२) कोबी फोडणीस घातल्यावर लगेच मिठ घालू नये कारण कोबी परतल्यावर आळतो. जर कोबी फोडणीस टाकल्यावर चिरलेल्या कोबीच्या प्रमाणात मिठ घातले तर कोबी आळल्यावर भाजी खारट होईल. म्हणून जरी मिठ घालावेसे वाटलेच तर दोन ते तीन चिमटीच मिठ घाला.
३) हि भाजी मसाल्याशिवाय चांगली लागते. पण वाटल्यास यामध्ये थोडा काळा मसाला किंवा गरम मसाला घालू शकतो. परंतु मसाला घातल्यावर भाजीचा रंग काळपट दिसतो.
४) या भाजीबरोबर पोळी आणि चमचाभर मिरची-कोथिंबीरीचा ठेचा सर्व्ह करावा सुरेख लागतो. (३ ते ४ मिरच्या + १/४ कप कोथिंबीर + चिमटीभर मिठ + चिमटीभर जिरे)
५) हि भाजी कूकरमध्येही करता येते. (हे करताना चिरलेला कोबी पाण्यात घालून त्यातील अधिकचे पाणी काढून टाका म्हणजे थोडे पाणी कोबीबरोबर कूकरमध्ये जाईल आणि भाजी जळणार नाही.) लहान कूकरमध्ये तेलाची फोडणी करा. बटाटा, कोबी आणि मटार फोडणीस टाकून थोडे मिठ आणि साखरही घाला आणि १ ते २ शिट्ट्या करा.
No comments:
Post a Comment